Tarun Bharat

आश्रय योजनेतील घरखर्चात दीड लाखाची वाढ

नवा प्रस्ताव शासनाकडून मंजूर : घराकरिता 6 लाख 30 हजार रुपये खर्च होणार

प्रतिनिधी / बेळगाव

घराचे स्वप्न साकार करण्यासाठी महापालिकेकडून आश्रय योजनेंतर्गत घर बांधून देण्याची योजना राबविण्यात येते. या अंतर्गत एका घरासाठी 4 लाख 87 हजार रुपयांचा खर्च 2017-18 मध्ये अपेक्षित होता. पण सध्या यामध्ये वाढ झाल्याने एका घराकरिता 6 लाख 30 हजार रुपये खर्च होणार आहे. या प्रस्तावाला राज्य शासनाने मंजुरी दिली असून शहरात विविध ठिकाणी राबविण्यात येणारी योजना लवकरच मार्गी लागण्याची शक्मयता आहे.

आश्रय योजनेंतर्गत घरांसाठी हजारो अर्ज महापालिकेकडे पडून आहेत. मागील काही वर्षात पाच हजारहून अधिक अर्जदारांनी घरासाठी रकमेची मागणी मनपाकडे केली आहे. केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने घरे नसलेल्यांचा सर्व्हे केला होता. अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार महापालिकेकडे 2005 पासून अर्ज आले होते. सध्या 7 हजारहून अधिक अर्ज महापालिकेकडे धुळखात पडले आहेत. पण सध्या महापालिकेकडून 1608 घरांची उभारणी करण्यात येणार आहे. याकरिता अलारवाड आणि अनगोळ येथील जागेची निवड करण्यात आली आहे.

राजीव गांधी आवास योजनेंतर्गत अलारवाड येथे 1384 आणि अनगोळ येथील जागेत 224 घरे बांधण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. तीन मजली इमारती बांधण्यासाठी 2017-18 मध्ये प्रस्ताव तयार केला होता. 330 चौरस फुटाच्या एका घरासाठी 4 लाख 87 हजार रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, ही योजना राबविण्यास विलंब झाल्याने खर्चात वाढ झाली आहे. बांधकाम साहित्याच्या किमती वाढल्याने एका घराच्या बांधकाम खर्चात 1 लाख 43 हजारची वाढ झाली आहे. त्यामुळे एका घरासाठी 6 लाख 30 हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. वाढीव खर्चाचा बोजा लाभार्थींवर पडणार आहे.

घर बांधण्यासाठी राजीव गांधी आवास योजनेंतर्गत सामान्यवर्गासाठी 2 लाख 70 हजार रुपये आणि महापालिकेकडून 28 हजार रुपये तसेच मागासवर्गीयांसाठी 3 लाख 50 हजार आणि महापालिकेकडून 28 हजार रुपये देण्यात येणार आहेत. उर्वरित रक्कम लाभार्थींना कर्जाच्या रुपात भरावी लागणार आहे. घराच्या बांधकाम खर्चात वाढ झाल्याने 1 लाख 43 हजार रुपयांचा बोजा लाभार्थींवर वाढण्याची शक्यता आहे. याबाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून आश्रय विभागाच्यावतीने पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. मात्र शासनाने मंजुरी दिल्याने योजना लवकरच मार्गी लागण्याची शक्मयता आहे.  

Related Stories

बालकाच्या शस्त्रक्रियेसाठी पंचवीस हजारांची मदत

Amit Kulkarni

जायंट्स ग्रुपकडून रेहानला मदत

Amit Kulkarni

टीईटीकडे 1 हजार 55 परीक्षार्थींची पाठ

Amit Kulkarni

मनपाकडून मतदान केंद्रांची पाहणी

Amit Kulkarni

सूत्रसंचालनात निरीक्षण वृत्ती महत्त्वाची

Amit Kulkarni

बेळगाव-सौंदत्ती मार्गावर विशेष बससेवा

Patil_p