Tarun Bharat

इंग्लंडची विजयी घोडदौड कायम

बांगलादेशला 8 गडी राखून नमवले, जेसॉन रॉयचे तडाखेबंद अर्धशतक, मोईन अलीचे पॉवर प्लेमध्येच 2 बळी

अबु धाबी / वृत्तसंस्था

फलंदाजी व गोलंदाजी या दोन्ही आघाडय़ांवर तंत्रशुद्ध खेळाचे प्रदर्शन साकारत इंग्लंडने आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या साखळी फेरीत प्रतिस्पर्धी बांगलादेशचा 8 गडी राखून धुव्वा उडवला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱया बांगलादेशला 20 षटकात 9 बाद 124 या किरकोळ धावसंख्येवर समाधान मानावे लागले. प्रत्युत्तरात इंग्लंडने 14.1 षटकात 2 गडय़ांच्या बदल्यात विजयाचे लक्ष्य गाठले. अवघ्या 38 चेंडूत 61 धावांची आतषबाजी करणारा जेसॉन रॉय सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

विजयासाठी 125 धावांचे तुलनेने माफक आव्हान असताना जेसॉन रॉयने आपल्या 61 धावांच्या खेळीत 5 चौकार व 3 षटकार फटकावले. जेसॉनसाठी हा 50 वा टी-20 सामना होता. इंग्लंडने अवघ्या 14.1 षटकात विजय संपादन करत आपली धावगती सरस राहील, याचीही काटेकोर काळजी घेतली. डेव्हिड मलान 28 धावांवर तर जॉनी बेअरस्टो 8 धावांवर नाबाद राहिले. इंग्लंडचा हा सलग दुसरा विजय असून ते आता 4 गुणांसह पहिल्या गटात अव्वलस्थानी विराजमान झाले आहेत.

कमी धावसंख्येचे संरक्षण करण्याचे लक्ष्य असताना बांगलादेशने आक्रमक पवित्रा घेणे टाळले. त्यांच्या गोलंदाजांमध्येही शिस्तीचा अभाव स्पष्टपणे दिसून आला. काटेकोर मारा करण्याऐवजी स्वैर मारा करत त्यांनी इंग्लिश फलंदाजांना फटकेबाजीची जणू मोकळीकच दिली. अगदी मुस्तफिजूरसारख्या कसलेल्या गोलंदाजानेही आखूड टप्प्याचे चेंडू टाकले आणि याचा रॉय व बटलर यांनी उत्तम समाचार घेतला. डावखुरा फिरकीपटू नसूम अहमदने बटलरला बाद करत ब्रेकथ्रू मिळवून दिला. पण, रॉयने फटकेबाजी सुरु ठेवत बांगलादेशला त्यांच्या मर्यादा दाखवून दिल्या.

जेसॉन रॉयने अवघ्या 33 चेंडूत आपले अर्धशतक साजरे केले. या विश्वचषक स्पर्धेतील त्याचे हे दुसरे अर्धशतक ठरले. जेसॉन नंतर डावातील 13 व्या षटकात बाद झाला. पण, तोवर त्याने आपली जबाबदारी चोख पार पाडली होती.

तत्पूर्वी, इंग्लिश गोलंदाजांनी भेदक मारा साकारत बांगलादेशला 9 बाद 124 धावांवर रोखण्याचा पराक्रम गाजवला. ठरावीक अंतराने गडी बाद होत राहिल्याने याचा बांगलादेशला मोठा फटका बसला. मोईनने पॉवर प्लेमध्येच सलग 2 चेंडूंवर 2 बळी घेतले. ख्रिस वोक्सनेही स्टार अष्टपैलू शकीब हसनला बाद करत बांगलादेशची 3 बाद 27 अशी स्थिती केली. लियाम लिव्हिंगस्टोनने 15 धावात 2 फलंदाजांना बाद केले. मिल्सने 27 धावात सर्वाधिक 3 बळी घेतले. 

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश ः 20 षटकात 9 बाद 124 (मुश्फिकूर रहीम 30 चेंडूत 3 चौकारांसह 29, नसूम अहमद 9 चेंडूत नाबाद 19. मिल्स 3-27, लिव्ंिहंगस्टोन 2-15, मोईन अली 2-18).

इंग्लंड ः 14.1 षटकात 2 बाद 126 (जेसॉन रॉय 38 चेंडूत 61, डेव्हिड मलान 25 चेंडूत नाबाद 28, शोरिफुल इस्लाम 1-26, नसूम अहमद 1-26)

Related Stories

सुपर थ्रोसह नीरज चोप्रा अंतिम फेरीत!

Patil_p

केरळ ब्लास्टर्सच्या खेळाडूंना नवीन जर्सी

Patil_p

अश्विनी-सिक्की, लक्ष्य सेन यांचे आव्हान संपुष्टात

Patil_p

गोलंदाज अली खान एकही चेंडू टाकण्यापूर्वीच बाहेर

Patil_p

मेरी कोमला पद्मविभूषण, सिंधूला पद्मभूषण

Patil_p

बेंगळूर टेनिस स्पर्धेत पेसचा सहभाग

Patil_p