Tarun Bharat

इंग्लंड-डेन्मार्क दुसरी उपांत्य लढत आज

लंडन / वृत्तसंस्था

युरो चषक चॅम्पियनशिप स्पर्धेच्या दुसऱया उपांत्य लढतीत आज (गुरुवार दि. 8) इंग्लंड-डेन्मार्कचे संघ आमनेसामने भिडणार आहेत. एकीकडे, 1966 विश्वचषक विजेता इंग्लिश संघ 55 वर्षांनंतर प्रथमच एखाद्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत फायनलमध्ये धडक मारण्यासाठी प्रयत्नशील असेल तर दुसरीकडे, डेन्मार्कचा संघ खळबळजनक निकाल प्रत्यक्षात साकारण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार, रात्री 12.30 वाजता या लढतीला प्रारंभ होत आहे.

गॅरेथ साऊथगेटसारख्या अव्वल प्रशिक्षकाचे प्रशिक्षण लाभत असलेला इंग्लंडचा संघ सध्या बहरात आहे. मागील शनिवारी त्यांनी रोममध्ये युक्रेनचा 4-0 असा फडशा पाडत याची उत्तम प्रचिती दिली. आता तोच धडाका यापुढे देखील कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असणार आहे. अर्थात, 1966 विश्वचषक विजयानंतर चारवेळा महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये उपांत्य फेरीतच ते गारद झाले असून यामुळे येथे त्यांना अधिक दक्ष रहावे लागेल.

सध्याच्या संघातील 10 खेळाडूंचा समावेश असलेल्या इंग्लिश ब्रिगेडने यापूर्वी ऑक्टोबरमध्ये नेशन्स लीग स्पर्धेत डेन्मार्कचा सामना केला. मात्र, ख्रिस्तियन एरिक्सनच्या एकमेव गोलमुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा आणखी एका उपांत्यपूर्व लढतीत झेक प्रजासत्ताकला 2-1 फरकाने नमवणारा डेन्मार्कचा संघ मात्र जैसे थे असेल, असे संकेत आहेत.

इंग्लंडचा संघ उपांत्यपूर्व फेरीतील लढतीत 31 व्या मिनिटाला हॅरी मॅग्वायर रेड कार्डमुळे बाहेर गेल्यानंतर उर्वरित वेळेत केवळ 10 खेळाडूनिशी मैदानावर होता. पण, तरीही जिद्दी खेळ साकारत त्यांनी विजय खेचून आणण्यात यश प्राप्त केले. या संघाचा स्ट्रायकर हॅरी केन उत्तम बहरात असून त्याने बाद फेरीतील 2 सामन्यात 3 वेळा गोलजाळय़ाचा अचूक वेध घेतला आहे. 3 वर्षांपूर्वी झालेल्या विश्वचषकात इंग्लंडने उपउपांत्यपूर्व फेरीत स्वीडनचा धुव्वा उडवला. मात्र, उपांत्य फेरीत क्रोएशियाकडून त्यांना धक्कादायक पराभव पत्करावा लागला. मोक्याच्या क्षणी असे झगडावे लागू नये, यावर इंग्लंडचा भर असू शकतो.

डेन्मार्कचा नियोजनबद्ध खेळ

डेन्मार्कने यंदा उत्तम खेळ साकारला आहे. एरिक्सन मैदानावर कोसळल्यानंतर या संघाला मोठा धक्का बसला. पण, यातून सावरत त्यांनी शिस्तबद्ध आगेकूच केली आहे. साखळी फेरीत ब गटात रशियाचा 4-1 असा धुव्वा उडवत बाद फेरीत पोहोचलेल्या या संघाने ऍमस्टरडॅममध्ये वेल्सचे आव्हान देखील 4-0 असे संपुष्टात आणले. नंतर उपांत्यपूर्व फेरीत त्यांनी बाकूच्या उष्ण वातावरणात झेक प्रजासत्ताकचा 2-1 असा पराभव करत आपली घोडदौड कायम राखली.

आक्रमणाच्या आघाडीवर, मार्टिन ब्रेथवेट, मिकेल डॅम्सगार्ड, कॅस्पर डोल्बर्ग यांनी उत्तम खेळ साकारला आहे. शिवाय, विंग बॅक जेन्स स्ट्रायजर लार्सन, जोकिम महेले यांच्यामुळे हा संघ आणखी मजबूत झाला आहे. होजबर्ग व डेलॅनी यांनी मिडफिल्डमध्ये सरस खेळ साकारला असून गोलरक्षक कॅस्पर स्कीमेलने विशेष लक्षवेधी गोलरक्षण साकारले आहे.

अपराजित इंग्लंडचा संघ जरुर अधिक मजबूत आहे. शिवाय, घरच्या मैदानावर खेळण्याचा लाभ त्यांना होऊ शकतो. मात्र, डेन्मार्कचा संघ धक्का देण्यासाठी ओळखला जातो आणि येथेही ही परंपरा कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला तर त्यात आश्चर्याचे कारण नसेल.

दुसरा उपांत्य सामना

इंग्लंड वि. डेन्मार्क

वेळ ः मध्यरात्री 12.30 वाजता

स्थळ ः वेम्बली स्टेडियम, लंडन.

Related Stories

दास्तुनची नवी रेडी-गो बाजारात

Patil_p

यल्लमा डोंगरावर मूलभूत सुविधा उपलब्ध करा

Rohit Salunke

स्टेशनरी दुकानमालकावर गुन्हा दाखल

Archana Banage

Afghanistan Taliban Crisis : काबुल विमानतळाचे ATC ताब्यात घेण्याची अमेरिकेची मोठी घोषणा ; नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ६,००० सैनिक केले तैनात

Archana Banage

सांगली : कुपवाडमध्ये विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांची ड्रोनद्वारे नजर

Archana Banage

वाधवान बंधूंना पत्र देणारे अमिताभ गुप्ता पुन्हा सरकारी सेवेत

Archana Banage