Tarun Bharat

इंग्लंड-पाक दुसरी कसोटी आजपासून

Advertisements

मालिकाविजयासाठी यजमान प्रयत्नशील, स्टोक्सच्या जागी रॉबिन्सनला संघात स्थान, पाकसमोर बरोबरी साधण्याचे आव्हान

वृत्तसंस्था/ साऊदम्प्टन

यजमान इंग्लंड व पाकिस्तान यांच्यातील दुसरी कसोटी गुरुवारपासून येथे सुरू होत असून पहिली कसोटी जिंकून मालिकेची विजयी सुरुवात करणारा इंग्लंड संघ याच कसोटीत मालिकाविजय मिळविण्याचा प्रयत्न करेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 3.30 वाजल्यापासून या सामन्याला सुरुवात होणार आहे.

मायदेशातील गेल्या सहा मालिकानंतर पहिल्याच सामन्यात दुर्मीळ विजय मिळविला असला तरी इंग्लंडचा कर्णधार जो रूटसमोरल काही अडचणी आहेत. जोस बटलर यष्टिरक्षक म्हणून विश्वास टाकण्यायोग्य आहे का, जिमी अँडरसनमध्ये गोलंदाजीची अद्याप ती आग आहे का, जोफ्रा आर्चरचा उपयोग कसा करायचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे बेन स्टोक्सची जागा कोण घेणार, असे प्रश्न त्याच्यासमोर आहेत. ही कसोटी जिंकली तर पाकविरुद्ध 2010 नंतर प्रथमच मालिकाविजय त्यांना मिळविता येणार आहे. तसे झाल्यास महामारीनंतर जिंकलेली त्यांची ही दुसरी मालिका असेल. याआधी त्यांनी विंडीजवर 2-1 असा मालिकाविजय मिळविला आहे.

कौटुंबिक कारणासाठी जागतिक अग्रमानांकित अष्टपैलू स्टोक्स न्यूझीलंडला रवाना झाला असल्याने तो मालिकेतील उर्वरित सामन्यात खेळू शकणार नाही. संघ अडचणीत असला की तो नेहमी तारणहारची भूमिका बजावताना दिसतो. त्यामुळे त्याची उणीव संघाला निश्चितच जाणवणार आहे. झॅक क्रॉलीसारख्या स्पेशालिस्ट फलंदाजाला ते संघात सामील करण्याची शक्यता आहे. पहिल्या कसोटीत बटलरने तीन यष्टिचीतच्या संधी दवडल्या. त्यापैकी दोन शान मसूदच्या होत्या. मसूदने नंतर 156 धावांची खेळी केली होती. मात्र दुसऱया डावात फलंदाजीत महत्त्वाचे अर्धशतक (75) नोंदवत त्याने संघाला विजय मिळवून देत या त्रुटीची भरपाई केली होती. त्यामुळे यष्टिमागे बेन फोक्स उत्तम कामगिरी करणारा असला तरी बटलरचे संघातील स्थान अबाधित राहण्याची अपेक्षा आहे.

इंग्लंडला वेगवान माऱयाबाबत चिंता करावी लागणार आहे. सलग तीन आठवडय़ात तीन सामन्यांची मालिका होत असल्याने अँडरसनला या कसोटीत संघाबाहेर ठेवले जाण्याची शक्यता आहे. विंडीजविरुद्धच्या मालिकेतही दुसऱया सामन्यात त्याला वगळण्यात आले होते. आताही तसे झाल्यास मार्क वूडला त्याच्या जागी संधी मिळू शकते. पण ओली रॉबिन्सनचा पर्यायही त्यांच्याकडे उपलब्ध आहे. 14 सदस्यीय संघात रॉबिन्सनचा समावेश करण्यात आला आहे. आर्चरला गोलंदाजीची सुरुवात करण्यासाठी किंवा पहिला चेंज बॉलर म्हणून वापरले गेले आहे. पण कर्णधार रूटने पहिल्या कसोटीच्या दुसऱया डावात त्याला केवळ 5 षटके गोलंदाजी दिली होती. स्टुअर्ट ब्रॉड व ख्रिस वोक्स चांगली कामगिरी करीत असल्याने आर्चरकडून उत्तम काम कसे करून घ्यायचे, याचे त्यांच्यासमोर आव्हान असेल.

पहिल्या सामन्यात आघाडी घेऊनही पाकला त्याचा लाभ उठविता आला नाही. पाकने या कसोटीत जादा लेगस्पिनर म्हणून शादाब खानला वापरले होते. पण त्याला केवळ 11.3 षटकेच गोलंदाजी मिळाली होती. त्यामुळे दुसऱया कसोटीत त्याच्या जागी डावखुरा फलंदाज व मध्यमगती गोलंदाज फहीम अश्रफला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. कर्णधार अझहर अलीच्या नेतृत्वावर व फलंदाजीवर पाकचे लक्ष असेल. कारण पहिल्या कसोटीत दोन्ही डावात तो फलंदाजीत अपयशी ठरला होता. त्याच्या फलंदाजीत अलीकडे घसरण झाल्याचे दिसून आले असून विदेशातील गेल्या 12 डावात त्याला केवळ 139 धावा जमविता आल्या आहेत. त्यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. मालिकेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी पाकला ही कसोटी जिंकावी लागणार आहे.

Related Stories

महिन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू पुरस्कारासाठी बाबर आझम, फक्र झमान यांची शिफारस

Amit Kulkarni

अमीत खत्रीचा राष्ट्रीय विक्रम

Amit Kulkarni

कोंटाव्हेट, बेनसिक, मर्टेन्स विजयी

Amit Kulkarni

रोहन बोपण्णाची महत्त्वाकांक्षी स्कॉलरशिप योजना

Patil_p

आनंदची यांगईविरुद्ध बरोबरी

Patil_p

ऍशेस मालिकेसाठी इंग्लंड संघात स्टोक्सचा समावेश

Patil_p
error: Content is protected !!