Tarun Bharat

इंडिया ओपन बॅडमिंटन डिसेंबरमध्ये

बीडब्ल्यूएफकडून सुधारित वेळापत्रकाची घोषणा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

ऑलिम्पिक पात्रतेचा दर्जा असलेली इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धा आता डिसेंबरमध्ये घेतली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन फेडरेशनने (बीडब्ल्यूएफ) शुक्रवारी उर्वरित मोसमाचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यात ही स्पर्धा डिसेंबर 8 ते 13 या कालावधीत होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

आधीच्या नियोजनानुसार वर्ल्ड टूर सुपर 500 इंडिया ओपन स्पर्धा 24 ते 29 मार्चपर्यंत नवी दिल्लीत होणार होती. पण कोव्हिड 19 विषाणूच्या उद्रेकानंतर ती लांबणीवर टाकण्यात आली होती. आता तिचे आयोजन डिसेंबरमध्ये केले जाणार असल्याचे बीडब्ल्यूएफने सांगितले. या महत्त्वाच्या स्पर्धेआधी हैदराबाद ओपन (11-16 ऑगस्ट) व सईद मोदी आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धा (17-22 नोव्हेंबर) घेतल्या जाणार आहेत.

भारत सरकारने अकरा क्रीडा प्रकारांना ट्रेनिंग सुरू करण्याची परवानगी दिल्यानंतर भारतीय बॅडमिंटनपटूंना इनडोअर ट्रेनिंग करण्यास परवानगी मिळाली. त्यानंतर बीडब्ल्यूएफने वरील सुधारित वेळापत्रकाची घोषणा केली आहे. एकूण आठ स्पर्धांचे नवे वेळापत्रक निश्चित करण्यात आले असून त्यात न्यूझीलंड ओपन सुपर 300 (ऑक्टोबर 20-25), इंडोनेशिया ओपन सुपर 1000 (17-22 नोव्हेंबर), मलेशिया ओपन सुपर 750 (24-29 नोव्हेंबर), थायलंड ओपन सुपर 500 (1-6 डिसेंबर) व चीनमधील गुआंगझू येथे होणारी वर्ल्ड टूर फायनल्स (16-20 डिसेंबर) या प्रमुख स्पर्धांचा समावेश आहे. जर्मन ओपन (3-8 मार्च), स्विस ओपन (17-22 मार्च), युरोपियन चॅम्पियनशिप (21-26 एप्रिल), ऑस्ट्रेलियन ओपन (2-7 जून) या चार स्पर्धा मात्र निलंबितच ठेवण्यात आल्या असून त्यासाठी योग्य तारखा अजून निश्चित करण्यात आलेल्या नाहीत, असे बीडब्ल्यूएफने स्पष्ट केले. एकूण 10 स्पर्धा रद्द करण्यात आल्या असून त्यामध्ये सिंगापूर ओपन (7-12 एप्रिल), बॅडमिंटन आशियाई चॅम्पियनशिप (21-26 एप्रिल) या स्पर्धांचाही समावेश आहे.

नव्या वेळापत्रकानुसार बीडब्ल्यूएफ वर्ल्ड टूरची सुरुवात तैपेई ओपन सुपर 300 स्पर्धेने होणार आहे. 1 ते 6 सप्टेंबरपर्यंत ही स्पर्धा होणार आहे तर थॉमस व उबेर कप फायनल्स स्पर्धा डेन्मार्कमधील आरहसमध्ये 3 ते 11 ऑक्टोबर या नव्या तारखेला घेतली जाणार आहे. ‘नव्या वेळापत्रकाचे नियोजन करणे खूपच कठीण काम होते. वेळ कमी असल्याने हे वेळापत्रक भरगच्च झाले आहे. पण खेळाडूंना तसेच आंतरराष्ट्रीय संघटनांना नवी सुरुवात करण्याबाबत आशादायक वातावरण त्यामुळे निर्माण होणार आहे, असे बीडब्ल्यूएफचे सरचिटणीस एल. थॉमस म्हणाले. आंतरराष्ट्रीय दळणवळण व प्रवासावरील निर्बंध केव्हा संपतील हे आताच निश्चितपणे सांगता येत नाही. मात्र खेळाडू, त्यांचे सोबती, पंच, प्रशिक्षक, पदाधिकारी आणि चाहते यांच्या आरोग्याची पूर्ण सुरक्षितता असल्याशिवाय आम्ही स्पर्धांना सुरुवात करणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे ऑल इंग्लंड बॅडमिंटन स्पर्धेनंतर मार्च ते जुलै या कालावधीतील सर्व बॅडमिंटन स्पर्धा बीडब्ल्यूएफला स्थगित करणे भाग पडले होते.

Related Stories

ऑस्ट्रेलियन संघात ख्वॉजा, ऍगरचा समावेश

Patil_p

गयाना अमेझॉनचा बार्बाडोसवर विजय

Patil_p

महिलांची बिग बॅश लीग चाहत्यांविना होणार

Patil_p

केन विल्यम्सनला 12 लाख रुपयांचा दंड

Patil_p

मुलानीचे 5 बळी, जैस्वालचे शतक

Patil_p

प्रेवलरच्या निर्णायक गोलने स्वित्झर्लंड ‘नॉकआऊट’ मध्ये दाखल

Patil_p