ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सरकारी तेल कंपन्यांकडून इंधन दरवाढीचे सत्र कायम असून, आज पेट्रोलच्या दरात 33 ते 35 पैशांची वाढ झाली. तर डिझेलमध्ये 13 ते 18 पैशांची वाढ केली आहे. आज दिल्लीत पेट्रोलने शंभरी गाठली असून एक लिटरसाठी 100.21 रुपये तर डिझेलसाठी 89.53 रुपये मोजावे लागणार आहेत. तर मुंबईत पेट्रोल 106. 25 रुपये प्रति लिटर, तर डिझेल 97.09 रुपयांवर गेले आहे.


गेल्या दोन महिन्यांतील पेट्रोलच्या किंमतीतील ही 35 वी, तर डिझेलच्या किमतीतील 34 वी वाढ ठरली. त्यामुळे देशभरात अनेक ठिकाणी इंधनदरांनी शंभरी पार केली आहे.
पुण्यात पेट्रोल 105.88 रुपये, तर डिझेल 95.24 रुपयांवर आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल 101.06 रुपये तर डिझेल 94.06 इतके आहे. आणि कोलकातामध्ये पेट्रोल100. 23 रुपये तर डिझेल 92.50 रुपये इतके वाढले आहे.
- पेट्रोलची शंभरी कुठे?
राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब आदी ठिकाणी पेट्रोलने आधीच शंभरी गाठली होती. या यादीत आता सिक्कीमची भर पडली आहे. तर महानगरात मुंबई, हैदराबाद आणि बेंगळूर यापूर्वीच पेट्रोलने शंभरी ओलांडली आहे.
- दररोज 6 वाजता किंमती बदलतात
दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होत असतात. पेट्रोल डिझेलच्या किंमतीत उत्पादन शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी विनिमय दरासह आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूडचे दर काय आहेत, यावर पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज बदलत असतात.