Tarun Bharat

इचलकरंजीवासीयांना डोंगरांची भुरळ

ट्रेकिंगचा ट्रेंड वाढला : डोंगर पायथ्याशी मोठी गर्दी

संजय खूळ / इचलकरंजी

परिसरातील सहा डोंगर इचलकरंजीवासीयांना भुरळ घालत आहेत. दर रविवारी या डोंगरावर ट्रेकिंग करण्यासाठी डोंगराचा पायथा हळूहळू गजबजून जात आहे. हातकणंगलेलगत रामलिंग, धुळोबा, मजले, बाबुजमाल कुंभोज, तुकाई निमशिरगाव आणि तमदलगे या डोंगरांची नैसर्गिक संपन्नता अनेकांना आकर्षित करणारी ठरली आहे.

नैसर्गिकदृष्ट्या सुजलाम सुफलाम अशी ओळख असलेल्या हातकणंगले तालुक्याला सह्याद्रीच्या डोंगर कपारीचे वरदान लाभले आहे. रामलिंग, धुळोबा, बाहुबली हे डोंगर धार्मिकतेमुळे प्रसिद्ध आहेत. रामलिंग परिसरात असणारी वैशिष्ट्ये आणि या ठिकाणी असणारे पक्षी आणि प्राणी हेही अनेकांचे आकर्षण ठरले आहे. या डोंगरावर काही निवडक ग्रुप ट्रेकिंगसाठी जात होते. अलीकडे मात्र परिसरातील सर्वच डोंगरावर ट्रेकिंगसाठी जाण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.

एकाच मार्गावर जाऊन कंटाळा येऊ नये, यासाठी विविध मंडळांनी ट्रेकिंगसाठी  वेगवेगळे मार्ग निश्चित केले आहेत. त्यामुळे दोन महिने वेगवेगळ्या डोंगर पर्यटनाचा लाभ हौशी लोकांना मिळतो. इचलकरंजी शहरालगतच आठ ते दहा किलोमीटर अंतरावर हे सर्व डोंगर वसले आहेत. त्यामुळे येथील शाळकरी विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आता ट्रेकिंगची ओढ लागली आहे. दर रविवारी किमान पंधरा ते वीस ग्रुप वेगवेगळ्या ठिकाणी ट्रेकिंगसाठी असतात. त्यामुळे डोंगर पायथ्याशी गाड्याचा ताफा पहाटे 6 वाजल्यापासूनच दिसून येतो.

याबाबत माहिती देतांना गिरीमित्र ट्रेकींगचे संयोजक सुहास माळी म्हणाले, आमच्या ट्रेकींग  परिवारामध्ये इचलकरंजी परिसर मुद्रक संघातील मित्र, डीकेटीई परिवारातील मित्र तसेच इतर मित्र सहपरिवार या उपक्रमाचा  आनंद घेतात. यामध्ये  6 ते 60 वर्षांपर्यंतचे  लोक सामील होतात. सर्वांना व्यायामाची सवय लागावी व निसर्गाचा निखळ आनंद घेता, यावा हाच उद्देश या मागचा आहे.

दर रविवारी कोणत्या ट्रेकला जायचे याचे नियोजन करतो. त्यानंतर पहाटे 6 वाजता नवीन नगरपालिका चौक किंवा थोरात चौक येथे एकत्र येऊन सकाळी 6.10 पर्यंत ट्रेकसाठी निघतो. परत सकाळी 9 च्या आत घरी येतो. यात सर्वांना सोबत घेऊन इच्छीत डोंगर चढणे, तेथे छोटासा हास्य उपक्रम व विठ्ठलनामाचा जयघोष, यानंतर 5 मिनिटांची विश्रांती आणि लगेचच डोंगर उतरायला सुरूवात करतो.

तुकाईचा सुखद अनुभव

हातकणंगले तालुक्यातील कोल्हापूर-सांगली रस्त्यावर हे सर्व डोंगर आहेत. यातील तुकाई डोंगर ट्रेकिंगसाठी सुखद अनुभव देतो. तसेच तमदलगे डोंगरावर सहपरिवार ट्रेकिंगसाठी जास्त ओढा असतो. ट्रेकिंगसाठी खडतर आव्हान बाबुजमाल डोंगर या ठिकाणी आहे.

ट्रेकिंगला जाताना ही घ्या काळजी

शक्यतो समुहाने जा  

बरोबर पाण्याची बॉटल ठेवा  

स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घ्या

ट्रेकिंग मार्गावर व डोंगरावर कचरा होऊ नये याची दक्षता घ्या

Related Stories

कोल्हापूर : रक्षाविसर्जनाच्या जेवणातून मानेवाडी येथील 37 जणांना विषबाधा

Archana Banage

गांधीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे जोमात

Archana Banage

कबनूर: प्रलंबित मागण्या बाबत कामगारांचा संप सुरूच

Archana Banage

Ratnagiri : चिपळुणात डेंग्यूची साथ, शहरासह तालुक्यात सापडताहेत रूग्ण

Kalyani Amanagi

‘बर्ड फ्लु’च्या संकटाने व्यावसाईक धास्तावले

Archana Banage

शिरोळात मुस्लिम समाज आक्रमक; नुपुर शर्मावर कारवाईची मागणी

Abhijeet Khandekar