Tarun Bharat

इटली, स्पेन, फ्रान्समध्ये गंभीर संकट

Advertisements

3 देशांमध्ये एकूण 20 हजार 725 बळी : जगभरातील  देशांमध्ये 34804 जणांचा मृत्यू : 156122 जण संसर्गापासून मुक्त

जगभरात महामारी झालेल्या कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. अमेरिका आणि युरोपीय देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संक्रमणाचे हजारो नवे रुग्ण समोर येत आहेत. जगभरात 58864 नवे रुग्ण एका दिवसात सापडले असून एकूण रुग्णांची संख्या वाढून 735015 झाली आहे. तर मागील 24 तासांत 3110 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींचा आकडा 34804 वर पोहोचला आहे. अमेरिकेत पुन्हा एकदा कोरोनाचे सर्वाधिक नवे रुग्ण आढळले आहेत.

अमेरिकेत नव्या रुग्णांचे वाढते प्रमाण

जागतिक महासत्ता असलेली अमेरिका आता या महामारीचा केंद्रबिंदू ठरत आहे. अमेरिकेत मागील 24 तासांमध्ये 18469 नवे रुग्ण सापडल्याने एकूण रुग्णांची संख्या 142746 वर पोहोचली आहे. अमेरिकेत या विषाणूने आतापर्यंत 2489 जणांचा जीव घेतला आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क प्रांतात कोरोनाच्या बळींची संख्या 1 हजारासमीप पोहोचली आहे. अमेरिकेत 24 तासांमध्ये 518 जणांचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आर्थिक राजधानी संकटात

कोविड-19 चा केंद्रबिंदू ठरलेल्या अमेरिकेच्या न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा प्रकोप कमी होण्यापूर्वी हजारो लोकांचा मृत्यू होणार असल्याचा इशारा गव्हर्नर अँड्रय़ू क्युमो यांनी दिला आहे. न्यूयॉर्कमध्ये एका दिवसात कोरोनाच्या बळींची संख्या 237 ने वाढून 965 वर पोहोचली आहे. एका दिवसातील तेथील बळींचा हा आकडा सर्वाधिक आहे. न्यूयॉर्कमधील रुग्णांची संख्या आता 33768 झाली आहे.

इटलीत बिकट स्थिती

इटलीत एकूण रुग्णांची संख्या वाढून 97689 वर गेली आहे. तेथे 756 जणांचा एका दिवसात मृत्यू झाल्याने बळींचा आकडा 10779 वर पोहोचला आहे. इटलीत कोरोनाच्या बळींची संख्या चीनच्या तुलनेत तिप्पट झाली आहे. पंतप्रधान ग्यूसेप कोंटे यांनी देशवासीयांना ‘अत्यंत दीर्घकालीन’ टाळेबंदीसाठी तयार राहण्यास सांगितले आहे. टाळेबंदी भविष्यात टप्प्याटप्प्याने हटविण्याची योजना आहे.

स्पेनमध्ये बळी वाढले

स्पेनमध्ये मागील 24 तासांमध्ये 5085 नवे रुग्ण सापडले आहेत. तेथील एकूण रुग्णांची संख्या आता 85195 झाली आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 7340 जणांचा बळी गेला आहे. स्पेनमध्ये एका दिवसात 812 जणांनी जीव गमावला असून तेथील टाळेबंदी अधिकच कठोर करण्यात आली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी वगळता इतरांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आल आहे.

ब्रिटनमध्ये 1228 बळी

कोरोना संसर्ग दुसऱया टप्प्यात पोहोचल्याचा इशारा ब्रिटनचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी जेनी हॅरीज यांनी दिला आहे. ब्रिटनमध्ये 6 महिन्यांची टाळेबंदी लागू केली जाऊ शकते.टाळेबंदीच्या निर्णयाने फैलाव रोखण्यास यश मिळाले आहे की नाही हे लवकरच दिसून येईल असे त्यांनी म्हटले आहे. ब्रिटनमध्ये कोरोनामुळे 1228 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण रुग्णांची संख्या 19522 वर पोहोचली आहे.

चीनमध्ये 31 नवे रुग्ण

चीनमध्ये 31 नवे रुग्ण आढळून आले असून यातील 30 जण विदेशातून आल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली आहे. रविवारी हुबेई प्रांतात 4 जणांचा मृत्यू झाला आहे. तर वुहान शहरात 8 एप्रिलपर्यंत टाळेबंदी लागू राहणार आहे. चीनमध्ये आतापर्यंत कोरोनामुळे 3304 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर रुग्णांची संख्या 81470 झाली आहे.

फ्रान्समध्ये बळी वाढले

फ्रान्सच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसने एका दिवसात 292 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. तेथील बळींचा आकडा वाढून 2606 झाला आहे. तत्पूर्वी शनिवारी तेथे 319 जणांना जीव गमवावा लागला होता. तर एकूण रुग्णांची संख्या आता 40 हजार 174 झाली आहे. फ्रान्स सरकारने उचललेल्या पावलांचा प्रभाव काही प्रमाणात दिसून येऊ लागला आहे.

पाकिस्तानातील सर्वात मोठे शहर कराचीमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. पाकमध्ये कोरोनाचे 27 टक्के रुग्ण स्थानिक फैलावामुळे उद्भवल्याचा दावा तेथील सरकारने केला आहे. पाकिस्तानात आतापर्यंत 1625 रुग्ण सापडले आहेत. तर 18 जणांना जीव गमवावा लागला आहे. पाकिस्तानात मागील 24 तासांमध्ये 120 नवे रुग्ण सापडले आहेत. सिंध प्रांतात सर्वाधिक 508 रुग्ण आढळले आहेत.

रशियात 1534 रुग्ण

रशियात 3 अँटीव्हायरल औषधांची निर्मिती करण्यात आली आहे. ही औषधे कोरोनाच्या उपचारासाठी उपयुक्त ठरू शकतात. ट्रायजॅविरिन, फॅविफिराविर आणि फोर्टेप्रेन अशी त्यांची नावे आहेत. ट्रायजॅविरिन आणि फॅविपिराविर यांची चाचणी पूर्ण झाली आहे. तर फोर्टेप्रेनची चाचणी सुरू आहे. तर चीनचे संशोधक कोरोनावरील याच्या प्रभावाची तपासणी करत आहेत.

बांगलादेशात आतापर्यंत 49 जणांना लागण झाली असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. टाळेबंदीच्या दरम्यान ढाका येथे गुन्हय़ांचे प्रमाण घटले आहे. पोलीस सर्वसाधारपणे शहरात 200 पेक्षा अधिक जणांना अटक करत होते. परंतु कोरोनाच्या भीतीमुळे गुन्हेगार घरातून बाहेर पडत नसल्याचे पोलीस अधिकारी जफर हुसैन यांनी सांगितले आहे. बांगलादेशात 80 वर्षीय महिला संसर्गापासून मुक्त झाली आहे.

ब्राझील अध्यक्षांचा वादग्रस्त ट्विट

कोरोना विषाणूला सामान्य फ्लू संबोधिणारे ब्राझीलचे अध्यक्ष जेर बोल्सोनारो पुन्हा वादात सापडले आहेत. ट्विटरने विलगीकरणसंबंधी प्रश्न उपस्थित करणारे बोल्सोनारो यांचे दोन ट्विट हटविले आहेत. समाजमाध्यम संकेतस्थळाने नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी ही कारवाई केली आहे. ब्राझीलमध्ये आतापर्यंत 4256 रुग्ण आढळले आहेत. तर 136 जणांना जीव गमवावा लागला आहे. बहुतांश रुग्ण साओ पावलो येथे आढळून आले आहेत. प्रांतीय सरकारच्या सामाजिक दुराव्याच्या नियमांना पायदळी तुडवत बोल्सोनारो हे ब्राझिलियाच्या रस्त्यांवर स्वतःच्या समर्थकांना भेटले होते.

जपानमध्ये विनोदवीराचा मृत्यू

कोरोना संसर्गामुळे जपानचे विनोदवीर केन शिमुरा यांचा मृत्यू झाला आहे. 70 वर्षीय शिमुरा यांच्यात 17 मार्च रोजी कोरोनाची लक्षणे दिसून आली होती. जपान सरकार आता अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया आणि युरोपीय देशांमधून येणाऱया लोकांवर बंदी घालण्याचा विचार करत आहे. जपानमध्ये रुग्णांची संख्या आता 1866 वर पोहोचली आहे. तर 54 जणांचा मृत्यू झाला आहे.

Related Stories

शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांच्या पत्नीची आत्महत्या

datta jadhav

रशिया थकबाकीदार ठरण्याची भीती

Patil_p

LPG गॅस सिलिंडर महागला

datta jadhav

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 5 कोटींवर

datta jadhav

महाराष्ट्रातले काही मंत्री केंद्रामध्ये आहेत, त्यांनी केंद्राकडून दोन हजार कोटींचा चेक घेऊन यावा – संजय राऊत

Abhijeet Shinde

भारतीय मुलीकडून ‘नव्या भविष्यासाठी नवे व्हिजन’

Patil_p
error: Content is protected !!