Tarun Bharat

इतिहासप्रेमी नागरिकांच्या सतर्कतेने वाचला हजार वर्षांपूर्वीचा शिलालेख

मिरज सुधारणा कमिटीचा पुढाकार : किल्ल्याच्या उत्तर दरवाजात होता लेख

मिरज / मानसिंगराव कुमठेकर

मिरजेतील भुईकोट किल्ल्याच्या उत्तर दरवाजालगत मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेला शिलाहार कालीन सन 1144 मधील ऐतिहासिक शिलालेख शहरातील इतिहासप्रेमी नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला. सदरचा शिलालेख हा कोल्हापूर येथील म्युझियममध्ये ठेवण्यात आला असून, मिरज शहर सुधारणा कमिटीचे तत्कालीन उपाध्यक्ष गुलाब मिरासाहेब चिनावडे यांनी त्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला होता. त्यांच्या पाठपुराव्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मौल्यवान शिलालेख जतन झाला आहे.

मिरज शहर ऐतिहासिक आहे. या शहरात सातवाहन, चालुक्य, शिलाहार, यादव या राजांची सत्ता होती. या काळातले शिलालेख, ताम्रपट, शहरात आढळून आले आहेत. मिरजेच्या भुईकोट किल्ल्याच्या उत्तर बाजूस असलेल्या आणि बंकाचा दरवाजा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या दरवाजाजवळ एक भला मोठा शिलालेख ठेवला होता. हा शिलालेख हळेकन्नड लिपीत होता. मात्र, 1964 च्या सुमारास या उत्तर दरवाजाजवळ एका व्यक्तीने आपल्या घराचे बांधकाम करताना सदरचा शिलालेख मातीच्या ढिगाऱ्याखाली टाकला होता. सदरच्या शिलालेखाचे वाचन 19 व्या शतकात तत्कालीन पुरातत्त्व अभ्यासकांनी केले होते. हा शिलालेख चार फेब्रुवारी 1144 मधील असून, तो शिलाहार राजा विजयादित्य याच्या कारकिर्दीत लिहिला गेला होता. शेडबाळ येथे मादिराजाने बांधलेल्या महादेवेश्वराच्या मंदिरासाठी मिरज आणि परिसरातील व्यापाऱ्यांनी दान दिल्याचा उल्लेख शिलालेखात आहे. वीरवणज या व्यापारी श्रेणीतील व्यापाऱ्यांनी मंदिरासाठी विविध प्रकारचे दान दिले होते. तत्कालीन धार्मिक आणि व्यापारी इतिहासाच्या दृष्टीने हा शिलालेख महत्त्वाचा होता.

मात्र, हा शिलालेख मातीच्या ढिगाऱ्याखाली घालून तो नष्ट करण्याचा प्रयत्न काही व्यक्त करीत होत्या. त्यावेळी तत्कालीन मिरज शहर सुधारणा कमिटीने त्यास विरोध करीत शिलालेख जतन व्हावा, यासाठी वारंवार पाठपुरावा केला. सदर संस्था ही 1963 साली स्थापन झाली होती. मिरज शहरातील काही प्रतिष्ठीत नागरिकांनी एकत्र येत शहर सुधारणेसाठी जागृती निर्माण व्हावी, या हेतूने ही संस्था स्थापन केली. गुलाबसाहेब मिरासाहेब चिनवाडे हे या संस्थेचे प्रमुख पदाधिकारी होते. त्यांना सदरच्या शिलालेखाच्या दूरवस्थेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सन 1964 च्या फेब्रुवारी महिन्यापासून बांधकाम विभाग, जिल्हाधिकारी, सिटी सर्व्हे कार्यालय, तहसीलदार यांसह संबंधीत सर्व कार्यालयाकडे अर्ज करुन सदरच्या शिलालेखाचे महत्त्व आणि त्याच्या जतनाची आवश्यकता पटवून दिली होती. त्यासाठी त्यांनी शिलालेखाचे नकाशेही काढून पाठविले होते. बांधकामात असे दगड वापरु नयेत, यासाठी प्रतिबंध करावा, अशी मागणी त्यांनी केली होती.
गुलाबसाहेब चिनवाडे हे इतिहासप्रेमी असल्यामुळे त्यांना या शिलालेखाचे महत्त्व माहित होते. त्यांनी किल्ल्याच्या दरवाजात असलेल्या शिलालेखाच्या जतनासाठी केलेल्या प्रयत्नांबाबतचे काही कागद नुकतेच मिरज इतिहास संशोधन मंडळाच्या हाती लागले आहेत. एक ऐतिहासिक ठेवा जतन व्हावा, म्हणून गुलाबसाहेब चिनवाडे यांनी केलेल्या प्रयत्नांची माहिती या कागदातून होते. गुलाबसाहेब चिनवाडे यांनी सलग पाच वर्षे या शिलालेखासाठी पाठपुरावा केला. अखेर 1970 साली हा शिलालेख कोल्हापूर येथील म्युझियममध्ये ठेवण्यात आला. मात्र, त्याचीही खात्री गुलाबसाहेब चिनवाडे यांनी प्रत्यक्ष कोल्हापूर येथे जावून करुन घेतली आणि त्यानंतरच त्यांनी आपल्या मागणीला पूर्णविराम दिल्याचे दिसते.

गुलाबसाहेब चिनवाडे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्राच्या इतिहासाचा एक मौल्यवान ठेवा नष्ट होण्यापासून वाचला. आणि तो सुरक्षित ठिकाणी पोहचविण्यात यश मिळाले. आजही असे अनेक शिलालेख गावोगावी नष्ट होत आहेत. त्याचे जतन करण्यासाठी गुलाबसाहेब चिनवाडेंसारखे इतिहासप्रेमी नागरिक गावोगावी निर्माण झाले पाहिजेत.

Advertisements

Related Stories

महावितरणमध्ये २५ हजारांवर पदे रिक्त

Abhijeet Shinde

अकोला, अमरावती आणि यवतमाळमध्ये लॉकडाऊन?; अजित पवार म्हणाले…

Rohan_P

सांगली जिल्हय़ात नवे 1010 तर 38 जणांचे मृत्यू

Abhijeet Shinde

सांगली : हरिपूरमध्ये आठवडाभर जनता कर्फ्यु

Abhijeet Shinde

सर्वपक्षीय बैठकीत भोंग्यांबाबत काय निर्णय झाला?

datta jadhav

चूल आणि मूल यावरच न थांबता महिलांनी पुढे यायला हवे – आ.मानसिंगराव नाईक

Abhijeet Shinde
error: Content is protected !!