Tarun Bharat

इतिहासाची प्रेरणा देणारा ‘जाणता राजा’

सध्या शाळांच्या वार्षिक स्नेहसंमेलनांचे दिवस सुरू आहेत. शाळांच्या अशा समारंभात बरेचदा चित्रपटातील नृत्य किंवा इतर मनोरंजन कार्यक्रम सादर केले जातात. मात्र शालेय विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांच्या तेजस्वी इतिहासाचे बाळकडू देणारा ‘जाणता राजा’ हा नाटय़प्रयोग सादर करून इतिहासाचा धडाच देण्यात आला. बाल विद्यार्थ्यांसह युवा कलाकारांनी पुन्हा एकदा इतिहासाची पाने चाळून पाहण्याची प्रेरणा या नाटय़ाव्दारे दिली.

शालेय मुलांना अभ्यास शिकविला जातो. विद्यार्थी काय शिकले याकरिता परीक्षा घेतल्या जातात. पण त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्ये सुप्तावस्थेत असलेल्या सर्व गुणांना वाव देण्यासाठी क्रीडास्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. क्रीडा स्पर्धा, विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्याना व्यासपीठ उपलब्ध होते. त्या ठिकाणी आपले कौशल्य सादर करण्याची संधी मिळते.

सर्वच शाळांमध्ये स्नेहसंमेलने आयोजित करण्याची परंपरा आहे. स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी असते. यामुळे मुलांचे मनोरंजन होतेच, तसेच पालकांनादेखील आपल्या मुलांचे कलागुण पाहण्याची संधी मिळते. प्रत्येक शाळेत स्नेहसंमेलनानिमित्त सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये मुलांना प्रेरणादायी किंवा सत्य घटनेवर आधारीत नाटय़ बसवून विद्यार्थ्याना नवा अनुभव देण्याचा प्रयत्न शिक्षक व शाळा प्रशासन करीत असते. या व्यतिरीक्त चित्रपटाच्या गीतावर नाच करतात. पण केवळ डान्स, नाटय़ यावर समाधान न मानता आपली संस्कृती आणि इतिहासाचे बाळकडू पाजण्याचा प्रयत्न गजाननराव भातकांडे इंग्रजी माध्यम शाळेचे अध्यक्ष मिलींद भातकांडे यांनी केला आहे.

स्नेहसंमेलनाच्या व्यासपीठावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची महती सांगणारे ‘जाणता राजा’ हे नाटय़ अवतरले. नाटय़ामध्ये शाळेतील शंभर मुलांनी विविध भूमिका साकारून शाळेतील बालकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाचा इतिहास जागवण्याचा प्रयत्न केला. एरवी शाळांमध्ये स्नेहसंमेलनामध्ये नाटय़ आणि चित्रपटातील डान्स केले जातात. पण गजाननराव भातकांडे शाळेत आगळा-वेगळा कार्यक्रम करून हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना कशी केली, याचा धडा विद्यार्थ्याना दिला. गजाननराव भातकांडे शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनात साकारण्यात आलेले ‘जाणता राजा’ हे नाटय़ सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले.

निशांत जाधव ग्रुप, शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षकांच्यावतीने एक तासाचे ‘जाणता राजा’ हे नाटय़ सादर केले. एरवी वर्गात पुस्तकातील धडे देणाऱया शिक्षिकांनी विद्यार्थ्याना प्रोत्साहन देण्यासाठी ‘जाणता राजा’ नाटय़ामध्ये विविध भूमिका साकारल्या. यामध्ये शाळेच्या प्राचार्या दया शहापूरकर यांनी जिजाऊंची भूमिका तसेच अन्य शिक्षकांनीदेखील विविध भूमिका साकारून शिक्षण आणि विद्यार्थ्याचे नाते बाजूला ठेवून नाटय़ामध्ये एकरूप झाल्याचे दिसून आले. यामुळे शिक्षकच आपल्याबरोबर भूमिका साकारत असल्याचे पाहून विद्यार्थ्यांचा उत्साह व्दिगुणित झाला. पुस्तकी ज्ञान देत असताना विद्यार्थ्यामध्ये एकरूप होणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते. पण गजानन भातकांडे शाळेतील शिक्षकांनी विद्यार्थ्यामध्ये एकरूप होऊन इतिहासाचे धडे दिले.

नाटय़ामध्ये आदिलशाहीत महिलांवर होणारे अन्याय, शिवाजी महाराजांचा जन्म सोहळा, अन्याय करणाऱयाविरोधात शिवाजी महाराजांनी दिलेला न्याय, धर्मवीर संभाजी महाराजांचा विवाह जुळविण्याचा प्रसंग आणि शिवराज्याभिषेक सोहळा असे विविध प्रसंग एका तासात सादर करण्यात आले. एक तासाच्या कालावधीत सर्व पालक खुर्चीला खिळुन बसले होते. अल्पावधीत तयारी करण्यात आलेल्या नाटकामध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्कृष्टरित्या आपल्या भूमिका सादर केल्या. यामुळे टाळय़ांनी अभिनंदन केले.

नाटकाचे दिग्दर्शन निशांत जाधव यांनी केले. प्रथमच नाटकाच्या व्यासपीठावर भूमिका साकारणाऱया विद्यार्थी आणि शिक्षकांसमवेत सहकाऱयांनी उत्कृष्टरित्या नाटय़ सादर केले. विद्यार्थ्याना केवळ इतिहासाचे पुस्तक वाचून दाखविण्याऐवजी ‘जाणता राजा’ नाटय़ामधून इतिहास दाखविण्याचा प्रयत्न संस्थेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी केला. त्यामुळे त्यांचे अभिनंदन यावेळी करण्यात आले.

शाळेचे अध्यक्ष मिलिंद भातकांडे यांनी प्रास्ताविक करताना शाळेतर्फे येणाऱया काळात राबविण्यात येणाऱया योजनांची माहिती दिली. उद्योजक दिलीप चिटणीस, अप्पासाहेब गुरव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले . यावेळी सचिव मधुरा भातकांडे आदी उपस्थित होत्या.

अनंत कंग्राळकर

Related Stories

सण येता गोडव्याचा

Patil_p

उपवास खरा अर्थ काय?

Patil_p

क्रोध हा खेदकारी

Patil_p

महात्माजींचे महान विचार

Patil_p

तानाजी…

Patil_p

साबण आणि आपण

tarunbharat
error: Content is protected !!