Tarun Bharat

इन्सुलीत 65 लाखांची गोवा दारू जप्त

ट्रकमधून पुण्याला होत होती वाहतूक : चालक, क्लिनर ताब्यात : बॅरलच्या आडून दारू वाहतूक

प्रतिनिधी / बांदा:

गोवा बनावटीची बेकायदा दारू वाहतूक करणाऱया ट्रकवर बांदा पोलिसांनी बुधवारी पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई केली. या कारवाईत तब्बल 65 लाख 82 हजार 960 रुपये किमतीची दारू आणि पाच लाखाचा ट्रक असा एकूण 70 लाख 83 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी धुळे जिह्यातील चालक व क्लिनरवर अटकेची कारवाई करण्यात आली. अलिकडच्या काळातील बेकायदा दारू वाहतुकीविरोधातील बांदा पोलिसांची ही सर्वात मोठी कारवाई आहे. बांदा पोलिसांनी चालक विठ्ठल लहानू बोरकर (41, रा. धुळे) आणि राजू शूरसिंग सोळंकी (24, रा. बडवानी-मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले. प्राथमिक तपासात सदरची दारू पुण्याला नेण्यात येत असल्याचे उघड झाले. या कारवाईमुळे मोठय़ा प्रमाणात महसूल बुडविला जात असल्याचे समोर आले आहे.

ही कारवाई बांदा पोलीस ठाण्याचे निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी टी. टी. कोळेकर, प्रथमेश पोवार, विजय जाधव, संजय हुंबे, प्रशांत पवार यांनी केली.

                          बॅरलच्या आडून वाहतूक

याबाबत अधिक माहिती अशी की, इन्सुली पोलीस तपासणी नाक्यावर गोव्यातून सिंधुदुर्गात येणाऱया वाहनांची तपासणी सुरू होती. गोव्यातून येणारा ट्रक (एमएच- 18/एए-0024) तपासणी करण्यासाठी हेड कॉन्स्टेबल टी. टी. कोळेकर यांनी  थांबविला. चालकाने मागील हौद्यात पत्र्याचे रिकामी बॅरल असल्याचे सांगितले. तसेच त्याची वाहतूक पुण्याला करणार असल्याचे सांगितले. त्यासंबंधीचे बिलदेखील उपस्थित कर्मचाऱयांना दाखविले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने ट्रकच्या हौद्याची तपासणी करण्यात आली. ट्रकच्या हौद्यात बाहेरून बॅरल ठेवण्यात आली होती. मात्र, आत पाहणी केली असता त्यात मोठय़ा प्रमाणात गोवा बनावटीच्या दारुच्या खोक्यांचा साठा करून वाहतूक करण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले.

                         चालक, क्लिनर ताब्यात

पोलिसांनी या कारवाईत गोवा बनावटीच्या रॉयल स्टॅग, रॉयल चॅलेंज, इम्पेरियल ब्ल्यू आदींसह गोवा बनावटीच्या विविध ब्रँडचे तब्बल 65 लाख 82 हजार 960 रुपये किमतीचे 682 खोके, 5 लाख रुपये किमतीचा ट्रक व 500 रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 70 लाख 83 हजार 460 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. चालक आणि क्लिनरला ताब्यात घेण्यात आले. त्यांना गुरुवारी सावंतवाडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

                   पोलीस कर्मचाऱयांचे कौतुकास्पद काम

बांदा पोलिसांच्या इन्सुली तपासणी नाक्यावर केवळ दोन कर्मचारी काम करत असतात. दिवसागणिक हजारो वाहनांची वर्दळ असते. त्याकडे लक्ष देणे दोन कर्मचाऱयांना शक्य नसते. मात्र, अशा स्थितीतही दोन्ही कर्मचाऱयांनी मोठी कारवाई करून दाखवली. पोलीस प्रशासनाने तपासणी नाक्यावरील कर्मचारी वाढविले असते तर कारवाईचे प्रमाण वाढले असते.

                        कठोर पावले उचलण्याची गरज

गोवा राज्यात दारू स्वस्त असल्याने त्या दारुची वाहतूक महाराष्ट्रमार्गे इतर राज्यात होते. त्यातच गोव्यातून सिंधुदुर्गमार्गे मोठय़ा प्रमाणात दारू वाहतूक होते, हे या कारवाईवरून स्पष्ट होत आहे. अलिकडेच राज्य उत्पादन शुल्कच्या कोल्हापूर विभागाने कोल्हापूर येथे मोठी कारवाई केली होती. त्यानंतर महिनाभरात बांदा पोलिसांनी ही कारवाई केली. त्यामुळे मोठय़ा प्रमाणात दारू वाहतूक होते, हे स्पष्ट झाले. त्यामुळे राज्याचा करोडो रुपयांचा महसूल बुडतो. याबाबत राज्य उत्पादन शुल्कने कडक पावले उचलण्याची गरज आहे.

उत्पादन शुल्क आयुक्तांनी गोवा राज्यातून होणारी दारू वाहतूक रोखण्यासाठी सीमा भागात वायुवेग पथके तैनात करण्याची घोषणा केली होती. मात्र, आता सहा महिने होत आले तरी कार्यवाही झालेली नाही. विभागातील गाडय़ा सीमा भागात फिरताना दिसतात. मात्र, दोन-तीन कारवाई सोडल्या तर काहीच प्रगती दिसत नाही.

Related Stories

सुरक्षारक्षकाअभावी पाळंदेत पर्यटकांची

Patil_p

आंगणेवाडीतील सिंधुदुर्ग पोलीस दलाच्या कामगिरीचे ‘आयजीं’ कडून कौतुक

Anuja Kudatarkar

चाकरमान्यांच्या आगमनाने गर्दी वाढतीच

NIKHIL_N

‘मृगा’च्या मुहूर्तावर रत्नागिरीत पावसाची जोरदार ‘एन्ट्री’

Patil_p

राणेंच्या फोटोची ऍलर्जी आहे का?

NIKHIL_N

जिह्यात कोरोनाने आणखी 33 मृत्यू

Patil_p