Tarun Bharat

इम्रान खान यांचे आसन डळमळीत ?

इस्लामाबाद येथील सभेत दिले संकेत, आजपासून अविश्वास प्रस्तावावर चर्चा

@ इस्लामाबाद / वृत्तसंस्था

आपले सरकार गेले तरी चालेल, कुणी जीव घेतला तरी चालेल, पण गुन्हेगारांना  आणि भ्रष्टाचाऱयांना सोडणार नाही, अशी निर्वाणीची भाषा पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. ते पाकची राजधानी इस्लामाबाद येथे आयोजित एका सभेत बोलत होते. त्यांच्या भाषणावरुन त्यांचे आसन डळमळीत झाल्याचे संकेत मिळतात, असे मत राजकीय तज्ञांनी व्यक्त केले आहे. परकीय शक्ती आपल्याला पदच्युत करण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप इम्रानने केला.

पाकिस्तानमध्ये सध्या राजकीय अस्थिरता शिगेला पोहचली आहे. इम्रान खान यांच्या तेहरिक ए इन्साफ या पक्षाचे बहुमत धोक्यात आले आहे. काही मित्रपक्षांनी पाठिंबा काढून घेतल्याने सरकार अल्पमतात आल्याचा दावा केला जात आहे. विरोधी पक्षांनीही एकत्र येऊन सरकार विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला आहे. या प्रस्तावावर आज सोमवारपासून तेथील संसदेत चर्चा होणार आहे.

स्थिती डळमळीत

पाकिस्तानची सध्या आर्थिक संकटाने दुर्दशा झाल्याचे बोलले जाते. महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल दीडशे रुपये लीटर तर साखर 100 रुपये किलो असा दर आहे. बटाटे, कांदे, टोमॅटो आदी नेहमीच्या पदार्थांचे दरही गगनाला मिडले आहेत. त्यातच राजकीय अस्थिरतेमुळे परिस्थिती गंभीर बनली आहे.

सरकार वाचविण्याचे प्रयत्न

अशा स्थितीत इम्रान खानने आपले सरकार वाचविण्यासाठी धडपड सुरु केली असून इस्लामाबाद येथील सभा हा याच प्रयत्नांचा एक भाग आहे. या सभेत त्यांनी सरकारने केलेल्या प्रगतीचा पाढा वाचला. तसेच भविष्यातील योजनांचीही माहिती देण्याचा प्रयत्न केला. काही परकीय शक्ती एकत्र येऊन पाकिस्तानातील सरकार उध्वस्त करीत आहेत. मात्र आपण त्यांना पुरुन उरणार असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधी पक्षाचे नेते बिलावल भुत्तो झरदारी यांनी त्यांनी निंदा केली.

समझोत्याची तयारी

सरकार वाचविण्यासाठी विरोधी पक्षांशी समझोता करण्यास इम्रानची तयारी आहे, असे काही सूत्रांचे म्हणणे आहे. अर्थसंकल्प संमत करुन घेऊन त्वरित मध्यावधी निवडणुकीची घोषणा करण्यास त्यांची तयारी आहे. तसेच विरोधी पक्षनेत्यांना संसदेत अध्यक्ष स्थान देण्याच्या तोडग्यावरही विचार होऊ शकतो. मात्र अद्याप तरी विरोधी पक्षांनी हा प्रस्ताव स्वीकारलेला नाही, असे दिसून येते.

50 मंत्री बेपत्ता

शनिवारी इम्रान मंत्रीमंडळातील 50 मंत्री अज्ञात स्थळी गेले आहेत. ते अधिवेशनास न आल्यास सरकारसमोरचा बहुमताचा प्रश्न अधिक कठीण होऊ शकतो. तसेच रविवारी आणखी एका मित्रपक्षाने पाठिंबा काढण्याची घोषणा केल्याने सरकार अल्पमतात जाणे हे निश्चित आहे, अशी चर्चा आहे.

परकीय शक्ती कोण

इम्रानखानने सभेतील भाषणात परकीय हात सरकार अस्थिर करत असल्याचा आरोप केला होता. मात्र, ते कोणाकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत, यावर उलट सुलट बोलले जात आहे. अमेरिका किंवा काही युरोपियन देशांकडे ते बोट दाखवत आहेत, असा एक मतप्रवाह आहे, तर अन्य तज्ञांच्या मतानुसार काही मुस्लीम देशच इम्रानचे विरोधक आहेत. भारताचा यात  हात आहे असा आरोप इम्रानखान किंवा कोणीही स्पष्टपणे केलेला नाही एकंदर स्थिती नाजूक असून सरकारने वेळेवर स्वतःला सावरुन बहुमतची व्यवस्था केली नाही, तर अविश्वास दर्शक प्रस्तावावर काय होईल याची शाश्वती देता येणे कठीण आहे, असा दावा इम्रान खान यांच्या पक्षाच्याच एका ज्येष्ठ नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर केला.

Related Stories

श्रीलंकेत पेट्रोल-डिझेल संपण्याच्या मार्गावर

Patil_p

अवघ्या 27 लोकांचा देश

Patil_p

मध्यम वयाचे लोक अधिक सक्रीय

Patil_p

आंदोलकांना दिसताक्षणी गोळ्या घाला; कझाकिस्तान सरकारचे आदेश

datta jadhav

किशोरवयीनांना संस्कृतीशी जोडण्याचा पुढाकार

Amit Kulkarni

मेलबर्न शहरात पुन्हा टाळेबंदी

Patil_p