Tarun Bharat

इम्रान खान सत्तेतून ‘आऊट’

शाहबाज शरीफ यांच्याकडे पंतप्रधानपदाची धुरा शक्य

इस्लामाबाद / वृत्तसंस्था

गेल्या पंधरा दिवसांपासून इम्रान खान यांना सत्तेपासून दूर घालवण्यासाठी विरोधी पक्षांनी सुरू केलेले प्रयत्न अखेर फळास आले. शनिवारी मध्यरात्री असेंब्लीमध्ये घडलेल्या अभूतपूर्व सत्तासंघर्षानंतर इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने एकूण 174 मते पडल्याने हा प्रस्ताव मंजूर झाला. आता पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनण्याचा मार्ग सुकर झाला आहे. शाहबाज शरीफ हे सध्या पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीतील विरोधी पक्षनेते आहेत. सोमवारी, 11 एप्रिलला पंतप्रधानपदाबाबत सभागृहात बैठक बोलावण्यात आली आहे. याच बैठकीत नव्या पंतप्रधानांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात विरोधी पक्षांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आल्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांना आता आपली खुर्ची सोडावी लागणार आहे. इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव दाखल केल्यापासून अनेक नाटय़मय घडामोडी पाकिस्तानच्या राजकारणात घडल्याचे दिसून आले. शनिवारी सकाळपासून अविश्वास प्रस्तावावर विविध प्रकारे राजकारण रंगले होते. इम्रान खान अविश्वास प्रस्तावावरील मतदान टाळण्यासाठी बरीच फिल्डिंग लावून आणि टोलवाटोलवी करूनही त्यांना नशीबाची साथ मिळू शकली नाही. मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास अविश्वास प्रस्तावावर मतदान पार पडले. यामध्ये प्रस्तावाच्या बाजूने तब्बल 174 मते पडल्याने इम्रान खान सरकार कोसळले.

मतदानापूर्वीच असेंब्लीच्या अध्यक्षांचा राजीनामा

पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत (संसद) मतदान पार पडण्याआधीच असेंब्लीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. असद कैसर यांच्यानंतर आता पीएमएल-एन नेते अयाज सादिक हे नॅशनल असेंब्लीच्या अधिवेशनाचे हंगामी अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. दुसरीकडे, पाकिस्तानचे ऍटर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी राजीनामा दिला आहे. देशात नवे सरकार अस्तित्वात आल्यानंतर त्यांच्या जागीही नवी नियुक्ती अपेक्षित आहे.

‘विश्वास’ गमावणारे इम्रान खान पहिले पंतप्रधान

पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाविरोधात अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाला. त्यानंतर इम्रान खान यांनी असेंब्लीबरोबरच पंतप्रधान कार्यालय आणि सरकारी निवासस्थान सोडले. आता सोमवारी, 11 एप्रिलला पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीचे विशेष अधिवेशन आमंत्रित करण्यात आले आहे. या अधिवेशनात पाकिस्तानच्या आगामी नेतृत्त्वाची निवड केली जाणार आहे. पंतप्रधान निवडला जाईल. नवीन पंतप्रधान पाकिस्तानातील पुढच्या निवडणुका होईपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर 2023 पर्यंत कार्यभार सांभाळतील. इम्रान खान हे विश्वास गमावल्यानंतर स्वगृही पाठवले जाणारे देशाच्या इतिहासातील पहिले पंतप्रधान बनले.

नव्या पंतप्रधानांची आज निवड

शाहबाज शरीफ, कुरेशी यांचे उमेदवारी अर्ज सादर

पंतप्रधानपदासाठी इच्छूक उमेदवारांना नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी नॅशनल असेंब्लीचे कार्यकारी अध्यक्ष अयाज सादिक यांनी रविवारी स्थानिक वेळेनुसार 11 वाजेपर्यंत मुदत दिली होती. त्यानुसार पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी रविवारी स्वतःला पंतप्रधानपदासाठी नामनिर्देशित केले, तर माजी सत्ताधारी पक्ष पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफने (पीटीआय) शाह मेहमूद कुरेशी यांनी पंतप्रधानपदासाठी अर्ज दाखल केला आहे.

पीएमएल-एनचे ज्ये÷ नेते ख्वाजा आसिफ आणि राणा तनवीर यांनी शाहबाज शरीफ यांना अनुमोदन दिले आहे. तर दुसरीकडे इम्रान खान यांच्या पक्षाने 65 वषीय माजी परराष्ट्रमंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना पंतप्रधानपदासाठी उमेदवार म्हणून नामनिर्देशित केले. पीटीआय नेते आमिर डोगर आणि अली मुहम्मद खान त्यांनी त्यांच्या उमेदवारीला अनुमोदन दिले आहे.

अविश्वास प्रस्तावानंतर….

पाकिस्तानात आम्ही राज्यघटना आणि कायदा व्यवस्था पुन्हा आणू इच्छित आहोत. आम्ही कुणाचाही बदला घेणार नाही. मात्र, कायदा आपले काम करेल.

– शाहबाज शरीफ, पीएमएल-एनचे अध्यक्ष

10 एप्रिलला ऐतिहासिक महत्व आहे. 1973 साली 10 एप्रिललाच सभागृहात राज्यघटना मंजूर झाली होती. जुन्या पाकिस्तानात तुमचे स्वागत आहे.

– बिलावल भुट्टो, पीपीपीचे अध्यक्ष

साडेतीन वर्षांनंतर इम्रान खान पायउतार

पाकिस्तान क्रिकेट टीमचे कर्णधारपद भूषवलेले इम्रान खान यांनी दोन दशकांपूर्वी राजकारणात येत ‘पीटीआय’ (पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ) पक्षाची स्थापना केली. 2018 साली ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचे आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसमोरील अडचणी वाढतच गेल्या. गेल्यावषी मार्च महिन्यात इम्रान खान यांच्या पक्षातून अनेक नेते बाहेर पडले. त्यानंतर खऱया अर्थाने राजकीय संघर्ष सुरू झाला होता. या संघर्षाला गेल्या महिन्यापासून अधिकच धार चढली होती.

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर मतदान

गेल्याच आठवडय़ात इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला होता. मात्र, पाकिस्तानच्या संसदेचे अध्यक्ष कासिम सूरी यांनी इम्रान खान यांच्याविरोधात विरोधकांनी मांडलेला अविश्वास ठराव फेटाळून लावला होता. मात्र, हे प्रकरण पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायालयाने कासिम सूरी यांचा निर्णय रद्दबातल ठरवत अविश्वास ठरावाची वाट मोकळी करून दिली. त्यानुसार, शनिवारी इम्रान खान यांच्याविरोधात संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडण्यात आला. रात्री उशिरा या ठरावावर झालेल्या मतदानामध्ये 174 संसद सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्यामुळे इम्रान खान सरकार कोसळले.

Related Stories

भारत तटस्थ, जपानने बदलली योजना

Patil_p

तालिबान सरकारची आज घोषणा; मुल्ला बरादर करणार नेतृत्व

datta jadhav

कोरोना विषाणू नष्ट करणारी लस तयार

Patil_p

मारियुपोलमधील बचावकार्य सुरूच

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबळींची संख्या दीड लाखांवर

datta jadhav

15 लाख मुलांना तस्करीचा धोका

Omkar B