Tarun Bharat

इराणमध्ये अणुशास्त्रज्ञाची दहशतवाद्यांकडून हत्या

इस्त्रायलवर संशय : तेहरानमध्ये दिवसाढवळय़ा चकमक

तेहरान / वृत्तसंस्था

‘द फादर ऑफ इरानियन बॉम्ब’ अशी ओळख असलेले इराणमधील अणुबॉम्बचे जनक वैज्ञानिक मोहसिन फखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या करण्यात आली आहे. या हल्ल्यामागे इस्त्रायलचा हात असल्याचे पुरावे सापडल्याने इराणकडून हा आरोप करण्यात येत आहे. इस्त्रायलने यावर टिप्पणी करण्यास नकार दिला आहे. या हत्येच्या घटनेमुळे इराणचा इस्त्रायलसोबतचा तणाव आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. वैज्ञानिकावरील हत्येची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेकडून घेण्यात आलेली नाही. इराणचे परराष्ट्रमंत्री जवाद जरीफ मोहम्मद यांनी या हत्येची तीव्र शब्दांमध्ये निंदा केली आहे.

फखरीजादेह हे प्रवास करत असताना तेहरानजवळ हल्लेखोरांकडून त्यांच्या कारवर गोळीबार करण्यात आला. फखरीजादेह हे 2003 पासून इराणच्या गुप्त अणुबॉम्ब निर्मिती मोहिमेचे नेतृत्व करत होते. मात्र, इराणकडून आण्विक हत्यारे बनविण्याच्या आरोपांचे नेहमी खंडण करण्यात येत होते. इराणचे मिलिट्री कमांडर हिसैन देहघन यांनी ट्विट करून या हत्येचा मोठा बदला घेतला जाईल. तसेच या हल्ल्यात असलेल्यांना भविष्यात पश्चाताप होईल, अशी धमकीसुद्धा देण्यात आली आहे.

कशी करण्यात आली हत्या?

संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि नवीन उत्पादन विभागाचे प्रमुख मोहसिन फखरीजादेह यांना घेऊन जाणाऱया कारला सशस्त्र दहशतवाद्यांनी लक्ष्य केल्याचे इराणच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. यावेळी झालेल्या चकमकीदरम्यान फखरीजादेह यांचे अंगरक्षक आणि दहशतवादी यांच्यात झटापट झाली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. पण दुर्दैवाने त्यांना वाचवण्याचे वैद्यकीय पथकाचे प्रयत्न अयशस्वी ठरले. या हल्ल्यादरम्यान तिथे असणाऱयांना आधी एक स्फोट ऐकू आला आणि नंतर मशीनगनमधून गोळीबार करण्याचा आवाज आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

मोहसिन फखरीजादेह यांची ओळख

मोहसिन फखरीजादेह हे इराणचे सर्वात महत्त्वाचे अणुशास्त्रज्ञ होते. इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे ते प्रमुख होते. पाश्चिमात्य देशातील संरक्षण तज्ञांच्या मते ते इराणमधील अतिशय प्रभावशाली व्यक्ती होते आणि इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती. फखरीजादेह यांनीच इराणमध्ये अण्वस्त्र कार्यक्रम सुरू केला होता, असा दावा 2018 मध्ये इस्त्रायलने काही गुप्त पुराव्यांच्या आधारे केला होता.

Related Stories

जर्मनीत रूग्णवाढ

Patil_p

बोरिस जॉन्सन यांच्या अडचणीत वाढ

Amit Kulkarni

अफगाणिस्तानात पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून लूट

datta jadhav

न्यूयॉर्कमध्ये ‘रँकिंग’ प्रणालीने होणार महापौराची निवड

Amit Kulkarni

एका गोळीतून 5 दहशतवाद्यांचा खात्मा, स्नायपरची कमाल

Patil_p

ब्रिटन : लसीची तयारी

Patil_p