Tarun Bharat

इवल्याश्या काडेपेटय़ांचा दुर्मीळ खजिना खुला

संग्राहक विनायक जोशी यांच्या काडेपेटय़ा-बॉटल ओपनरचे प्रदर्शन : उद्यापर्यंत रसिकांसाठी खुले राहणार

   पुणे / प्रतिनिधी :

गाडी, घोडे, मोटारगाडय़ा, फुले, फळे, भाज्या असे वैविध्यपूर्ण छाप असलेल्या आणि त्यातून स्वतःचे वेगळेपण सिद्ध करणाऱया इवल्याश्या काडेपेटय़ांचा भला मोठा दुर्मीळ खजिना गुरुवारी रसिक पुणेकरांसाठी खुला झाला.

बालगंधर्व कलादालनात संग्राहक विनायक जोशी यांच्या काडेपेटय़ा आणि बॉटल ओपनरचे प्रदर्शन भरविण्यात आले असून, पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार आणि हुजुरपागा शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या गालिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

काडेपेटय़ा आणि ओपनरचा हा संग्रह करताना नातेवाईक आणि मित्रमंडळीची खूप मदत होत असल्याची भावना विनायक जोशी यांनी यावेळी व्यक्त केली. दुग्धजन्य पदार्थांच्या व्यवसायामुळे विनायक जोशी यांना अनेक ठिकाणी फिरस्ती करावी लागत असे. त्यावेळी प्रत्येक गावात अनेक प्रकारच्या काडेपेटय़ा दिसायच्या. त्यावरील रंगसंगती आणि त्यातील विविधता यामुळे आकर्षित होऊन त्यांनी काडेपेटय़ांचा संग्रह करायला सुरुवात केली. काही काळानंतर प्रत्येक दुकानात जाऊन नवीन प्रकारची काडेपेटी शोधून विकत घेतल्याने त्यांचा संग्रह वाढत गेला. त्यांनी केवळ काडेपेटय़ा जमवल्या नाहीत, तर त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला. हळूहळू इतर संग्रहकांशी ओळख झाली आणि आदानप्रदान होऊन त्यांच्या संग्रहात भर पडली. प्रवासाचा छंद असल्याने त्यांनी विदेशातील काडेपेटय़ा देखील जमवल्या. आज जोशी यांच्याकडे जगभरातील विविध आकाराच्या आणि वैशिष्टय़पूर्ण अशा 50 हजारांहून जास्त काडेपेटय़ांचा संग्रह असून, त्यातील दुर्मिळातील दुर्मीळ अशा सुमारे 30 हजार काडेपेटय़ा या प्रदर्शनात पुणेकरांना पाहता येणार आहेत. यामध्ये जगातील सर्वात छोटी म्हणजे एक सेंटीमीटरची आणि जगातील सर्वात मोठी म्हणजे एक फूट लांबीची काडेपेटी देखील आहे. तसेच आयटीसी अर्थात इंडियन टोबॅको कंपनीने काढलेल्या ‘आय नो’ या मालिकेतील दुर्मीळ संग्रहाचा देखील यात समावेश आहे. तसेच रामायण, महाभारत, अष्टविनायक, अजिंठा, वेरूळ यांच्यावर आधारित चित्र मालिकांच्या काडेपेटय़ा या प्रदर्शनात आहेत.

याच प्रदर्शनात काडेपेटय़ांबरोबर विनायक जोशी यांनी संग्रह केलेले बॉटल ओपनर देखील मांडण्यात आले आहेत. आज त्यांच्या संग्रहात 1200 पेक्षा जास्त ओपनर असून, त्यात स्टील, पितळ, प्लास्टिक, लोखंड, ऍल्युमिनीयम अशा विविध धातुंचे जगभरातील दुर्मीळ आणि जुने ओपनरही आहेत. हे प्रदर्शन शनिवार दिनांक 18 जानेवारीपर्यंत बालगंधर्व कलादालन येथे सकाळी अकरा ते रात्री आठ या वेळेत सर्व रसिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे.

Related Stories

पुण्यभूषणची ‘पहाट दिवाळी’ यंदा ऑनलाईन

Tousif Mujawar

जगातील सर्वात वयोवृद्ध असलेले काशीमधील शिवानंद बाबा यांनी घेतली कोरोनाची पाहिली लस

Tousif Mujawar

…अन् शनिवार वाडय़ाचा दिल्ली दरवाजा उघडला

prashant_c

लहरी पावसाची आबादानी

Patil_p

चला मुलांनो घरबसल्या पुस्तक वाचू या !

Tousif Mujawar

कोरोना योद्ध्यांच्या हस्ते श्री महालक्ष्मी मातेची प्रतिष्ठापना

Tousif Mujawar