प्रतिस्पर्धी सनरायजर्स हैदराबादला नमवूनही मुंबईचे आव्हान संपुष्टात, सनरायजर्सला वेळीच रोखण्यात अपयश
अबु धाबी/ वृत्तसंस्था
इशान किशन (32 चेंडूत 84) व सुर्यकुमार यादव (40 चेंडूत 82) यांच्या झंझावाती फटकेबाजीमुळे मुंबई इंडियन्सने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध निर्णायक लढतीत 42 धावांनी विजय प्राप्त केला असला तरी ते प्ले-ऑफमधील स्थान मात्र निश्चित करु शकले नाहीत. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना 9 बाद 235 धावांचा डोंगर रचल्यानंतर त्यांनी हैदराबादला 65 किंवा त्याहून कमी धावसंख्येत रोखणे आवश्यक होते. मात्र, प्रत्यक्षात हैदराबादने 20 षटकात 8 बाद 193 धावांपर्यंत मजल मारली आणि मुंबईचे मनसुबे अक्षरशः धुळीस मिळाले.
मुंबई इंडियन्सने या लढतीत सनरायजर्सला 171 किंवा त्याहून अधिक धावांनी विजय मिळवणे आवश्यक होते. पण, प्रत्यक्षात हैदराबादने त्यांना शेवटपर्यंत झुंजवत ठेवले. अंतिम टप्प्यात मुंबईने त्यांना 193 धावांवर कसेबसे रोखले. पण, तोवर मुंबईचे मुख्य उद्दिष्टय़ साध्य होणार नाही, हे निश्चित झाले होते.
प्रारंभी, इशान किशन व सुर्यकुमार यादव यांच्या झंझावाती अर्धशतकांमुळे मुंबईने 9 बाद 235 धावांची मोठी मजल मारली. मात्र, यानंतरही त्यांनी हैदराबादला 65 किंवा त्यापेक्षा कमी धावांवर रोखणे आवश्यक होते, ते शक्य झाले नाही.
हैदराबादविरुद्ध या शेवटच्या साखळी लढतीत मुंबईला आक्रमक फलंदाजी करणे आवश्यकच होते आणि इशान किशन यात अगदी पहिल्या चेंडूपासून कमालीचा यशस्वी ठरला. त्याने अवघ्या 32 चेंडूतच 84 धावांची आतषबाजी केली. कर्णधार रोहित शर्मा (13 चेंडूत 18) क्रीझवर असेतोवर झगडत राहिला आणि पहिल्या गडय़ाच्या रुपाने बाद झाला. इशान किशनने मात्र प्रारंभी अवघ्या 16 चेंडूत अर्धशतक साजरे केले आणि नंतरही तोच धडाका कायम राखला होता. त्याच्या फटकेबाजीमुळेच मुंबईने पहिल्या 5 षटकात 78 धावांची बरसात केली होती.


रशिद खानने नंतर रोहितला नबीकरवी झेलबाद करत ही जोडी फोडली. रोहितचा फटका चुकल्यानंतर टॉप-एज लागून उडालेला झेल नबीने मागे धावत पूर्ण केला. किशन मात्र सातत्याने तुटून पडत राहिला. त्याने रशिदला डीप मिडविकेटवरुन षटकारासाठी पिटाळले आणि मुंबईचे शतक 7.1 षटकातच फलकावर लागले. किशन नंतर 10 व्या षटकात उमरान मलिकच्या उसळत्या चेंडूवर यष्टीमागे साहाकडे झेल देत तंबूत परतला.
किशन बाद झाल्यानंतर अर्थातच हैदराबादला दिलासा मिळाला होता. पण, पाचव्या स्थानी उतरलेल्या सुर्यकुमार यादवने नेहमीच्या थाटात तोडफोड फलंदाजी करत हैदराबादच्या गोलंदाजांना अक्षरशः सळो की पळो करुन सोडले. त्यापूर्वी, तिसऱया स्थानी बढतीवर आलेल्या हार्दिक पंडय़ाचे अपयश मात्र चिंतेचे ठरले.
केन विल्यम्सनच्या जागी नेतृत्व भूषवत असलेल्या मनीष पांडेने 13 व्या षटकात डावखुरा फिरकीपटू अभिषेक शर्माला गोलंदाजीवर आणण्याची चाल उत्तम फळली. त्याने केरॉन पोलार्ड व जिम्मी नीशमला लागोपाठ चेंडूवर बाद केले. सुर्यकुमारचे ट्रेडमार्क फटके मात्र निव्वळ वाखाणण्याजोगे होते. सुर्यकुमारच्या फटकेबाजीमुळेच मुंबईला शेवटच्या 5 षटकात 58 धावांची आतषबाजी करता आली होती.
धावफलक
मुंबई इंडियन्स ः रोहित शर्मा झे. नबी, गो. रशिद 18 (13 चेंडूत 3 चौकार), इशान किशन झे. साहा, गो. उमरान 84 (32 चेंडूत 11 चौकार, 4 षटकार), हार्दिक पंडय़ा झे. रॉय, गो. होल्डर 10 (8 चेंडूत 1 षटकार), केरॉन पोलार्ड झे. रॉय, गो. अभिषेक शर्मा 13 (12 चेंडूत 1 चौकार), सुर्यकुमार यादव झे. मोहम्मद नबी, गो. होल्डर 82 (40 चेंडूत 13 चौकार, 3 षटकार), जेम्स नीशम झे. नबी, गो. अभिषेक 0 (1 चेंडू), कृणाल पंडय़ा झे. नबी, गो. रशिद 9 (7 चेंडूत 1 चौकार), नॅथन कोल्टर-नाईल झे. नबी, गो. होल्डर 3 (3 चेंडू), पियुष चावला झे. समद, गो. होल्डर 0 (2 चेंडू), जसप्रित बुमराह नाबाद 5 (2 चेंडूत 1 चौकार), ट्रेंट बोल्ट नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 11. एकूण 20 षटकात 9 बाद 235.
गडी बाद होण्याचा क्रम
1-80 (रोहित, 5.3), 2-113 (पंडय़ा, 8.3), 3-124 (इशान, 9.1), 4-151 (पोलार्ड, 12.5), 5-151 (नीशम, 12.6), 6-184 (कृणाल, 15.3), 7-206 (नॅथन कोल्टर-नाईल, 17.2), 8-230 (पियुष, 19.1), 9-230 (सुर्यकुमार, 19.4).
गोलंदाजी
मोहम्मद नबी 3-0-33-0, सिद्धार्थ कौल 4-0-56-0, जेसॉन होल्डर 4-0-52-4, उमरान मलिक 4-0-48-1, रशिद खान 4-0-40-2, अभिषेक शर्मा 1-0-4-2.
सनरायजर्स हैदराबाद ः जेसॉन रॉय झे. हार्दिक, गो. बोल्ट 34 (21 चेंडूत 6 चौकार), अभिषेक शर्मा झे. कोल्टर-नाईल, गो. नीशम 33 (16 चेंडूत 4 चौकार, 1 षटकार), मनीष पांडे नाबाद 69 (41 चेंडूत 7 चौकार, 2 षटकार), मोहम्मद नबी झे. पोलार्ड, गो. चावला 3 (4 चेंडू), अब्दुल समद झे. पोलार्ड, गो. नीशम 2 (3 चेंडू), प्रियम गर्ग झे. हार्दिक, गो. बुमराह 29 (21 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), होल्डर झे. बोल्ट, गो. कोल्टर-नाईल 1 (2 चेंडू), रशिद खान झे. व गो. बुमराह 9 (5 चेंडूत 2 चौकार), साहा झे. व गो. कोल्टर-नाईल 2 (5 चेंडू), सिद्धार्थ कौल नाबाद 1 (3 चेंडू). अवांतर 10. एकूण 20 षटकात 8 बाद 193.
गडी बाद होण्याचा क्रम
1-64 (जेसॉन, 5.2), 2-79 (अभिषेक, 6.6), 3-97 (नबी, 8.3), 4-100 (समद, 9.1), 5-156 (प्रियम, 15.1), 6-166 (होल्डर, 16.1), 7-177 (रशिद, 17.2), 8-182 (साहा, 18.4).
गोलंदाजी
ट्रेंट बोल्ट 4-0-30-1, बुमराह 4-0-39-2, चावला 4-0-38-1, नॅथन कोल्टर-नाईल 4-0-40-2, नीशम 3-0-28-2, कृणाल पंडय़ा 1-0-16-0.
मोहम्मद नबीचा डावात 5 झेलचा विक्रम!
एकीकडे, अपवाद वगळता मुंबईच्या जवळपास प्रत्येक फलंदाजाने प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर तुटून पडण्याचा सिलसिलाच सुरु केला असताना, दुसरीकडे, सनरायजर्स हैदराबादच्या मोहम्मद नबीने डावात एक-दोन नव्हे तर चक्क 5 झेल टिपण्याचा पराक्रम गाजवला. नबीने रोहित शर्मा, सुर्यकुमार यादव, जेम्स नीशम, कृणाल पंडय़ा व नॅथन कोल्टर नाईल यांचे झेल टिपले. आयपीएलमध्ये एखाद्या क्षेत्ररक्षकाने 5 झेल टिपण्याची ही पहिलीच वेळ ठरली.
हार्दिक पंडय़ाला बढतीवर पाठवण्याचा मुंबईला फटका
रोहित शर्मा व इशान किशन यांनी अवघ्या 5.3 षटकात 80 धावांचा फ्लाईंग स्टार्ट मिळवून दिल्याने मुंबईला मोठा दिलासा मिळाला होता. पण, रोहित बाद झाल्यानंतर सुर्यकुमार यादवऐवजी हार्दिक पंडय़ाला बढतीवर फलंदाजीला पाठवण्याचा निर्णय घेतला गेला आणि याचा मुंबईला मोठा फटका बसला. झगडत असलेल्या पंडय़ाला 8 चेंडूत 10 धावा करता आल्या आणि तो स्वस्तात बाद झाल्याने मुंबईचा धावांचा टेम्पो खंडित झाला.
सुर्यकुमारची 40 चेंडूत 82 धावांची आतषबाजी, पण...
नेहमीच्या तिसऱया स्थानाऐवजी पाचव्या स्थानी उतरावे लागल्यानंतर देखील सुर्यकुमारने 40 चेंडूत 82 धावा केल्या. त्याच्या खेळीत 13 चौकार व 3 षटकारांचा समावेश होता. चौफेर फटकेबाजी करणाऱया सुर्यकुमारचा स्ट्राईक रेट 205.00 इतका राहिला. पण, तिसऱया स्थानाऐवजी पाचव्या स्थानी पाठवले गेल्यानंतर त्याच्या प्रयत्नांवर काही मर्यादा राहणे साहजिक होते. साहजिकच, सुर्यकुमारने फटकेबाजी केली असली तरी तोवर बराच उशीर झाला होता.
उर्वरित लढतीची रुपरेषा
तारीख / लढत/ प्रतिस्पर्धी / वेळ
10 ऑक्टोबर / पहिली क्वॉलिफायर / चेन्नई सुपरकिंग्स वि. दिल्ली / सायं. 7.30 वा.
11 ऑक्टोबर / एलिमिनेटर / केकेआर वि. आरसीबी / सायं. 7.30 वा.
13 ऑक्टोबर / क्वॉलिफायर-2 / क्वॉलिफायर-1 पराभूत वि. एलिमिनेटर विजेता / सायं. 7.30 वा.
15 ऑक्टोबर / फायनल / क्वॉलिफायर 1-2 मधील विजेते / सायं. 7.30 वा.