प्रतिनिधी / इस्लामपूर
वाळवा तालुक्यातील किल्ले मच्छिंद्र गडावरुन दुचाकीवरुन पती समवेत खाली उतरताना चक्कर येवून पडून झालेल्या अपघातात रुक्मिणी विजय खिलारे(५५,इंदिरा कॉलनी, रस्ता क्र.२,शिवनगर, इस्लामपूर) ही महिला जागीच ठार झाली. हा अपघात शुक्रवारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास झाला.
विजय खिलारे हे पत्नी रुक्मिणी सह टीव्हीएस ज्युपिटर क्र. एम.एच-१०-६७८७ वरुन धानाई कार्वे येथे देवदर्शनासाठी गेले होते. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा मुलगा सूर्यकांत व सून दिपाली हे दुसऱ्या मोटारसायकलवरुन होते. कार्वे येथील देवदर्शन उरकून ते किल्ले मच्छिंद्र गडावर देवदर्शन करण्यासाठी आले. तेथील देवदर्शन झाल्यानंतर ते घरी येण्यास निघाले. गडावरुन खाली येत असताना दु.४ वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या वळणार असताना रुक्मिणी यांना अचानक चक्कर आली. त्यांनी पाठीमागून पती विजय यांना त्याबाबत सांगितले. ते दुचाकी थांबवत असताना रुक्मिणी या रस्त्यावरील लोखंडी अँगलवर पडल्या. त्यांच्या डोक्याला जबर मार लागला.मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला.पाठमागे असणारा मुलगा व सून अपघातस्थळी पोहचले. दरम्यान परिसरातील लोकांनी रुग्णवाहिका बोलावून जखमी रुक्मिणी यांना इस्लामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले. पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पती विजय यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात वर्दी दिली आहे.


previous post