Tarun Bharat

ईएसआय हॉस्पिटलचे होणार स्थलांतर

Advertisements

हालचाली गतिमान : क्वॉर्टर्सधारकांना देण्यात आल्या नोटिसा, उद्यमबाग-मच्छे येथे जागेची चाचपणी सुरू : उत्तर भागातील कामगारांचा विरोध

प्रतिनिधी /बेळगाव

अशोकनगर येथील ईएसआय हॉस्पिटल इतरत्र हलविण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. इमारत जीर्ण झाल्याने इतरत्र सुसज्ज हॉस्पिटल उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. उद्यमबाग-मच्छे परिसरात जागेची चाचपणी सुरू आहे. काही कामगार संघटनांनी उद्यमबाग परिसरात ईएसआय हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी केली असली तरी याला होनगा, काकती, कंग्राळी औद्योगिक वसाहतीतील कामगारांचा विरोध होत आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात ईएसआय हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी होत आहे.

कामगारांच्या सोयीसाठी शहराच्या विविध भागांमध्ये ईएसआय डिस्पेन्सरी आहेत. तर मोठय़ा शस्त्रक्रियांसाठी अशोकनगर येथे ईएसआय हॉस्पिटल आहे. या ठिकाणी 50 बेडचे हॉस्पिटल आहे. परंतु अनेक तज्ञ डॉक्टर्स नसल्याने शस्त्रक्रियांसाठी नागरिकांना इतर हॉस्पिटलवर अवलंबून राहावे लागते. त्यातच हॉस्पिटलची इमारत जीर्ण झाली असून पावसाळय़ात छत गळत आहे. रुग्णांना योग्य सुविधा उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारीही वारंवार होत असतात.

100 बेडच्या हॉस्पिटलची गरज

बेळगाव जिल्हय़ात 5 लाखांच्या जवळपास कामगार आहेत. त्यापैकी 1 लाख 10 हजार कामगारांची नोंदणी आहे. नियमावलीनुसार 1 लाख कामगारांसाठी 100 बेडचे सुसज्ज हॉस्पिटल असणे आवश्यक आहे. परंतु बेळगावमध्ये 50 बेडचे हॉस्पिटल आहे. बेळगावपेक्षा कमी कामगार संख्या असणाऱया शिमोगा जिल्हय़ात 100 बेडच्या हॉस्पिटलला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावच्या बाबतीत अन्याय का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

क्वॉर्टर्सधारकांना नोटिसा

अशोकनगर येथे हॉस्पिटलशेजारीच ईएसआय कर्मचाऱयांसाठी क्वॉर्टर्स आहेत. क्वॉर्टर्स असलेल्या इमारती जीर्ण झाल्या असून तेथे राहणे धोकादायक असल्याचे कारण देत त्यांना इमारत खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. 50 टक्के कर्मचाऱयांनी क्वॉर्टर्स खाली करून दिले आहेत. तरी उर्वरित कामगारांना लवकरच खाली करण्याच्या सूचना केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

मध्यवर्ती भागात हॉस्पिटलची गरज

मच्छे-उद्यमबाग येथे हॉस्पिटलसाठी 5 एकर जागेची पाहणी करण्यात येत आहे. प्रारंभी भाडेतत्त्वावर जागा घेण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. परंतु उद्यमबाग येथे हॉस्पिटल करण्यास शहराच्या उत्तर भागात असणाऱया औद्योगिक वसाहतीमधील कामगारांचा विरोध होत आहे. जिल्हय़ातून रुग्ण वैद्यकीय सेवेसाठी हॉस्पिटलला येत असल्याने जर उद्यमबाग येथे हॉस्पिटल झाल्यास त्या कामगारांना फटका बसणार आहे. त्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागात हॉस्पिटल सुरू करण्याची मागणी कामगारांमधून होत आहे.

Related Stories

दहावीचा निकाल उंचावण्यासाठी प्रयत्न करा

Amit Kulkarni

मॉडर्न जिमच्या स्पर्धा उत्साहात

Amit Kulkarni

जांबोटी-कुसमळी व्हाया किणये-बेळगाव बस सुरू करा

Amit Kulkarni

रविवारी बेळगाव जिल्हय़ात 319 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Tousif Mujawar

वाहने चोरणाऱया त्रिकुटाला अटक

Patil_p

गणेशोत्सवाच्या तयारीत विजेचा ‘खो’

Amit Kulkarni
error: Content is protected !!