Tarun Bharat

ईलेक्ट्रिक वाहन खरेदीसाठी राज्यात लवकरच खास योजना

वीजमंत्री निलेश काब्राल यांचे घोषणा : कुर्टी वीज खात्यात दोन कार्यालयांचे स्तलांतर

प्रतिनिधी / फोंडा

राज्यात वाहनांमुळे होणारे वाढते वायू प्रदूषण कमी करण्यासाठी ईलेक्ट्रिक बाईक म्हणजेच विजेवर चालणाऱया दुचाक्या व चारचाकी वाहनांना सरकार प्रोत्साहन देणार असून त्यासाठी लवकरच खास योजना जाहीर केली जाणार आहे. आम जनतेबरोबरच सरकारी कर्मचाऱयांसाठी ही योजना लागू करण्याचा विचार आहे. शिवाय वीज तक्रार निवारणासाठी राज्याभरात समान 1912 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित होणार असल्याची घोषणा वीजमंत्री निलेश काब्राल यांनी केली आहे.

कुर्टी-फोंडा येथील वीज खात्यामध्ये दोन विभागीय कार्यालयांचे स्तलांतर व नवीन वीज ट्रान्स्फॉर्मरच्या उद्घाटन सोहळय़ात ते बोलत होते. गुढी पाडव्याचा  मुहुर्त साधून मंगळवारी दुपारी हा स्तलांतर सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर फोंडय़ाचे आमदार रवी नाईक, फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, कुर्टीचे सरपंच सुनिल खेडेकर, नगरसेवक रितेश नाईक, आनंद नाईक, विलियम आगियार व कार्यकारी अभियंते वल्लभ सामंत हे उपस्थित होते. कुर्टी वीज खात्याच्या जुन्या गाळय़ांचे नूतनीकरण करुन त्यात दोन कार्यालयांचे स्तलांतर करण्यात आले आहे.

ईलेक्ट्रिक बाईक व कार योजना येत्या दीड महिन्यांत कार्यान्वित होणार असल्याची माहिती मंत्री काब्राल यांनी दिली. पेट्रोलवर चालणारी जुनी वाहने बदलून वीजेवर चालणारी वाहने खरेदी केल्यास त्यावर 55 टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार आहे. वीज खात्याने यापूर्वी राबविलेल्या सौर उर्जेतून वीज निर्मिती म्हणजेच सोलार योजनेचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येत आहे. ही योजना अत्यंत किफायतशीर असून ग्राहक वीज बिलांवर मोठी बचत करु शकतात. सदर योजना संपुष्टात येण्यापूर्वी ग्राहकांनी तिचा लाभ घेण्याचे आवाहन मंत्री काब्राल यांनी केले.

तक्रार निवारणासाठी टोल फ्री क्रमांक

वीज ग्राहकांच्या तक्रार निवारणासंबंधी वाढत्या तक्रारी लक्षात घेऊन यापुढे वीज खात्यातील टेलिफोनवरील ही सेवा बंद करुन त्यासाठी राज्यभर एकच समान  1912 हा टोल फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात येणार आहे. ही सेवा 24 तास कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेली तीन वर्षे कंत्राटी पद्धतीवर असलेली राज्यातील एलईडी पथदीप सेवा बंद करण्यात आली असून यापुढे वीज ही व्यवस्था हाताळणार आहे. दीर्घकाळ थकणारी वीज बिले ही वीज खात्यासमोरील मोठी अडचण बनल्याने त्यावर उपाय म्हणून दोन महिन्यांच्यावर बिलांची थकबाकी राहिल्यास संबंधीत ग्राहकांची वीज जोडणी तात्काळ कापली जाईल, असेही त्यांनी सांगितले.

अपघात टाळण्यासाठी सुधारीत वाहने पुरविणार

वीज खांबाची उघडय़ा वाहनातून वाहतूक करतेवेळी होणारे अपघात टाळण्यासाठी सुधारीत व सुरक्षित वाहने वीज खात्याला पुरविणार जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक वर्षे वीज खात्यात पडून असलेल्या भंगाराच्या सामानाची विक्री करुन त्यातून रु. 10 ते 12 कोटींचा महसूल उपलब्ध झाल्याची माहितीही त्यांनी दिली. गोव्यातील विजेचा भार वाढत असून भविष्यात अतिरिक्त पुरवठय़ाची गरज ओळखून तमनार सारखे प्रकल्प राज्यासाठी आवश्यक असल्याचे नमूद करुन वीज खात्यातील कर्मचाऱयांनी जनतेला 24 तास सेवा देण्यासाठी तत्पर राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. आमदार रवी नाईक यांनी वीज पुरवठय़ासंबंधी ग्राहकांच्या विविध तक्रारी तसेच   सुधारणांविषयी काही महत्त्वपूर्ण सूचना मांडल्या. सेवत असताना वीज कर्मचाऱयांना अपघात झाल्यास त्यांना तात्काळ मदत पुरविण्याची सोय करावी. रस्ते खोदताना पाणी विभाग, वीज खाते व अन्य संबंधीत खात्यामध्ये समन्वय राहील, यासाठी खात्यातंर्गत स्वतंत्र यंत्रणा उभारण्याची मागणी त्यांनी केली. ज्यामुळे एखाद्या खात्यातर्फे सुरु असलेल्या खोदकामावेळी अंतर्गत वीज वाहन्या तुटणार नाहीत किंवा पाण्याच्या वाहिन्या फुटून लोकांची गैरसोय होणार नाही, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. मेधा नाडकर्णी यांनी सूत्रसंचालन तर केशव गावडे यांनी आभार मानले.

Related Stories

फोंडा नगरपालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी जोरात

Amit Kulkarni

पतसंस्था बंद असल्याने सुमारे पाच लाख खातेदारांना फटका

Omkar B

एफसी गोवाची लढत होणार ब्लास्टर्सशी

Amit Kulkarni

आपच्या सात उमेदवारांचे अर्ज दाखल

Amit Kulkarni

डॉ.सावंत मंत्रीमंडळात फोंडा तालुका ठरला ‘किंगमेकर’; सुदिन आऊट

Amit Kulkarni

मोरजी मैदानासाठी सर्व सोयी सुविधा पुरवणार

Amit Kulkarni