Tarun Bharat

ईश्वराला जाणण्याची जी उत्कंठा तिलाच जिज्ञासा असे म्हणतात.

अध्याय अकरावा

उद्धवाने भगवंतांना विचारले की, “भगवंता तू अतीत असा ब्रह्मस्वरूप आहेस. मग तुला गुण, नाम आणि कर्म तरी कशाचे ? आणि कीर्तनधर्म तरी घडणार कसा ?’’ भगवंत म्हणाले, उद्धवा! असे तू मनात आणू नकोस. मी आपल्याच मायेच्या आश्रयाने आपल्या लीला करतो, अनेक अवतार धारण करतो आणि सर्वांचे पालन व संहार करतो. सर्व अवतारांमध्येही उत्तमोत्तम अशी श्रीराम, श्रीकृष्ण इत्यादिकांची जन्मकर्म, त्यांची नाना प्रकारची चरित्रे व लीला जे अखंड गायन करतात त्यांना आत्मप्राप्ती होते. या दोन्ही अवतारांची महती वर्णन करता करताच दोघेही महाकवि झाले. व्यास-वाल्मीकीना देवांनीही वंदन करून स्तुतिस्तोत्रांनी गौरविले आहे. वेदशास्त्रातील शब्दज्ञानसुद्धा माझ्या नामापुढे फिके आहे. वेदशास्त्रांचा अर्थ समजणे कठीण आहे तसे माझे नाम कठीण नाही. वेदशास्त्र पठण केले तरी मजमध्ये प्रवेश होत नाही. पण सहज म्हणून माझे नाम घेतले तरी तो माझा आवडता होतो. माझ्या नामाच्या उच्चाराने जगाचा उद्धार होतो. जेथे नित्य नामाचा उच्चार होत असतो, तेथे खरोखर मी असतो. यात विचार करण्याचे कारण नाही. नाम हे तारावयाला समर्थ आहे. जी वाणी माझे जन्म, नाम, कीर्ति किंवा गुणानुवाद पठण करत नाही, ती व्यर्थ बडवर करणारी हडळ आहे म्हणून समज. ज्या वाणीमधून नामाचा उच्चार होत नाही, ती वाणी वांझ समजावी. कारण जी वाणी हरिकथेचा गर्भ धारण करीत नाही. त्या वाणीचे इतर सर्व उद्योग निष्फळ होय. श्रीकृष्ण उद्धवाला म्हणाले, बाबा, माझा नाममार्ग अत्यंत सुगम असून परिपूर्ण आहे. तेथे इतर मार्गाचे कारणच नाही. ह्याकरिता सज्जनांनी हरीच्या नामाशिवाय वाणी ठेवूच नये. हे उद्धवाला श्रीकृष्णांनी मोठय़ा प्रेमाने सांगितले. शब्दव्युत्पत्तीचे ज्ञान करून घेतले तर त्याची योग्यता मोठी होईल, त्याला पंडितपणा प्राप्त होईल पण त्यामुळे वैराग्य प्राप्त होणार नाही व वैराग्याशिवाय माझी प्राप्ती मुळीच व्हावयाची नाही. एखादे वेळी वैराग्य उत्पन्न झाले पण ते जर विवेकाशिवायच असेल, तर ज्याप्रमाणे धृतराष्ट्र ज्येष्ठ असूनही त्याचे राज्य गेले. त्याप्रमाणे विवेकाशिवाय वैराग्य हे केवळ आंधळे व अनाधिकारी आहे हे लक्षात ठेव. त्याच्यात सन्मार्ग दिसण्याचे सामर्थ्य असत नाही. विवेकाने जो परिपूर्ण असतो, त्याच्या ठिकाणी वैराग्य आपण होऊन उतू जात असते. त्याला माझी जिज्ञासा काही विलक्षण असते. नित्यमुक्त व नाशरहित असे माझे स्वरूप जाणण्याविषयी ज्याला अगदी उत्कट इच्छा लागून राहिलेली असते. त्याला तिच्यापुढे दुसरे काहीच आठवत नाही. अशी मला जाणण्याची जी उत्कंठा तिलाच जिज्ञासा असे म्हणतात. माझ्या प्राप्तीसाठी तो विद्वत्ता व मानमरातब कधीच स्वीकारीत नाही. पूर्ण विचार करून देहादिक संसारचिंतन मिथ्या आहे असेच श्रवणाने आणि मननाने त्याने निश्चित केलेले असते. त्यामुळे गुरूच्या पायांवर त्याचा पूर्ण विश्वास असतो आणि पूर्ण ब्रह्म जाणून घेण्याचा त्याचा दृढ निश्चय असतो. पुढील मार्ग चालण्यासाठी तो भगवद्‌भजनामध्ये अत्यंत तत्पर होतो किंवा कर्माचा खटाटोप सोडून देऊन तो ध्याननि÷ होतो. तेव्हा ध्येय, ध्याता आणि ध्यान ह्या त्रिपुटीचे भान त्याला राहात नाही. जिकडे तिकडे सर्व चैतन्यच भरून राहिल्यामुळे तोही सनातन परब्रह्मच बनून राहतो. तेथे कर्ता, कर्म आणि क्रिया कशाची ? भेदभावाचा सर्व भ्रम फिटून जातो. सर्वांमध्ये केवळ जे परब्रह्म व्यापून आहे असे ज्याला वाटते, तेथेच आत्मज्ञान स्थिर होते. अशा परब्रह्माचे ध्यान ज्याच्याने करवत नाही, त्यांच्याकरताही हे चतुरा ! दुसरा एक सोपा उपाय सांगतो, ऐक. मन हे स्वभावतःच चंचळ आहे आणि विषयवासना त्याहून अत्यंत चपल आहे. यामुळे निर्गुण अशा ब्रह्मामध्ये प्रवेश करावयाचे सामर्थ्य त्या मनाला येत नाही. ते सामर्थ्य आणण्याकरिता सांख्य योग किंवा संन्यास यांचा जो मार्ग आहे, त्या मार्गातील परिश्रम चुकवावयाचे असल्यास अत्यंत उल्हासाने माझी भक्तीच वाढवावी म्हणजे झाले.

क्रमशः

Related Stories

सर्पदंशावर प्रभावहीन प्रतिसर्पविष

Patil_p

कोकण विकासाचे नवे पर्व, पण..!

Patil_p

रामायणकालीन अयोध्यानगरी

Patil_p

निवडणुकीच्या कुरुक्षेत्रातील उमेदवार आणि दावेदार

Patil_p

संभाजीराजेंची लढाई

Patil_p

दारूमुक्त गावासाठी सालेलीतील रणरागिणी सरसावल्या!

Omkar B