Tarun Bharat

उच्च न्यायालयाकडून तात्पुरता दिलासा

पायलट, बंडखोर आमदारांविरोधात मंगळवारपर्यंत कारवाई न करण्याचा राजस्थान विधानसभाध्यक्षांना आदेश,

वृत्तसंस्था / जयपूर

राजस्थानातील गेहलोत सरकारविरोधात बंड पुकारलेले काँगेस नेते सचिन पायलट आणि त्यांचे 18 समर्थक आमदार यांना राजस्थान उच्च न्यायालयाने मंगळवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंतचा दिलासा दिला आहे. या कालावधीत राजस्थान विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये असा आदेश न्यायालयाने दिला. पायलट यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी पुढे चालू राहणार आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांनी मात्र पायलट यांच्याशी जुळवून घेणे अशक्य असल्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील सत्तापेच अद्यापही कायम राहिला आहे.

दुसऱया एका घटनेत भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत आणि दोन बंडखोर आमदारांविरोधात राजस्थान सरकारने सरकार अस्थिर करण्याचे कारस्थान रचल्याचा आरोप ठेवून अभियोग सादर केला. गजेंद सिंग शेखावत यांनी एक कथित ध्वनिफित सरकारने प्रसिद्ध केली असून त्यांचा काँगेस फोडण्यात हात असल्याचे सरकारच्या वतीने सांगण्यात आले. मात्र शेखावत यांनी आरोप फेटाळले असून ध्वनिफितीतील आवाज आपला नसल्याचे स्पष्ट केले.

न्यायालयात सुनावणी

राजस्थान विधानसभा अध्यक्षांनी गेल्या शुक्रवारी पायलट व त्यांच्या समर्थक आमदारांना अपात्रतेची नोटीस पाठविली होती. त्याविरोधात पायलट यांनी राजस्थान उच्च न्यायालयात याचिका सादर केली. त्यावर काल शुक्रवारी सुनावणी झाली. ती अपूर्ण राहिली. परिणामी मंगळवारी संध्याकाळी 5.30 पर्यंत बंडखोरांवर कोणतीही कारवाई करू नये असा आदेश न्यायालयाने दिला. मंगळवारी या याचिकेवर न्यायालयाचा आदेश अपेक्षित आहे. त्यामुळे पायलट गटाला चार दिवसांचा दिलासा मिळाला. हरिष साळवे यांनी पायटल यांची बाजू मांडली.

मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीला विरोध करणे, मुख्यमंत्री हटविण्याची मागणी करणे किंवा सरकार विरोधात आंदोलन करणे याचा अर्थ सरकार पाडविण्याचा प्रयत्न असा होत नाही, असा युक्तीवाद पायलट यांच्यावतीने करण्यात आला. आम्ही सरकार बदलण्याची मागणी करत नसून मुख्यमंत्री बदलाची मागणी करत आहोत. तसेच पक्षादेश (व्हिप) केवळ विधानसभा सत्र सुरू असतानाच देता येतो असाही युक्तीवाद या गटाच्या वतीने न्यायालयात करण्यात आला.

चिदंबरम यांची भेट ?

गुरूवारी रात्री सचिन पायलट यांनी ज्येष्ठ काँगेस नेते पी. चिदंबरम यांची भेट घेतल्याचे वृत्त होते. चर्चेचा तपशील सांगण्यात आला नाही. तसेच दोन्ही बाजूंकडून भेट झाल्याच्या वृत्ताला दुजोराही मिळाला नाही. तरी सूत्रांच्या म्हणण्यानुसार दोन्ही नेत्यांनी राजस्थानतील परिस्थितीची चर्चा केली. तथापि तोडगा काय निघाला ही बाब गुलदस्त्यातच आहे, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

आता तडजोड अशक्य

पायलट आणि माझ्यात गेले एक वर्ष कोणताही संवाद नाही. आता त्यांच्याशी जुळवून घेणे अशक्य आहे, असे स्पष्ट मत मुख्यमंत्री गेहलोत यांनी पत्रकारांसमोर व्यक्त केले. पायलट यांनी सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपच्या सहकार्याने केला. हे विसरले जाऊ शकत नाही. त्यामुळे तडजोड होणे जवळपास अशक्य आहे. तरीही पक्षश्रेष्ठींच्या निर्णयाकडे आमचे लक्ष आहे, अशी भूमिका त्यांनीं मांडली. त्यामुळे पेचप्रसंग सुटण्याची चिन्हे नाहीत, असे तज्ञांचे मत आहे.

ध्वनिफित बनावट ?

केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी राजस्थान सरकार अस्थिर करण्याचा कट रचल्याचा दावा करणारी ध्वनिफित बनावट असल्याचा आरोप भाजपने केला आहे. मुख्यमंत्री गेहलोत यांचे निवासस्थान आता बनावट ध्वनिफित बनविण्याचा अड्डा बनल्याचा आरोप पक्ष प्रवक्ते संबित पात्रा यांनी केला. शेखावत यांनी प्रकरणाची चौकशी करण्याचे आव्हान दिले.

Related Stories

नोकरी बदलल्यावर पीएफ ट्रान्सफरच्या त्रासापासून मुक्ती

Patil_p

विक्रम सोलरला अमेरिकन कंपनीकडून मिळाले कंत्राट

Patil_p

बीएसएफच्या आणखी 21 जवानांना कोरोनाची बाधा

tarunbharat

शाह फैसल यांना मिळाली नवी जबाबदारी

Amit Kulkarni

महाराष्ट्रातील मद्यविक्री परवाना शुल्कात सूट

Omkar B

माजी आमदार जस्सी खंगूडा यांचा काँग्रेसला रामराम

Patil_p