ऑनलाईन टीम / लखनऊ :
समाजवादी पार्टीचे नेते राम गोविंद चौधरी यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे. याआधी सपाचे आमदार ललई यादव आणि त्यांच्या कुटुंबातील चार जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राम चौधरी यांना पीजीआय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. काल रात्री त्यांना दाखल करण्यात आले आहे. त्यावेळी त्यांची कोरोना चाचणी केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.
दरम्यान, उत्तर प्रदेशात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. आतापर्यंत 17 हजार 764 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातच दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण संख्या वेगाने वाढत असली तरी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण देखील अधिक आहे. सध्या हे प्रमाण 63.31 टक्के असून आतापर्यंत 11 हजार 601 रुग्णांची प्रकृती सुधारली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.