Tarun Bharat

उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून 8 ठार

384 सुरक्षित, जोशीमठ येथे दुर्घटना, लष्कराकडून बचावकार्य

चमोली/वृत्तसंस्था

उत्तराखंडमध्ये चमोली जिह्यातील नीती घाटी परिसरात हिमवृष्टीनंतर हिमकडा कोसळल्यामुळे शुक्रवारी रात्री मोठी दुर्घटना घडली. यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाला असून विविध ठिकाणी अडकलेल्या 384 जणांना वाचवण्यात यश आले आहे.  या दुर्घटनेनंतर भारतीय लष्कराने बचावकार्य जोमाने राबविले. हिमवृष्टी आणि नंतर कोसळलेला हिमकडा यामुळे बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनचे दोन कँप अडचणीत सापडले. लष्कराच्या जवानांनी तातडीने मदतकार्य करत 384 जणांना वाचवले. ढिगाऱयात आठ जणांचे मृतदेह सापडले आहेत, अशी माहिती भारतीय लष्कराच्या सेंट्रल कमांडने दिली. उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनी शनिवारी घटनास्थळाची हवाई पाहणी करून मदतकार्याचा आढावा घेतला.  

उत्तराखंडमधील चमोली जिह्यातील जोशीमठ येथे पुन्हा एकदा हिमकडा कोसळण्याची ही घटना घडली आहे. या दुर्घटनेमुळे येथे पुन्हा एकदा हाहाकार माजल्याचे चित्र आहे. सुमना भागात झालेल्या जोरदार हिमवृष्टीनंतर हा हिमकडा कोसळला. हिमकडा कोसळण्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासन आणि बीआरओशी संपर्कात राहून मुख्यमंत्री घटनेचा आढावा घेत आहेत. उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळण्याची ही पहिलीच घटना नाही, यापूर्वीही अनेकदा देशातील या भागात हिमकडा कोसळल्यामुळे मोठी संकटे ओढावली आहेत.

प्रकल्पांवरील कामे ठप्प

हिमकडा कोसळण्याच्या घटनेची सर्व माहिती मिळवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेला दिले. याशिवाय एनटीपीसी आणि तत्सम इतरही योजनांना रात्रीच्या वेळी सुरू असणारी सर्व कामे थांबवण्यासही सांगितले आहे. कोणताही अपघात टाळण्यासाठी त्यांनी हे पाऊल उचलले आहे. तीरथसिंग रावत यांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही घटनेची चौकशी करत राज्याला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.

Related Stories

भाजप राज्य प्रभारींची 27 सप्टेंबरला बैठक

Patil_p

नोएडा प्राधिकरणने सुरू केली ‘ऑक्सिजन बँक’

Tousif Mujawar

बसवाहक योगनाथन यांना सलाम

Patil_p

अजब प्रेमाची गजब कहाणी

Patil_p

आई आरोग्यदायी आशीर्वाद दे ; भक्तांच्या आरोग्यासाठी मधुरिमाराजेंनी केली अंबाबाईच्या चरणी प्रार्थना

Archana Banage

पाक पंतप्रधानानी मांडला होता भारताचा पहिला अर्थसंकल्प

Patil_p