Tarun Bharat

उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर, उत्तराखंडमध्ये भाजपची सरकारे शक्य

Advertisements

सी-व्होटरच्या नव्या सर्वेक्षणाचे अनुमान – पंजाब त्रिशंकू

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सी-व्होटर या सर्वेक्षण संस्थेने मार्चमध्ये होऊ घातलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक परिणामांसंबंधीचे ताजे अनुमान प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार उत्तर प्रदेश, गोवा, मणिपूर आणि उत्तराखंडमध्ये भाजप आणि मित्र पक्षांची सरकारे स्थापन होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. पंजाबमध्ये मात्र त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याची शक्यता दर्शविण्यात आली आहे.

सध्याच्या स्थितीनुसार पंजाब वगळता अन्य चार राज्यांमध्ये भाजप आणि मित्र पक्षांचीच सरकारे अस्तित्वात आहेत. नव्या अनुमानानुसार ती या विधानसभांच्या निवडणुकीनंतरही कायम राहू शकतात. पंजाबमध्ये सध्या काँग्रेसचे सरकार आहे. तथापि या राज्यात काँग्रेसला पुन्हा स्वबळावर पूर्ण बहुमत मिळण्याची शक्यता नसल्याचे या सर्वेक्षणातून दिसून येत आहे. या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पुढील वर्षाच्या फेब्रुवारी-मार्चमध्ये होणार असून त्यांची उत्सुकता आहे.

उत्तर प्रदेशचा भाजपकडे कल

उत्तर प्रदेशमध्ये 403 जागा असून गेल्या वेळी भाजप आणि मित्र पक्षांना 325 जागा मिळाल्या होत्या. यावेळी भाजप आणि मित्र पक्षांच्या जागांची संख्या कमी होण्याचे अनुमान असले तरी बहुमत भाजपचेच असेल, असे सी-व्होटरचे म्हणणे आहे. भाजप आणि मित्रपक्षांना 213 ते 221 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून समाजवादी पक्ष व मित्र पक्षांना 152 ते 160 जागा मिळतील, असे दर्शविण्यात आले आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मात्र पुन्हा धुव्वा उडणार असून मायावतींच्या बहुजन समाज पक्षालाही अपयशाची चिन्हे आहेत.

उत्तराखंडमध्ये चुरस

उत्तराखंडमध्ये 70 जागा असून तेथे काही प्रमाणात भाजप आणि काँग्रेस यांच्यात चुरस असल्याचे सर्वेक्षणातून दिसून येते. भाजपला 41 टक्के मतांसह 36 ते 40 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून काँग्रेसला 36 टक्के मतांसह 30 ते 34 जागा मिळू शकतात, असे सी-व्होटरचे अनुमान आहे.

गोव्यात पुन्हा भाजप?

गोव्यात 40 जागा असून तेथे भाजपचेच सरकार पुन्हा निवडून येण्याची अधिक शक्यता या सर्वेक्षणातून दिसून येते. या राज्यात भाजपला 36 टक्के मते आणि 19 ते 23 जागा मिळतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. आम आदमी पक्षाचा प्रवेश या राज्यात होणार असून त्याला 24 टक्के मते आणि 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 19 टक्के मतांसह अवघ्या दोन ते सहा जागा मिळतील, असे अनुमान आहे. अन्य पक्षांना 21 टक्के मतांसह 8 ते 12 जागा मिळू शकतात, असे या सर्वेक्षणातून दिसल्याचा दावा करण्यात आला आहे.

मणिपूरमध्ये भाजपचे वर्चस्व

मणिपूर या ईशान्य भारतातील छोटय़ा राज्यात 60 जागा असून तेथे भाजपला 39 टक्के मतांसह 25 ते 29 जागा मिळू शकतील. तर काँग्रेसला 33 टक्के मतांसह 20 ते 24 जागा येऊ शकतात. एनपीएफ या पक्षाला 9 टक्के मतांसह 4 ते 8 जागा तर अन्य पक्षांना 19 टक्के मतांसह 3 ते 7 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणातून व्यक्त करण्यात आली आहे.  

पंजाब त्रिशंकू अवस्थेकडे

पंजाबमध्ये 113 जागा असून सध्या तेथे 117 जागा असून सध्या तेथे 77 जागांसह काँग्रेसचे बहुमत आहे. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला बहुमत गमवावे लागण्याची शक्यता आहे. या राज्यात आम आदमी पक्ष मुसंडी मारणार असून तो सर्वाधिक जागा मिळविणारा पक्ष ठरेल. तथापि बहुमतापासून काही जागा दूर राहील, असे हे सर्वेक्षण सांगते. या राज्यात आम आदमी पक्षाला 36 टक्के मतांसह 47 ते 53 जागा, काँग्रेसला 35 टक्के मतांसह 42 ते 50 जागा आणि अकाली दलाला 21 टक्के मतांसह 16 ते 24 जागा मिळण्याची शक्यता या सर्वेक्षणातून व्यक्त होत आहे. मात्र खरे परिणाम निवडणूका पूर्ण झाल्यानंतरच दिसून येणार असल्याने सध्या ही केवळ अनुमाने आहेत.

Related Stories

ओडिशामध्ये वायूगळती, 4 मजुरांनी गमावला जीव

Omkar B

अयोध्या : राम मंदिराच्या पायाभरणीस प्रारंभ

datta jadhav

देश सोडून पळून गेल्यानंतर पहिल्यांदाच समोर आले अशरफ घनी, म्हणाले…

Abhijeet Shinde

जून-जुलैमध्ये आढळतील कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण : एम्स संचालक

Rohan_P

‘देवाच्या प्रकोपा’च्या भीतीने गुन्हा केला मान्य

Patil_p

अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

Patil_p
error: Content is protected !!