ऑनलाईन टीम / लखनऊ :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास वर्षभरापासून बंद असलेल्या पहिली ते पाचवीच्या शाळा आज पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत. सोमवारी शाळा सुरू झाल्यानंतर आपल्या मित्रांना पाहून सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले.


शाळांनी देखील विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जोरदार तयारी केली होती. शाळांमध्ये फुगे लावण्यात आले होते. काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना केक भरवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. तर काही शाळांमध्ये मुलांवर फुले उधळण्यात आली.
यावेळी कोरोना संबंधीत सुरक्षिततेच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग आणि विद्यार्थ्यांनी व्यवस्थित मास्क लावला आहे की नाही, याची काळजी घेत विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना शिक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. दरम्यान, सद्य परिस्थितीत 50 टक्के क्षमतेने शाळा सुरू करण्यात आल्या आहेत.