Tarun Bharat

उत्तर रत्नागिरीत चक्रीवादळाने अतोनात नुकसान , पंचनामे सुरू

Advertisements

प्रतिनिधी / दापोली


बुधवारी पहाटेपासून अरबी समुद्रातून कोकणावर येऊन धडकलेल्या चक्रीवादळाने दापोलीसह उत्तर रत्नागिरीत हाहा:कार माजवला. कोरोनाने आधी पिचलेल्या उत्तर रत्नागिरीवासियांचे या निसर्ग चक्रीवादळाने आता पुरते कंबरडे मोडले आहे. उत्तर रत्नागिरीचा वीजपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याने अनेक नळपाणी योजना ठप्प झाल्या आहेत. यामुळे भर पावसात देखील नागरिकांचे पाण्यासाठी हाल होत आहेत.

बुधवारी सायंकाळ पासूनच पुनर्वसनाच्या कामाने वेग घेतला आहे. या चक्रीवादळाचा वेग इतका प्रचंड होता की दापोली शहरातील जवळ-जवळ सर्वच इमारतींवरील वेदरशेड उडून जाऊन अतोनात नुकसान झाले आहे. अनेक घरांवर असलेल्या पाण्याच्या टाक्या देखील या वादळाने फोडून टाकल्या. काही टाक्या वाऱ्याच्या प्रचंड वेगाने इमारतींच्या खाली येऊन पडल्या आहेत. यामुळे अनेक इमारतींमध्ये नागरिकांचे पिण्याच्या पाण्याचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. त्यात वीज पुरवठा अनिश्चित काळासाठी बंद राहणार असल्याने विहिरीत पाणी असून देखील ते टाकीत सोडवता येणार नाही. यामुळे अनेकांचे पाण्यासाठी हाल सुरू झालेले आहेत. अनेक गावे ही नळाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. त्यांचा पाणी पुरवठा देखील आता वीज नसल्याने बंद झाला आहे.


तालुक्यातील रस्त्यांवर कचरा व पालापाचोळ्याचा ढीग मोठ्या प्रमाणात साठला आहे. तो काही दिवसात कुजून रोगराई पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. काल अचानक झालेल्या धुवाँधार पावसाने नाल्यांमधील कचरा व घाण देखील रस्त्यावर आलेली आहे. यामुळे शहरात दुर्गंधीचे वातावरण पसरलेले आहे. दापोली शहराबाहेर जाणारे सर्वच रस्त्यावर बुधवारी झाडे पडल्यामुळे बंद होते. दुपारनंतर वाऱ्याचा व पावसाचा जोर कमी झाल्यानंतर दापोली नगरपंचायतीच्या आपत्ती निवारण पथकाने जेसीबीच्या सहाय्याने सर्वप्रथम सर्व झाडे बाजूला केली व वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. त्यांचे हे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. या चक्रीवादळामुळे दापोली शहरातील विजेचे पन्नास टक्के पोल जमीनदोस्त झालेले आहेत. हे सर्व खांब पुन्हा उभे करण्याचे व तारा जोडण्याचे काम गुरुवारी सकाळी हाती घेण्यात आले. मात्र पुन्हा सुरू झालेल्या पावसाने या कामांमध्ये खंड पडला.


मुख्य वीज वाहिन्यांचे काम सुरळीत करण्यासाठी किमान चार दिवस लागतील अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.
दापोली शहराचा वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी यापुढे किमान आठवडा लागणार आहे. यानंतर दापोली तालुक्यातील इतर गावांमध्ये जे विजेचे असंख्य खांब पडलेले आहेत त्यांची पाहणी करून ते उभे करण्याचे काम सुरू करण्यात येईल. मात्र हे सर्व काम पावसावर अवलंबून असल्याचे देखील महावितरणच्या सूत्रांनी सांगितले. यामुळे दापोलीच्या ग्रामीण भागातील वीजपुरवठा पूर्ववत होण्यासाठी किमान पंधरा दिवसांचा कालावधी लागेल अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली.


दापोली शहरातून बाहेर जाणारे रस्त्यांवरील झाडे जेसीबीच्या साह्याने जरी बाजूला करण्यात आली असली तरी रस्त्यांवर छोट्या फांद्या, पाने अजून पडलेली आहेत. यावरून वाहन चालक बसून पडण्याच्या घटना घडत आहेत. या चक्रीवादळामुळे दापोलीच्या समुद्रकिनारी असणाऱ्या गावांमध्ये अतोनात नुकसान झालेले आहे. समुद्र किनारी असणाऱ्या अनेक रिसॉर्टचे पत्रे उडून जाऊन व पाणी आत घुसून नुकसान झाले आहे. यामुळे गणपतीनंतर सुरू होणाऱ्या पर्यटनाच्या हंगामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व घरांची व रिसॉर्टची महसूल विभागाकडून पाहणी सुरू असून लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मात्र गुरुवारी सकाळपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने या कामामध्ये व्यत्यय येत आहेत.
दापोली तालुक्यातील एक-दोन मोबाईल कंपन्या वगळता सर्वच मोबाईल सेवा ठप्प झाली आहे. यामुळे या गावांमध्ये प्रशासनाचा संपर्क होऊ शकत नाहीये.


गुरुवारी सकाळपासूनच महसूलच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे करण्याचे काम हाती घेतले आहे. हे पंचनामे करण्याचे काम आणखीन किती दिवस चालेल याबद्दल सांगण्यास महसूल अधिकाऱ्यांनी असमर्थता दर्शवली. या वादळाने दापोली शहरातील प्रत्येक इमारतीचे नुकसान झालेले आहे. तसेच दापोली तालुक्‍यातील प्रत्येक गावांमध्ये निसर्ग चक्रीवादळाने आपला कहर दाखवलेला आहे. कोरोनामुळे वाहतूक बंद असल्यामुळे दापोली शहरात उपलब्ध असलेल्या साधनसामग्रीवर नागरिकांना अवलंबून राहावे लागणार आहे. गुरुवारी सकाळी पावसाने थोडी उसंत घेतल्यानंतर नागरिकांनी दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली. अनेक सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते देखील मदतीला पुढे सरसावले.
या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर दापोली प्रशासनाने दापोलीतील तब्बल बावीस लोकांचे स्थलांतर केले होते. यामुळे होणारी जीवितहानी टळली आहे. मात्र दापोलीवर या चक्रीवादळाच्या रूपाने आलेल्या संकटाने हाहा:कार माजवला आहे. तालुक्यातील नुकसानीचा आकडा काही कोटींच्या घरात जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Related Stories

जिल्हय़ात नवे 134 कोरोनाबाधित

Patil_p

खाकीची मानसिकता ढळतेय…!

Patil_p

सांगली : ताकारीत कोरोनाचा शिरकाव

Abhijeet Shinde

सांस्कृतिक कार्यक्रमांना हिरवा कंदिल!

Patil_p

कोल्हापूर : कळंब्यातील जुगार अड्यावर छापा ; शस्त्रासह सुमारे ७ लाखाचा मुद्देमाल जप्त

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री-पंतप्रधान भेटीवर रोहित पवारांनी केली खास पोस्ट, म्हणाले…

Abhijeet Shinde
error: Content is protected !!