Tarun Bharat

उत्पादन क्षेत्राचा 8 वर्षांमधील उच्चांक

पीएमआय निर्देशांकानुसार जानेवारीत मोठी वाढ, अर्थव्यवस्था गतिमान होण्याचे सुचिन्ह

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

देशाच्या उत्पादन क्षेत्राने नववर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यात गेल्या 8 वर्षांमधील उच्चांक गाठला आहे. कारखान्यांना मोठय़ा ऑर्डर्स मिळत असून अनेक उत्पादन केंद्रांनी नव्या नोकऱया देण्यास प्रारंभ केला आहे. गुंतवणूकही वाढत असून मागणीत वाढ होत असल्याने अर्थव्यवस्था येत्या काही काळात आपली मरगळ झटकून गतिमान होण्याचे सुचिन्ह दिसत आहे.

पीएमआय (परचेस मॅनेजर्स इंडेक्स) निर्देशांकानुसार जानेवारीत अर्थव्यवस्थेने कात टाकण्यास प्रारंभ केला आहे. या महिन्यात पीएमआय निर्देशांक 55.3 वर पोहचला असून ही आकडेवारी गेल्या 8 वर्षांमधील सर्वात जास्त आहे. डिसेंबरात हा निर्देशांक 52.7 इतका होता. जानेवारीत ग्राहकांकडून मागणीत मोठी वाढ दिसून आली आहे. साहजिकच कारखाने व उत्पादन केंद्रांनी उत्पादक यंत्रसामग्रीच्या नव्या ऑर्डरी नोंदविल्या आहेत. ग्राहकोपयोगी वस्तू, तयार खाद्यपदार्थ आणि वाहने यांना ग्राहकांकडून होत असलेल्या मागणीत लक्षणीय वाढ दिसून आल्याने गुंतवणूकही वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

नव्या उद्योगांमध्ये वाढ

डिसेंबर व जानेवारीत नव्या उद्योगांची संख्याही वाढल्याचे दिसत आहे. त्याचबरोबर कर्मचारी भरतीचे प्रमाण वाढले आहे. उच्च वेतन नोकऱयांच्या संख्येतही वाढ झाली आहे. परिणामी, उद्योग क्षेत्रात विश्वासाचे वातावरण निर्माण हात असून याचा सकारात्मक परिणाम अर्थव्यवस्थेवर येत्या सहा महिन्यांमध्ये दिसून येईल, अशी चर्चा उद्योगजगतातील तज्ञांमध्ये होत आहे.

निर्यातीतही वाढ

नोव्हेंबर 2018 पासून प्रथमच जानेवारी 2020 मध्ये निर्यातील वाढ दिसून येत आहे. विशेषतः उत्पादित वस्तूंच्या निर्यातीचे प्रमाण वाढले आहे. ही वाढ अशीच काही काळ होत असल्यास व्यापारी तूट नियंत्रणात ठेवण्याचे अर्थसंकल्पीय लक्ष साधणे शक्य होईल असे वातावरण निर्माण झाले आहे. कंपन्यांना नवे ग्राहक मिळत आहेत. विदेशातून अधिक ऑर्डरी येत आहेत, असे पीएमआय निर्देशांकातील वाढीवरून लक्षात येत आहे.

बॉक्स

पीएमआय म्हणजे काय ?

पर्चेस मॅनेजर्स इंडेक्स ही आद्योगिक प्रगतीच्या गणनेची एक पद्धती आहे. देशातील सर्व मध्यम मोठय़ा उत्पादन केंद्रांच्या (कारखान्यांच्या) मुख्य खरेदी व्यवस्थापकांनी ही पद्धती बनविलेली आहे. हे सर्व व्यवस्थापक प्रत्येक महिन्यात त्यांच्या उत्पादन केंद्रातील मागणी, उत्पादन आणि वस्तूंची विक्री तसेच या वस्तू तयार करण्यासाठी लागणाऱया कच्च्या मालाची खरेदी यांची आकडेवारी एकत्रित करतात. त्यावरून त्या विशिष्ट महिन्यात खरेदी, विक्री आणि मागणी किती होती यांची नेमकी माहिती मिळते. यावरून पीएमआय हा निर्देशांक काढला जातो. ही माहिती प्रत्यक्ष उत्पादन केंद्रांमधूनच मिळालेली असल्याने तिच्या आधारावर काढलेला निर्देशांक औद्योगिक विश्वात विश्वासार्ह मानला जातो.

Related Stories

सक्तीच्या धर्मांतराविरोधातील कायदा आवश्यकच

Patil_p

‘स्पुटनिक-लाईट’ लस 750 रुपयांत मिळणार

Patil_p

शशी थरूर यांना फ्रान्सचा सर्वोच्च नागरी पुरस्कार

Amit Kulkarni

पश्चिम बंगालमध्ये भाजप नेत्याची हत्या

Patil_p

गुजरात निवडणुकीतून ‘आप’ उमेदवाराची माघार

Amit Kulkarni

डीबीटीमुळे 27 अब्ज डॉलर्सची बचत आर्थिक सचिवांनी दिली माहिती

Patil_p
error: Content is protected !!