Tarun Bharat

उद्योगपती अरविंद गोगटे यांचे निधन

रविवारी पहाटे घेतला अखेरचा श्वास

प्रतिनिधी /बेळगाव

बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती अरविंद रावसाहेब (बाळकृष्ण) गोगटे (वय 78) यांचे रविवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी मंगल, मुलगा माधव, मुलगी धनश्री, सून, जावई, नातवंडे तसेच उद्योगपती आनंद व शिरीष गोगटे हे भाऊ असा परिवार आहे.

अरविंद गोगटे यांचा जन्म पुण्याचा. बेळगावचे प्रसिद्ध उद्योगपती रावसाहेब गोगटे यांच्याकडून म्हणजेच वडिलांकडून त्यांनी उद्योजकतेचे बाळकडू घेतले. बेननस्मिथ येथे प्राथमिक शिक्षण व पुण्यातील व्हीएमसीसी कॉलेज येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून ते अमेरिकेला गेले. तेथे एमबीएची पदवी घेऊन ते बेळगावला परतले आणि वडिलांच्याच उद्योग-व्यवसायात त्यांनी प्रवेश केला.

गोगटे माईन्स, गोगटे मिठागर, गोगटे ऍग्री प्रॉडक्ट्स, गोगटे इन्फ्रास्ट्रक्चर, गोगटे टेक्स्टाईल, गोगटे स्टील अशा सर्व उद्योगांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला. याच दरम्यान तत्कालिन सांगली संस्थानचे तत्कालिन राजे पटवर्धन यांच्या कन्या मंगल यांच्याशी त्यांचा विवाह झाला. अरविंद गोगटे यांनी उद्योग भरभराटीला आणतानाच सामाजिक बांधिलकीचे भान नेहमीच बाळगले. त्यामुळे अनेक संस्थांना त्यांनी देणग्या दिल्या. गोगटे कॉलेज ऑफ कॉमर्स व इंजिनिअरिंग कॉलेजला त्यांनी भरीव देणगी दिली. बेळगाव आणि कोकणमधील अनेक संस्थांना त्यांनी उपकृत केले.

बेळगावच्या रेल्वेस्थानकाला एक्सलेटर देण्याची योजना त्यांनी आखली आणि त्यासाठीचा पहिल्या टप्प्यातील निधीसुद्धा त्यांनी रेल्वे विभागाला दिला. याशिवाय बेळगाव आणि पुणे रेल्वेस्थानकांना त्यांनी व्हिलचेअर्स दिल्या. राष्ट्रीय स्तरावरील नेते शरद पवार, विलासराव देशमुख, खासदार श्रीनिवास पाटील यांच्यासह अनेक दिग्गज व्यक्ती व पुण्या-मुंबईतील उद्योजकांशी त्यांचे स्नेहपूर्ण संबंध होते. पण त्यांनी कधीच त्याचा गवगवा केला नाही. ते उत्तम टेनिस खेळत. शिवाय सांस्कृतिक कार्यक्रमांना आवर्जून उपस्थित रहात.

काकतीजवळील मेरिएट हॉटेल उभारण्यामागे त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले. तसेच अलीकडेच त्यांनी याच परिसरात टाटा पॉवरच्या सहकार्याने ऊर्जा चार्जिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेऊन ते कार्यान्वित केले. हे बेळगावमधील पहिले चार्जिंग स्टेशन ठरले. तसेच आपल्या धाकटय़ा भावाचे कौतुक करण्यासाठी शिरीष गार्डनसुद्धा त्यांनी सुरू केले. याशिवाय गोगटे सर्कल येथे पोलिसांसाठी छत्री उभारून त्यांनी सेवेवरील पोलिसांना निवारा उपलब्ध करून दिला.

अचानक जाणे वेदनादायी : किरण ठाकुर

अरविंद गोगटे यांचे अचानक जाणे वेदनादायी आहे. एक उमदे व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे. वडिलांचा वारसा पुढे चालवताना त्यांनी अनेक व्यक्ती आणि संस्थांना अर्थसाहाय्य करून त्यांना उभे राहण्यासाठी उमेद दिली. बेळगाव रेल्वेस्थानकावर एक्सलेटर्स उभे करण्याचा त्यांचा निर्णय हा केवळ बेळगावकरांसाठीच नव्हे तर सर्वच रेल्वे प्रवाशांसाठी सोयीचा ठरणार आहे. चार्जिंग स्टेशनच्या उद्घाटनप्रसंगी त्यांची भेट झाली आणि अनेक आठवणींना उजाळा देणाऱया गप्पाही झाल्या. त्यांच्या निधनाने एक कुशल उद्योगपती आपण गमावला आहे. व्यक्तीशः आपण आणि ‘तरुण भारत’ व लोकमान्य परिवार गोगटे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

सर्वच क्षेत्रात उल्लेखनीय कार्य : माजी मंत्री आर.व्ही. देशपांडे

उद्योगपती अरविंद गोगटे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून धक्काच बसला. इतक्या लवकर ते या जगाचा निरोप घेतील, असे ध्यानीमनीही नव्हते. ते आपले चांगले मित्र होते. बेळगावच्या सामाजिक, सांस्कृतिक तसेच औद्योगिक क्षेत्रात त्यांनी केलेली कामगिरी उल्लेखनीय अशी आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत असतानाच त्यांनी औद्योगिक क्षेत्रात आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. आपण गोगटे कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.

Related Stories

जायंट्स प्राईड सहेलीतर्फे शिक्षक दिन उत्साहात

Amit Kulkarni

चर्मकार युवक मंडळातर्फे संत रोहिदास जयंती साजरी

Amit Kulkarni

मराठा समाजाला आरक्षण द्या

Amit Kulkarni

रस्ते, लाईट, पाणी, गटारी या समस्यांचे तात्काळ निवारण करा

Rohit Salunke

गांजा विकणाऱया रिक्षाचालकाला अटक

Patil_p

संत मीरा संघाला सर्वसाधारण विजेतेपद

Amit Kulkarni