Tarun Bharat

उपचाराला उशीरा आल्यानेच मृत्यूदर वाढतोय

60 वर्षावरील रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळय़ा आढळल्या

जान्हवी पाटील/ रत्नागिरी

रत्नागिरी जिल्हय़ातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या मृत्यूदरामागील कारणे शोधून काढण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून स्वतंत्र टीमद्वारे मृत्यू ऑडिट केले जात आहे. आतापर्यंत 900 रुग्णांच्या मृत्यूचे ऑडिट करण्यात आले असून यामध्ये 60 टक्केपेक्षा अधिक रुग्ण 60 वर्षावरील आहेत. उपचारांसाठी विलंबाने दाखल झाल्याने शरीरात रक्ताच्या गुठळय़ा होऊन रुग्णांची प्रकृती गंभीर बनल्याची माहिती या ऑडिटमध्ये समोर आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संघमित्रा फुले यांनी ‘तरुण भारत’ला दिली. दरम्यान रुग्णालयांतील एमडी फिजिशियनची कमतरता हेदेखील यामागील एक प्रमुख कारण आहे. त्या कारणाची नोंद या अहवालात होते अथवा कसे याकडे वैद्यकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

रत्नागिरी जिल्हय़ात कोरोनाचे एकूण मृत्यू 1 हजार 356 असल्याने मृत्यू दर 3.37 टक्के आहे. लॉकडाऊन करूनही कोरोना आटोक्यात आलेला नाही. गेल्या दोन महिन्यापासून जिल्हा शासकीय रूग्णालयामार्फत कोरोना मृत्यूचे ऑडिट सुरू आहे. 900 रूग्णांचे मृत्यू ऑडिट पूर्ण झाले आहे. यामध्ये 60 टक्के मृत्यू 60 ते 80 वयोगटातील आहेत. यातील बहुतांश रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेऊन घरी गेले होते. त्यानंतर पुन्हा अत्यवस्थ वाटू लागल्याने शेवटच्या पर्याय म्हणून ते शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. वेळेत स्वॅब टेस्ट केली जात नाही. अधिक त्रास जाणवू लागल्यानंतर स्वॅब टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र तोपर्यंत रुग्णांची तब्येत अधिक खालावलेली असते. उपचाराला प्रतिसाद मिळत नाही आणि त्यामुळे मृत्यू होत असल्याची माहिती ऑडिटच्या माध्यमातून समोर आल्याचे सांगण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे उशीरा दाखल झालेल्या रुग्णांमध्ये रक्ताच्या गुठळय़ा तयार होवून रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण होत असल्याचे या ऑडिटमध्ये समोर आल्याचे डॉ. संघमित्रा फुले यांनी सांगितले.

एप्रिलमध्ये जिल्हय़ातील एका 10 वर्षाच्या मुलीचे कोरोनाने निधन झाले.  कोरोनाचे लक्षणे दिसताच तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले नव्हते गावातीलच खासगी दवाखान्यात औषधोपचार करून उशीरा शासकीय रूग्णालयात आणण्यात आले होते. तिच्यावर योग्य उपचार करूनही उपचाराला प्रतिसाद मिळाला नाही ही दुर्दैवी बाब आहे. मोठय़ा प्रमाणावर जनजागृती करूनही लोक उपचाराला वेळेत येत नाहीत, माहिती लपवली जाते. याला पायबंद घालण्यासाठी लवकरच एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार असल्याचे डॉ. फुले यांनी सांगितले.

  डॉ.संघमित्रा फुले यांनी सांगितले की, डेथ ऑडिटमुळे बहु आजार असलेल्या रूग्णांना हा नवा व्हायरस लवकर गंभीर अवस्थेत नेत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह असलेल्या रूग्णांचा अधिक समावेश आहे. या महिनाभरात 55 ते 80 वयोगटातील वृध्दांचे अधिक मृत्यू झाले आहेत. अद्यापही ताप, सर्दी, खोकला याकडे नेहमीचा आजार म्हणून दुर्लक्ष केले जात असल्याने मृत्यू दर वाढला आहे.

ग्रामीण भागात सर्दी, ताप, खोकला व इतर लक्षणे असतानाही सुरूवातीला कोरोना चाचणी करण्यासाठी न पाठवता औषध देवून रूग्णांना घरी पाठवले जाते. पुढे आठ दिवसानंतरही रुग्ण बरा झाला नाही की संबंधित डॉक्टर त्याला शासकीय रूग्णालयात जाण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आता खासगी रूग्णालयांसाठी मार्गदर्शन सूचना तयार करण्यात येणार असल्याचेही डॉ. फुले यांनी सांगितले.

Related Stories

काश्मीरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

पुढील तीन दिवस राज्यात मुसळधार

Patil_p

अडचणीच्या काळात सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी

Archana Banage

मिरजेत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस

Abhijeet Khandekar

शिराळ्याच्या तरुणाची सावळीत गळफासाने आत्महत्या

Abhijeet Khandekar

कोल्हापूर : गणी आजरेकरांनी बदनामीचा दावा करून दाखवावाच

Archana Banage