प्रतिनिधी /बेळगाव


बेळगाव महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता सोमवार हा शेवटचा दिवस होता. त्यामुळे उमेदवारी अर्ज करण्याकरिता निवडणूक कार्यालय आवारात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला. तरीदेखील प्रत्येक कार्यालयासमोर मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करणाऱयांच्या रांगा लागल्या होत्या.
उमेदवारी अर्ज दाखल करताना कोरोना नियमावलीचे पालन करण्याची सूचना करण्यात आली. तसेच उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी सूचक आणि उमेदवाराला प्रवेश देण्यात आला. गर्दी टाळण्यासाठी प्रत्येक निवडणूक कार्यालयाच्या आवारात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.


शेवटचा दिवस असल्याने सकाळपासूनच मोठय़ा प्रमाणात गर्दी झाली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली. महापालिका मुख्य कार्यालय, अशोकनगर, कोनवाळ गल्ली, विश्वेश्वरय्यानगर, गोवावेस व्यापारी संकुलातील मनपा कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गर्दी झाली होती. त्यामुळे पोलीस प्रशासनाला हस्तक्षेप करावा लागला.
गोवावेस येथील मनपाच्या कार्यालयात अर्ज भरण्यासाठी गर्दी होत होती. त्या कारणास्तव येथील व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याची सूचना करण्यात आली होती. शनिवारपासून व्यवसाय व दुकाने बंद ठेवावी लागल्याने व्यापाऱयांनी संताप व्यक्त केला. त्यांनी पोलिसांशी हुज्जत घातली व दुकाने सुरू करू द्या, अशी मागणी व्यावसायिक व दुकानदार करीत होते. पण कायद्याने आमचे हात बांधले आहेत, असे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे व्यावसायिकांमध्ये नाराजी पसरली.
सुभाषनगर येथील मुख्य कार्यालयात 15 वॉर्डमधील उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी निवडणूक कार्यालये सुरू करण्यात आली आहेत. त्यामुळे महापालिका कार्यालयासमोर आणि एसपी ऑफिस रोडवर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी कार्यालयात केवळ उमेदवार आणि सूचकांना प्रवेश देण्यात आल्याने समर्थकांना रस्त्यावर थांबावे लागले. तरीदेखील मनपा कार्यालयात गर्दी झाली होती. तसेच मनपा सभागृहात निवडणूक विभागाचे कामकाज सुरू होते.