प्रतिनिधी / नागठाणे
नागठाणे (ता.सातारा) येथून बेपत्ता झालेल्या महिलेचा मृतदेह गुरुवारी सकाळी माजगाव येथील उरमोडी नदीच्या पात्रात सापडला.सुशीला विलास पाटोळे (वय.४०)असे या महिलेचे नाव आहे.
याबाबत बोरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुशीला विलास पाटोळे ही महिला गेल्या 5 वर्षापासून आपल्या माहेरी नागठाणे येथे आईवडिलांकडे आपल्या मुलांसह वास्तव्यास आहे. सोमवारी दुपारी चार वाजता शौचास जाऊन येते असे सांगून घरातून बाहेर पडली. ती बराच वेळ झाली तरी घरी माघारी न आल्याने घरातील लोकांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. शोध घेऊनही ती न मिळून आल्याने मंगळवारी त्या मिसिंग असल्याची फिर्याद तिचा भाऊ प्रकाश विनायक बोडरे यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात दाखल केली होती.
गेली दोन दिवस नातेवाईक बेपत्ता सुशीला पाटोळे यांचा शोध घेत होते. गुरुवारी सकाळी माजगाव गावच्या हद्दीत उरमोडी नदीपात्रात त्यांचा मृतदेह नातेवाईकांना आढळून आला. याची माहिती बोरगाव पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत नदीपात्रातून मृतदेह बाहेर काढला. या घटनेची नोंद बोरगाव पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास हवालदार बाजीराव पायमल करत आहेत.

