Tarun Bharat

उरली ना जखमांची नवलाई, जिंकायचीय उद्याची लढाई!

दिव्यांग जलतरणपटू श्रीधरचा पॅरिस पॅराऑलिम्पिकसाठी कसून सराव

उमेश मजुकर / बेळगाव

2006 साली सहा वर्षाचा असताना आपल्या मामाबरोबर ऑटोरिक्षामधून जात असताना गोगटे सर्कल, मिलिटरी महादेवनजीक मामाचे रिक्षावरील नियंत्रण सुटून रिक्षा एका दगडावर चढली व ती कलंडली. त्यामध्ये सहा वर्षाच्या श्रीधर नागाप्पा माळगी याच्या हातावरच ती रिक्षा पडल्याने त्याच्या डाव्या हाताचा चेंदामेंदा झाला. तशा अवस्थेत त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याचा हात काढण्याचा सल्ला पालकांना दिला. घरची परिस्थिती अतिशय बिकट असलेल्या त्याच्या पालकांनी काळजावर दगड ठेवून डॉक्टरांच्या निर्णयाला संमती दिली.

डावा हात गमवावा लागल्याने निराश झालेल्या श्रीधरला आपले जीवन व्यर्थ वाटू लागले. शारीरिक आणि मानसिक धक्क्मयातून बाहेर यायला त्याला तब्बल सहा वर्षे लागली. 2012 साली एकेदिवशी मित्रांसोबत मनपा-रोटरी जलतरण तलावावर तो पोहोचला. त्यावेळी ऍक्वेरियस क्लबचे प्रमुख प्रशिक्षक उमेश कलघटगी यांची नजर श्रीधरवर पडली. त्यांनी श्रीधरला जवळ बोलावून त्याची हकिकत जाणून घेतली व त्याला ‘तू पुढे काय करायचे ठरविले आहेस?’ असा प्रश्न केला असता श्रीधर त्यावेळी काहीच बोलू शकला नाही. त्याचवेळी दिव्यांग जलतरणपटू राजेश शिंदे व राघवेंद्र अणवेकर पोहोण्याच्या सरावासाठी आले होते. त्यावेळी उमेशनी श्रीधर समोर त्या दोघांचे उदाहरण ठेवले. त्यातून प्रेरणा घेऊन श्रीधरने पोहणे शिकण्याची तयारी दर्शविली.

लगेचच दुसऱया दिवसापासून तो स्वीमिंग पूलवर हजरही झाला. केवळ 20 दिवसात पोहण्याचे प्राथमिक धडे त्याने पूर्ण केले. त्याची ही प्रगती पाहून उमेश व त्यांच्या सहकाऱयांनी त्याला पुढील धडे देण्यास सुरुवात केली. केवळ पाच महिन्यात श्रीधरने स्पर्धेत उतरण्याची तयारी केली. 2012 डिसेंबरमध्ये राष्ट्रीय दिव्यांग पॅरा स्पर्धेचे आयोजन बेंगळूर येथे झाले. त्या स्पर्धेत पहिल्यांदा श्रीधरने भाग घेऊन 50 मी. बॅकस्ट्रोक, 50 मी. फ्रिस्टाईल या दोन्ही प्रकारात सुवर्णपदके  तर 50 मी. ब्रेस्टस्ट्रोकमध्ये रौप्यपदक मिळविले व आपल्या पहिल्याच स्पर्धेत ज्युनियर वैयक्तिक विजेतेपद पटकाविले. यानंतर श्रीधरने कधीच मागे वळून पाहिले नाही.

2012 ते 2017 या कालावधीत सात राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत श्रीधरने भाग घेऊन 14 सुवर्ण, 5 रौप्य पदके पटकाविली. 2017 साली दुबईतील एशियन युथ पॅराजलतरण स्पर्धेसाठी दिल्ली येथे निवड चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये श्रीधरची चमक पाहून दुबई येथे होणाऱया स्पर्धेसाठी त्याची निवड झाली. श्रीधरचे वडील मच्छे येथील एका फौंड्रीमध्ये काम करायचे तर आई आजूबाजूच्या घरातील धुणीभांडी करत असे. श्रीधरची ही हलाखीची परिस्थिती पाहून 2013 ते 2017 या दरम्यान उद्योगपती आणि पॉलिहैड्रॉनचे संचालक कै. सुरेश हुंदरे यांनी त्याचा आर्थिक खर्चाचा भार उचलला.

दुबईतील एशियन युथ पॅरा गेम्स स्पर्धेत त्याने 100 मी. ब्रेस्टस्ट्रोक, 100 मी. बटरफ्लाय, 200 मी. वैयक्तिक मिडले यामध्ये कांस्यपदक पटकाविले. श्रीधरने पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय पदके पटकावली. 2018 साली इंडियन ओपन पॅराजलतरण स्पर्धेत त्याने 3 सुवर्ण, 400 मी. फ्रिस्टाईल, 100 मी. बटरफ्लाय, 100 मी. बॅकस्ट्रोक, 200 मी. वैयक्तिक मिडलेमध्ये रौप्यपदक पटकाविले.

जर्मनीतील वर्ल्ड पॅराजलतरण सिरीजमध्ये त्याने सहभाग घेतला. 2019 सिंगापूर वर्ल्ड पॅरा विश्व सिरीजमध्ये, त्याचप्रमाणे पोलंड येथेही त्याने सहभाग घेतला. या स्पर्धेत 4ƒ100 मी. फ्रिस्टाईल रिले स्पर्धेत भारताला रौप्यपदक मिळवून दिले. श्रीधरबरोबर शरद गायकवाड, पुनीत नंदकुमार (बेंगळूर), स्वप्नील पाटील (कोल्हापूर) यांचा सहभाग होता. 2020 साली इटली वर्ल्ड पॅरा सिरीज जलतरण स्पर्धेसाठी त्याची निवड झाली होती. परंतु, याच काळात कोरोना महामारीमुळे इटलीत कोरोनाने हाहाकार माजवला. त्यामुळे ही स्पर्धा रद्द करण्यात आली. 2021 साली फेब्रुवारीमध्ये राज्यस्तरीय स्पर्धेत 50 मी. फ्रिस्टाईल, 100 मी. बटरफ्लाय, 200 मी. वैयक्तिक मिडले प्रकारात सुवर्णपदके पटकाविली. श्रीधरला बेळगावात उमेश कलघटगी, राघवेंद्र अणवेकर, राजेश शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले तर सध्या बेंगळूरला एनआयएस प्रशिक्षक शरद गायकवाड यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभत आहे. श्रीधरच्या वडिलांना अर्धांगवायू झाल्याने ते घरीच असतात तर त्याची आई आजही  धुणीभांडी करून संसाराचा गाडा ओढते आहे.

तो केवळ सहा वर्षांचा… अपघातात त्याने डावा हात गमावला… अपंगत्वामुळे त्याला नैराश्याने घेरले. त्या नैराश्यातून बाहेर येण्यास त्याला बराच कालावधी लागला. एक दिवस मित्रासोबत पोहण्यास गेला आणि नेमका सापडला एका रत्नपारखीच्या नजरेत… त्यानंतर जणू त्याचे विश्वच बदलले…

Related Stories

गवतगंजीत घालून अज्ञाताला पेटविले

Amit Kulkarni

कोकटनूर यल्लम्मा यात्रेत युवकाचा खून

Amit Kulkarni

अधिकाऱयांना अधिकार माहिती नाहीत मग जनतेचे काय?

Patil_p

चिकन पोहचलं 280 वर

Amit Kulkarni

बेळगुंदी येथे हुतात्म्यांना अभिवादन

Tousif Mujawar

बागायत शेतीला विम्याची जोड

Amit Kulkarni