Tarun Bharat

उरुग्वेचा बोलिव्हियावर विजय, पराग्वेही विजयी

कोपा अमेरिका फुटबॉल

वृत्तसंस्था /क्वियाबा, ब्राझील

पूर्वार्धात बोलिव्हियाने नोंदवलेला स्वयंगोल व उत्तरार्धात एडिसन कॅव्हानीने नोंदवलेल्या गोलाच्या बळावर उरुग्वेने बोलिव्हियावर 2-0 अशा गोलफरकाने विजय मिळवित उरुग्वेने कोपा अमेरिका स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीतील स्थान निश्चित केले. दुसऱया सामन्यात पराग्वेने चिलीचा 2-0 असा पराभव केला.

उरुग्वेने अन्य संघांपेक्षा जास्त वेळा ही स्पर्धा यापूर्वी जिंकलेली आहे. पण यावेळी मात्र त्यांना आतापर्यंत संघर्षच करावा लागला आहे. अर्जेन्टिनाविरुद्ध त्यांना 1-0 असा पराभव स्वीकारावा लागला तर चिलीविरुद्ध 1-1 अशी बरोबरी झाली. बोलिव्हिया संघही तसा दुबळाच आहे. या संघाने 32 सामन्याआधी म्यानमारविरुद्ध त्यांच्याच देशात शेवटचा विजय मिळविला होता. पण अशा संघाविरुद्धही उरुग्वेला फारशी चमक दाखविता आली नाही. पूर्वार्धात त्यांच्याकडून अडखळणारा खेळच झाला आणि दैवाने मदत केल्यामुळेच त्यांना या सत्रात आघाडी घेता आली. पूर्वार्ध संपण्यास पाच मिनिटे असताना जायरो क्विन्टोरॉस व कार्लोस लॅम्पे या बोलिव्हियन खेळाडूंनी आपल्याच जाळय़ात चेंडू मारून स्वयंगोल नोंदवत उरुग्वेला आघाडी बहाल केली. सहा यार्ड बॉक्समधून लो क्रॉस मिळाल्यावर कॅव्हानी व लुईस सुआरेझ दोन्ही बाजूंनी आगेकूच करीत असल्याचे पाहून क्विन्टोरॉस गोंधळून गेला आणि त्याने मारलेला फटका आपलाच गोलरक्षक लॅम्पेच्या पायाला लागून जाळय़ात गेला.

बोलिव्हियाने पहिले दोन्ही सामने गमविले असल्याने या सामन्यात एक तरी गुण मिळविण्याच्या इराद्याने ते खेळत होते. त्यांनी तसे प्रयत्नही केले, पण उरुग्वेचा बचाव ते भेदू शकले नाहीत. उरुग्वेलाही या सत्रात सुआरेझ व कॅव्हानी यांना काही संधी मिळाल्या. पण गोलरक्षक लॅम्पेने अप्रतिम गोलरक्षण करीत त्यांच्या संधी फोल ठरविल्या. गेल्या नोव्हेंबरमध्ये विश्वचषक पात्रता सामन्यात उरुग्वेने शेवटचा विजय मिळविताना कोलंबियावर मात केली होती. येथील सामना संपण्यास 11 मिनिटे असताना फॅकुन्डो टेरेसने दिलेल्या क्रॉसवर कॅव्हानीने गोल नोंदवून उरुग्वेला पूर्ण तीन गुण मिळवून दिले. इंज्युरी टाईममध्ये बदली खेळाडू मॅक्सी गोमेझलाही एक संधी मिळाली होती. पण खुला गोलपोस्ट असूनही त्याने साईडफूटने वाईड फटका मारत ही संधी वाया घालविली. उरुग्वेने पाच सामन्याची विजय न मिळविण्याची मालिका या सामन्यात खंडित करीत गटात पहिल्या चारमधील स्थान निश्चित केले. बोलिव्हियाचा शेवटचा साखळी सामना अर्जेन्टिनाविरुद्ध होणार आहे तर उरुग्वेचा सामना पराग्वेशी होणार आहे.

याच अ गटातील अन्य एका सामन्यात पराग्वेने चिलीचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव करीत 6 गुणांसह गटात दुसरे स्थान मिळविले. पराग्वेतर्फे सॅमुडिओने 33 व्या मिनिटाला तर 58 व्या मिनिटाला मिग्वेल अल्मिरॉनने पेनल्टीवर दुसरा गोल नोंदवला.

Related Stories

भारतीय तिरंदाजांनी केली तीन सुवर्णपदकांची कमाई

Patil_p

कँडी वॉरियर्सच्या विजयात रवी बोपाराचे अर्धशतक

Patil_p

पिंकीची लढत आता कांस्यपदकासाठी

Patil_p

कोरोनाविरुद्ध लढय़ासाठी बेट लीकडून बिटकॉईनची मदत

Patil_p

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी नेमारचे 10 लाख डॉलर्स

Patil_p

श्रीकांत, समीर यांची विजयी सलामी

Patil_p