प्रतिनिधी / उस्मानाबाद
तालुक्यातील मौजे वाघोली येथील सार्वजनिक पाणीपुरवठ्याच्या विहीरीतील पाण्यात एका तरुणीचा पोत्यात गुंडाळलेला मृतदेह दि. 21.12.2015 रोजी सकाळी गावकऱ्यांस आढळला होता. यावरुन उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. गु.र.क्र. 174 / 2015 भा.दं.सं. कलम- 302, 201 नुसार दाखल करण्यात आला होता. शवविच्छेदन अहवालात तरुणीचा गळा चिरुन खुन केल्याचे स्पष्ट झाले. सुरुवातीचे 5 महिने तपासाला दिशा मिळाली नाही. त्यानंतर प्रकरणाचे गांभीर्य पाहुन तपास तत्कालीन सहायक पोलीस अधीक्षक मा.श्री. राज तिलक रौशन यांच्याकडे हस्तांतरीत करण्यात आला. आरोपीने नियोजनबध्द रितीने खुनकरुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तागाच्या पोत्यात भरुन विहीरीच्या पाण्यात टाकला होता. तपासाला निश्चित दिशा मिळत नव्हती तसेच त्या तरुणीची ओळख पटत नव्हती. त्या तरुणीच्या अंगात असलेल्या एल मापाच्या जयपूर कुर्तीवर तपास केंद्रीत करण्याचे व ऑनलाईन सोशल मिडीयाचा वापर करण्याचे तपास अधिकारी श्री. राज तिलक रौशन यांनी ठरवले.
त्या कुर्तीची छायाचित्रे ऑनलाईन वस्तू विक्री करणाऱ्यांना पाठवून संपर्क करण्यात आला तसेच त्यांना फौ.प्र.सं. कलम- 91 अन्वये सुचना देण्यात आली. या प्रकारच्या कुर्ती (सदरा) खरेदी करणाऱ्या ग्राहकांची माहिती घेण्यात आली. फ्लिपकार्ट कंपनीने ही कुर्ती ऑनलाईन विकली असल्याचे कळवले. कंपनीकडून अशी कुर्ती खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या खात्याची माहिती मागवण्यात आली असता त्यात एका संशयीत ग्राहकाचा मोबाईल क्रमांक मिळताच त्या मोबाईल क्रमांकावर लक्ष केंद्रीत करण्यात आले. या संशयीत मोबाईल क्रमांकाच्या अभिलेखावरुन वाघोली गावाचा जावई असलेल्या प्रकाश सुर्यकांत चापेकर, रा. येरवडा, पुणे याच्या मोबाईलवर खुनाच्या घटनेच्या काळात वेळोवेळी संपर्क झाल्याचे निष्पन्न झाले. पथकाने प्रकाश यास ताब्यात घेउन विचापुस केली असता त्याने मयत तरुणी ही त्याची प्रेयसी असुन पुणे येथील रहिवाशी असल्याचे स्पष्ट झाले. तीचा पिच्छा सोडवण्याकरता प्रकाश चापेकर, पत्नी- प्रतिभा व मेहुना- दत्ता सुभाष लोहार, रा. वाघोली, ता. उस्मानाबाद यांनी खुनाचा कट आखला. प्रकाश चापेकर हा त्या तरुणीस फुस लावून वाघोली शिवारात घेउन आला असता प्रकाश व दत्ता या दोघांनी तीचा गळा चिरुन खुन केला आणि पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने तीचा मृतदेह तागाच्या पोत्यात भरुन विहीरीत टाकला होता. गुन्ह्यात वापरलेली व्हेंटो कार क्र. एम.एच. 12 जेझेड 4720 ही पोलीसांनी तपासादरम्यान जप्त केली.
सदर गुन्ह्याची सुनावनी खटला क्र. 89 / 2016 ही उस्मानाबाद जिल्हा व सत्र न्यायालय क्र.- 3 अतिरिक्त सत्र न्यायाधिश मा. श्रीमती मखरे यांच्यासमोर झाली असता उपलब्ध पुराव्याची सांगड व स्पष्टीकरण सरकारपक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्री. जयंत देशमुख यांनी योग्य रितीने मांडले. यावरुन न्यायालयाने नमूद तीन्ही आरोपींना फौजदारी पात्र कट रचने, खुन करणे, पुरावा नष्ट करणे या आरोपांबद्दल दोषी ठरवून 1) प्रकाश सुर्यकांत चापेकर, वय 40 वर्षे यास आजन्म कारावास व 5,000 ₹ दंड 2) दत्ता सुभाष लोहार, वय 33 वर्षे यास आजन्म कारावास व 5,000 ₹ दंड 3) प्रतिभा प्रकाश चापेकर, वय 31 वर्षे, हिला आजन्म कारावास व 1,000 ₹ दंड अशी शिक्षा आज दि. 14.08.2020 रोजी सुनावली आहे.


previous post