Tarun Bharat

ऊन दिल्याशिवाय माल आणण्यास होती बंदी

Advertisements

80 वर्षांपूर्वी होते निर्बंध

वेंगुर्ल्यातील प्लेग साथ

1937 मध्येही होता कायदा

प्रतिनिधी / सावंतवाडी:

कोरोनाने जगात आणि देशातही थैमान घातले आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून अनेक निर्बंध नागरिकांवर लादण्यात आले आहेत. या नियमांचे पालन करण्याचे फर्मान प्रशासनाकडून सोडण्यात येते. तसे फर्मान 80 वर्षांपूर्वी वेंगुर्ल्यात आलेल्या प्लेगच्या साथीत सावंतवाडी संस्थानातील डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी सोडले होते.

वेंगुर्ल्यातील प्लेगची साथ सावंतवाडी, बांदा, कुडाळ भागात फैलावू नये, यासाठी वेंगुर्ल्यातून येणाऱया गाडय़ा, व्यक्ती मठ येथे तपासून सोडण्याचे फर्मान सोडले होते. तसेच येणाऱया मालाला ऊन दिल्याशिवाय शहरात आणण्यास बंदी घालण्यात आली होती. सध्या कोरोनाच्या काळात आधुनिक युगात अनेक निर्बंध नागरिकांवर आणण्यात आले. तसेच निर्बंध 80 वर्षांपूर्वी घालण्यात आले होते. साथीच्या काळात असे निर्बंध त्या-त्या शासन व्यवस्थेने घालून साथ आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यामुळे साथ आणि निर्बंध ही पूर्वीपासून अस्तित्वात असलेली प्रणाली असल्याचे दिसून येते.

कोरोनाची सुरुवात चीनमधून झाली. त्यानंतर या साथीने पूर्ण जगाला वेढले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना ही जागतिक महामारी असल्याचे
फेब्रुवारीत जाहीर केले. त्यानंतर अनेक देशांनी आपल्या देशात लॉकडाऊन जाहीर करून नागरिकांवर निर्बंध जाहीर केले. त्यानंतर राज्य, जिल्हावार निर्बंध शासनाने आणले. एका राज्यातून दुसऱया राज्यात, एका जिल्हय़ातून दुसऱया जिल्हय़ात जाण्यावरही निर्बंध घालण्यात आले. असेच निर्बंध वेंगुर्ल्यात प्लेगची साथ आली, त्यावेळी सावंतवाडी संस्थानच्या काळात 1938 मध्ये घालण्यात आले होते.

मठ येथे होई तपासणी

सध्या जसा आपत्ती व्यवस्थापन कायदा होता, तसा कायदा सावंतवाडी ऐपिडेमीक डिसिझीस अमेंडमेंट ऍक्ट सन 1937 चा कायदा होता. या कायद्यातील कलमान्वये वेंगुर्ल्यात आलेली प्लेगची साथ सावंतवाडीत पसरू नये, यासाठी या भागातून येणाऱया गाडय़ा व व्यक्ती मठ येथील पोलिसांकडून तपासून सोडण्यात येतील. त्यात कोणी संशयित आजारी व्यक्ती आढळल्यास त्याला तेथेच थांबवून त्याची तपासणी सावंतवाडी मेडिकल ऑफिसर यांच्याकडून झाल्यावर  त्यांच्या हुकमाप्रमाणे सोडण्याची व्यवस्था होई. त्याचप्रमाणे वेंगुर्ल्यातील कोणी स्थानिक रहिवासी वाडी, कुडाळ, बांदा शहरात येऊन राहणार असल्यास त्याने सावंतवाडी चीफ मेडिकल ऑफिसर, कुडाळ, बांदा येथे सब असिस्टंट सर्जन  यांच्याकडे राहून तपासून घेतले पाहिजे. तसे न केल्यास त्यास राहू दिले जाणार नाही व योग्य तसा हुकूम केला जाईल. तसे फर्मान तत्कालीन डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेटनी जाहीरनाम्यातून दिले होते. त्याचबरोबर वेंगुर्ल्यातून येणाऱया मालाबाबत खबरदारी म्हणून सॅनिटेशन बोर्ड नेमून संशयित माल असल्यास बोर्ड नेमून देईल त्या शहराबाहेरील जागेत व त्यास वाटेल तेवढा वेळ ऊन देण्यास भाग पाडण्याचा  व अशा तऱहेने ऊन दिल्याशिवाय शहरात आणण्याची बंदी घालण्याचा अधिकार कुडाळ सॅनिटेशन बोर्डास देण्यात आला होता.

सावंतवाडी संस्थानचे कार्य

साथरोग पसरू नये, यासाठी आज जसे कायदे होते, तसे कायदे सावंतवाडी संस्थानच्या काळात होते. सावंतवाडी संस्थानने प्लेग तसेच इतर साथरोग काळात भरीव असे कार्य केले होते. त्यामुळे जनतेचे प्राण वाचले होते. त्या काळातील कायदे पाहता आता शासनाने साथरोग पसरू नये, यासाठी घातलेले निर्बंध नागरिकांच्या हिताचे आहेत. त्यामुळे नागरिकांनीही त्याचे पालन करणे आवश्यक आहे.

Related Stories

हरवलेले पाकीट परत केल्यामुळे पिकुळे येथील आनंद नाईक यांचे सर्वत्र कौतुक

NIKHIL_N

सावंतवाडी भंडारी मंडळातर्फे जानेवारीत क्रिकेट स्पर्धा

Anuja Kudatarkar

पालिकेचे कोविड सेंटर आहे कुठे?

NIKHIL_N

..तर ‘कोरोना लढय़ा’तून सरपंच बाहेर!

NIKHIL_N

जिह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येने ओलांडला 7 हजाराचा टप्पा

Patil_p

कोरोनाग्रस्तांचा आकडा तीन हजारानजीक

NIKHIL_N
error: Content is protected !!