प्रतिनिधी / कोल्हापूर
पदोन्नतीतील आरक्षणाबाबत राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी पक्षपाती भूमिका घेतली आहे. मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व नागरिकांना समान न्याय देण्याच्या शपथेचा त्यांनी भंग केला आहे, असा आरोप मराठा क्रांती मोर्चाने केला आहे. राऊत यांचा राजीनामा घ्यावा, यासाठी राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचेही मोर्चाच्या वतीने सांगण्यात आले.
मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी सांगितले की : न्यायालयाच्या निर्णयानंतर राज्य शासनाने पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्यात येत असल्याचा जीआर 8 मे रोजी काढला होता. या आदेशामुळे खुल्या व ओबीसी प्रवर्गातील अधिकाऱयांच्या पदोन्नतीचा मार्ग खुला झाला होता. पण महाविकास आघाडीतील काही नेत्यांनी पदोन्नतीतील आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला विरोध करताना विधाने सुरू केली. राज्य सरकारवर दबाव वाढविला. यामध्ये ऊर्जामंत्री नितीन राऊत यांची भूमिका पक्षपाती होती. मंत्रिपदाची शपथ घेताना सर्व नागरिकांना समान न्याय देवू या तत्वाचा राऊत यांनी भंग केला आहे. त्यामुळे त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी आमची मागणी आहे. त्यासाठी राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना भेटून निवेदन देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.


previous post