Tarun Bharat

ऋतूंची सरमिसळ

भारतासारख्या उष्ण कटिबंधीय देशात पावसाळा, हिवाळा व उन्हाळा हे प्रामुख्याने तीन ऋतू मानले जातात. मात्र, अलीकडच्या काळात या तिन्ही ऋतूंमध्ये मोठय़ा प्रमाणात सरमिसळ होत असल्याचे पहायला मिळत आहे. पूर्वी ती होतच नव्हती, अशातला भाग नाही. किंबहुना, आजमितीला वातावरण इतके लहरी बनले आहे, की नेमका कुठला ऋतू सुरू आहे, असा प्रश्न पडावा. यंदाच्या हिवाळय़ात पावसाचा तडाखा, थंडीचा कडाका आणि दिवसा उन्हाचा भडका अशा तिन्ही ऋतू वैशिष्टय़ांचा अनुभव देश-प्रदेशातील नागरिकांना घ्यावा लागणे, यातून एकूणच बदलत्या वातावरणावरच झगझगीत प्रकाश पडतो.

 नेमेची येतो पावसाळा, असे म्हणतात. पावसाळाच काय हिवाळा वा उन्हाळा, हे ऋतूही दरवर्षी येतात आणि जातात. या तिन्ही ऋतूंमध्ये पाऊस, थंडी व उन्हाचा तडाखा जाणवणे, हे तसे सामान्य आहे. परंतु, यातील चढ-उतार तीव्रतेने जाणवू लागले आहेत. यंदाच्या थंडीबाबत तसे म्हणता येईल. उत्तर भारतापासून विदर्भ, मराठवाडापर्यंत थंडीचा कडाका जाणवणे, यात नवीन काही नाही. तथापि, या वर्षी अगदी मध्य महाराष्ट्र, दक्षिण महाराष्ट्रापर्यंत थंडीच्या लाटा उसळत राहिल्या. उत्तरेकडून येणाऱया थंड वाऱयांचा प्रभाव वाढल्याने संपूर्ण उत्तर, वायव्य तसेच मध्य  भारतात गारठा वाढला. परिणामी विदर्भ, मराठवाडय़ाबरोबरच मध्य महाराष्ट्रातील तापमानही मोठय़ा प्रमाणात घटल्याचे दिसून आले. काही जिल्हय़ांमधील आठ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आल्याचे आकडेवारी सांगते. याचदरम्यान काही भागांत पावसाचे चक्र सुरू झाले. ढगाळ वातावरण, मेघगर्जनेसह व विजांच्या कडकडाटासह पाऊस, गारपीटीची नोंद झाली. याशिवाय दुसऱया बाजूला देशाच्या काही शहरांमध्ये दुपारच्या सत्रात सूर्य आग ओकत होता. उष्णतेच्या या झळांनी एकप्रकारे उन्हाळय़ाची जाणीव करून दिली. अनेक शहरांनी यानिमित्ताने तिन्ही ऋतू एकाच वेळी अनुभवले. हा सारा वातावरण बदलाचा वा ग्लोबल वॉर्मिंगचाच परिणाम असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे.

Advertisements

उत्तरेत बर्फवृष्टी, धुके व पावसाचे सावट

मागच्या काही दिवसांपासून उत्तर भारतात बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढला असून, नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे.  देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत दाट धुक्याने वेढले आहे. पुढील दोन ते तीन दिवस दिल्लीत दाट धुके राहण्याची शक्मयता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर दिल्लीसह उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, चंदीगड, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशही धुक्याच्या दुलईत लपेटला आहे. या सर्व राज्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्मयतादेखील हवामान विभागाने वर्तवली आहे. श्रीनगरमधील वाढती थंडी पाहता  येथील तापमान शून्य अंशांपर्यंत खाली येऊ शकते. तर कमाल तापमान हे 6 अंश सेल्सिअस राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

महाराष्ट्रातही थंडी-पावसाचा लपंडाव

महाराष्ट्रासारख्या राज्याचा विचार केला, तर नोव्हेंबर, डिसेंबर हा थंडीचा मुख्य हंगाम. परंतु, या काळात ती तुलनेत जाणवली नाही. ढगाळ वातावरण, पाऊस, गारपीटीचा राज्याच्या बऱयाच भागाला सामना करावा लागला. स्वाभाविकच थंडीमध्ये चढ-उतार राहिला. हिमालयाच्या परिसरात बर्फवृष्टी होत असताना उत्तरेकडून दक्षिणेच्या दिशेने वारे वाहू लागतात. हे थंड वाऱयांचे प्रवाह महाराष्ट्रापर्यंत पोहोचतात. त्यानंतर राज्यात व राज्याच्या लगत थंडीचा कडाका जाणवतो. यंदा जानेवारीमध्ये ही सगळी हवामानीय गणिते जुळून आली नि तेथून खऱया अर्थाने थंडीचे अस्तित्व जाणवले. अर्थात मागच्या दीड ते दोन महिन्यांत थंडी वाढलेली असताना मध्येमध्ये वरुणराजानेही डोके काढलेच. तर दुपारी उन्हाचा तडाखा जाणवत असल्याचे चित्र आहे. दक्षिण भारतातील काही राज्यांमध्येही हीच स्थिती पहायला मिळते.

 ऋतूचक्र बदलतेय का?

मान्सून विलंबाने दाखल होणे वा त्याची वाटचाल धिम्या गतीने होणे, थंडी उशिरा पडणे वा लांबणे, तसेच अतितीव्र उन्हाळा, उष्णतेची लाट व एकूणच ऋतूचक्रात बदल होणे, हवामानाचे चक्र बदलणे, यांसारख्या मुद्दय़ांवर मागच्या काही वर्षांपासून मोठय़ा प्रमाणात चर्चा होत आहे. ग्लोबल वॉर्मिंगचाच हा परिपाक असल्याचेही मानले जात आहे. ऋतूचक्रामधील बदल पाहता त्यानुसार पीकपद्धतीत बदल करावे लागण्याची गरजही व्यक्त होत आहे.

उष्ण हवेने दिवसा उष्मा, रात्री थंडी

 अरबी समुद्र व हिंदी महासागराच्या पृ÷भागाचे तापमान वाढत असून त्यामुळेच भारताचे वातावरण सतत बदलत आहेत. त्यात आर्द्रतेचे प्रमाण वाढत आहे. पावसाचे ढग जास्त वेळ आर्द्रता रोखू शकत नाहीत आणि कमी वेळात जास्त पाऊस होतो. त्यामुळे पावसाची व्याप्ती कमी होत असून पावसाच्या दिवसांमधील अंतरही वाढत आहे. म्हणूनच दुष्काळ पडणे आणि उष्णतेची लाट येणे हे घडत आहे. हिवाळा ऋतूत पश्चिमेकडून येणारी हवा अरबी समुद्रावरून जात उष्ण होत असल्याने भारतात हिवाळय़ात दिवसा तापमान वाढत आहे, तर रात्री थंडी वाढत आहे.

माउंट एव्हरेस्टला वातावरण बदलाचा फटका

 माउंट एव्हरेस्टलाही सध्या वातावरण बदलाचा परिणाम सोसावा लागत असल्याचे समोर आले आहे. एव्हरेस्टवरील सर्वोच्च हिमनदी साउथ कोल ग्लेशियरच्या वितळण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. मानव प्रेरित हवामान बदल तसेच तापमानामुळे या हीमनदीवर परिणाम झाल्याने एव्हरेस्टवर स्केलिंग करणे पूर्वीपेक्षा कठीण होऊ शकते, असा इशारा एका नवीन अभ्यासानुसार देण्यात आला आहे. 2 हजार वर्षे 180 फुटाचे जुने ग्लेशियर अवघ्या 30 वर्षांत वितळणे, हे निश्चितपणे धक्कादायक आहे.

समुद्रातील उष्ण लाटांमध्येही वाढ

 दुसरीकडे हिंदी महासागरातील दीर्घकालीन तापमानवाढीसोबत आता सुमद्रातील ठरावीक भागांत उष्णतेच्या लाटांची संख्या वाढू लागल्याच्या आयआयटीएमच्या शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. समुद्रातील ठराविक भागाचे तापमान सरासरीपेक्षा बरेच वाढले, की त्याला समुद्री उष्ण लाट म्हटले जाते. पूर्वी समुद्री उष्ण लाटा या हिंदी महासागरात क्वचितच आढळत असत. मात्र, आता या घटना दरवर्षी वाढू लागल्या आहेत. हिंदी महासागराच्या पश्चिम भागात म्हणजेच अरबी समुद्र आणि लगतच्या क्षेत्रात या लाटांच्या घटना बऱयाच वाढलेल्या दिसतात. त्यांच्या वाढीचा दर हा दोन दशकांमध्ये तीन घटना इतका आहे. दुसरीकडे उत्तर बंगालच्या उपसागरात दोन दशकांमध्ये एक घटना इतकाच सीमित आहे. 1982 ते 2018 यादरम्यान पश्चिम हिंदी महासागरात 66 समुद्री उष्ण लाटांची नोंद झाली. याच काळात उत्तर बंगालच्या उपसागरात 94 उष्णतेच्या लाटा नोंद झाल्या होत्या. आता मात्र हिंदी महासागरातील लाटांची संख्या वाढताना दिसत आहे.

समुद्री जीवांवर परिणाम

 प्रमाणाबाहेर वाढलेल्या तापमानाचा थेट परिणाम समुद्री जीवांवर होत आहे. एप्रिल 2020 मध्ये मन्नारच्या आखातात आलेल्या उष्णतेच्या लाटेमुळे तेथील 85 टक्के प्रवाळ नष्ट झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. यामुळे समुद्री शैवाल आणि पाणगवतही नष्ट होत असून, मासेमारीलाही फटक बसत आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

 समुद्री जीवांवरही परिणाम

 या लाटांचा प्रभाव समुद्रालगतच्या वाऱयांच्या प्रवाहांवरही होतो. त्यामुळे मान्सून काळात आलेल्या अशा लाटांमुळे पावसाचे वितरण बदलते, असेही याबाबतच्या संशोधनात नमूद करण्यात आले आहे. हिंदी महासागर वा उत्तर बंगालच्या उपसागरात काठेही अशा लाटा आल्या, तरी त्या काळात बदललेल्या वाऱयांच्या प्रवाहांमुळे मध्य भारतातील पाऊस कमी होतो. तर दक्षिण भारतातील पाऊस वाढतो, असेही यात म्हटले आहे. अर्थात हिंदी महासागरातील या उष्ण लाटांचा अधिक अभ्यास करण्याची गरजही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे यावर जसा अधिक प्रकाश पडेल, तसे त्यातून अनेक पैलू समोर येऊ शकतात.

 हवामानीय कसोटी

 भारताकरिता मागील वर्षभराचे हवामान हे अनेकार्थांनी कसोटीचे राहिले आहे. चिपळूण, कोल्हापूर, गुजरात, उत्तराखंडसह देशातील अनेक भागांत अभूतपूर्व स्थिती पहायला मिळाली. कमी वेळेत अधिक पाऊस, हे सूत्र अनेक ठिकाणी दिसून आले. मागच्या काही वर्षांत पावसाचे हे रूप अनेकविध ठिकाणी पहायला मिळणे, ही धोक्याची घंटा आहे. हे पाहता भविष्यात त्याचे मोठे आव्हान असेल. यासोबतच दीर्घ टप्प्यातील गोठविणारी थंडी, बर्फवृष्टी आणि उष्णतेच्या लाटा यांचाहीही सामना करावा लागणार आहे.

 ऋतूबदल, हवामानबदल, वातावरणातील चढ-उतार या साऱयामागे जागतिक तापमानवाढ वा ग्लोबल वॉर्मिंग हाच घटक कारणीभूत असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. हे पाहता पर्यावरणाच्या प्रश्नाकडे सर्वांना लक्ष्य द्यावे लागले. भारताने 2070 पर्यंत देश कार्बन उत्सर्जनमुक्त करण्याचे म्हणजे नेट झिरोचे लक्ष्य बाळगले आहे. याकरिता उद्योगविश्वासह देशातील प्रत्येक नागरिकाला खारीचा वाटा उचलावा लागेल. प्रदूषणाला फाटा देण्याबरोबर निसर्गसंवर्धनावर भर द्यावा लागणार असून, पर्यावरणपूरक विकासाचे मॉडेलच आपल्याला हाती घ्यावे लागेल आणि तेच आपल्याला तारेल.

– पुणे टीम

Related Stories

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिरात होळीनिमित्त १०० किलो द्राक्षांची आकर्षक आरास

Rohan_P

भारतातील होलिकोत्सव

tarunbharat

पुणे : खजिना विहीर मंडळांच्या ‘सामाजिक उत्सवाला’ प्रारंभ

Rohan_P

…अन् शनिवार वाडय़ाचा दिल्ली दरवाजा उघडला

prashant_c

ताण-तणावाच्या निराकरणासाठी खेळ आवश्यक : डॉ. दीपक म्हैसेकर

prashant_c

केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून तुम्हीही होऊ शकता करोडपती

datta jadhav
error: Content is protected !!