ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम : मॅडिसन कीज, इगा स्वायटेक यांचे आव्हान समाप्त, पुरुष दुहेरीत ऑस्ट्रेलियाचे जेतेपद निश्चित


वृत्तसंस्था /मेलबर्न
ऑस्ट्रेलियाच्या अग्रमानांकित ऍश्ले बार्टीने ऑस्ट्रेलियन ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्याची प्रतीक्षा दीर्घकाळानंतर पूर्ण केली असून तिने बिगमानांकित अमेरिकेच्या मॅडिसन कीजचा पराभव केला. दुसऱया उपांत्य सामन्यात अमेरिकेच्या डॅनियली कॉलिन्सने अंतिम फेरी गाठली असून शनिवारी बार्टी व कॉलिन्स यांच्यात जेतेपदाची लढत होईल. पुरुष दुहेरीत निक किर्गीओस व थानासी कोकिनाकिस यांनी अंतिम फेरीत स्थान मिळविले आहे. दुसऱया ऑस्ट्रेलियन जोडीशीच त्यांची जेतेपदासाठी लढत होणार आहे.
1980 नंतर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी पहिली ऑस्ट्रेलियन महिला बनलेल्या बार्टीने मॅडिसन कीजवर 6-1, 6-3 असा एकतर्फी विजय मिळविला. याआधी 1980 मध्ये वेन्डी टर्नबुलनने असा पराक्रम केला होता. मात्र ख्रिस ओनील या एकमेव ऑस्ट्रेलियन खेळाडूने 1978 मध्ये या स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते. बार्टीने उपांत्य फेरी गाठेपर्यंत या स्पर्धेत केवळ 17 गेम्स गमविले आणि ही घोडदौड तिने या सामन्यातही कायम राखली. मॅडिसनने यापूर्वी 2017 मध्ये अमेरिकन ओपन स्पर्धेचे उपविजेतेपद मिळविले होते. बार्टीने या सामन्यात 20 तर कीजने केवळ 8 विजयी फटके मारले. बार्टीने सहापैकी चार ब्रेकपॉईंट्स संधींचा लाभ घेतला आणि आपली सर्व्हिस असताना दोन ब्रेकपॉईंट्स वाचवले. आतापर्यंत झालेल्या सहा सामन्यात बार्टीने फक्त एक सर्व्हिस गेम गमविला आहे. तिने यापूर्वी ग्रास कोर्टवर विम्बल्डनचे तर क्ले कोर्टवर पेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले असून आता हार्ड कोर्टवरील जेतेपदापासून ती केवळ एक विजय दूर आहे.
कॉलिन्सचा स्वायटेकला धक्का
दुसऱया उपांत्य सामन्यात कॉलिन्सने पोलंडच्या इगा स्वायटेकला चकित करीत अंतिम फेरी गाठली. तिने स्वायटेकवर 6-4, 6-1 अशी मात केली. जागतिक क्रमवारीत कॉलिन्स 30 व्या स्थानावर असून रॉड लेवर एरिनावर झालेल्या सामन्यात तिने जोरदार सुरुवात करीत 4-0 अशी आघाडी घेतली. सातव्या मानांकित स्वायटेकने प्रतिकार करीत तिला गाठण्याचा प्रयत्न केला. पण 28 वर्षीय कॉलिन्सने आघाडी राखत सेट जिंकला. दुसऱया सेटमध्येही कॉलिन्सने आपले वर्चस्व कायम राखत 4-0 अशी आघाडी मिळविली. पण यावेळी स्वायटेकला प्रतिआक्रमण करण्याची संधी मिळाली नाही. कॉलिन्सने समतोल राखत दुसऱया मॅचपॉईंटवर सेटसह सामना 78 मिनिटांत संपवला. स्वायटेकने 2020 मध्ये प्रेंच ओपन स्पर्धेचे जेतेपद मिळविले होते.
व्हीलचेअर क्वाड टेनिसपटू अल्कॉटची पराभवाने कारकिर्दीची सांगता
स्पर्धेच्या अकराव्या दिवशी सर्वात यशस्वी व्हीलचेअर क्वाड टेनिसपटू डायलन अल्कॉटने कारकिर्दीचा शेवट पराभवाने केला. या विभागातील एकेरीच्या अंतिम सामन्यात त्याला नेदरलँड्सच्या सॅम स्क्रोडरकडून पराभव स्वीकारावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या राष्ट्रीय दिनी अल्कॉटला वर्षातील सर्वोत्तम ऑस्ट्रेलियनचा बहुमान देऊन गौरव करण्यात आला होता. कॅनबेरात हा कार्यक्रम झाला. निवृत्त होताना अल्कॉटने व्हीलचेअर क्वाडमध्ये 15 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आणि गेल्या वर्षी त्याने गेल्डन स्लॅम साधण्याचा पराक्रमही केला. गेल्या वर्षातील चार ग्रँडस्लॅमसह त्याने टोकियोतील पॅराऑलिम्पिकमध्येही सुवर्णपदक पटकावले होते. याशिवाय दुहेरीतही त्याने 8 ग्रँडस्लॅम अजिंक्यपदे मिळविली आहेत. या स्पर्धेनंतर निवृत्त होणार असल्याचे त्याने याआधीच जाहीर केले होते.
ऑस्ट्रेलियाचे जेतेपद निश्चित


बार्टीने ऑस्ट्रेलियासाठी जेतेपद मिळविण्याच्या दिशेने आगेकूच केली असली तरी आणखी एका प्रकारात ऑस्ट्रेलियाचे जेतेपद निश्चित झाले आहे. पुरुष दुहेरीत किर्गीओस व कोकिनाकिस या स्पेशल ‘के’ नी अंतिम फेरी गाठली असून त्यांचेच देशवासी मॅथ्यू एब्डन व मॅक्स पर्सेल यांच्याशी त्यांची जेतेपदाची लढत होणार आहे. किर्गीओस-कोकिनाकिस यांनी तिसऱया मानांकित मार्सेल ग्रॅनोलर्स व होरासिओ झेबालोस यांच्यावर 7-6 (7-4), 6-4 अशी मात केली. या सामन्यासाठी प्रेक्षकांना परवानगी दिली गेली असल्याने स्टेडियम पूर्ण भरले होते. मात्र मार्गारेट कोर्ट एरिनावर झालेला दुसरा उपांत्य सामना प्रेक्षकाविना रिकाम्या स्टेडियमवर खेळविण्यात आला. त्यात एब्डन-पर्सेल यांनी दुसऱया मानांकित राजीव राम व जो सॅलिसबरी यांच्यावर 6-3, 7-6 (11-9) अशी मात केली.