Tarun Bharat

एकही गाव पाण्यासाठी तळमळू नये यासाठी प्रयत्न

उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांचे प्रतिपादन, पायराबांद – कुंकळ्ळी येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचे उद्घाटन

प्रतिनिधी / कुंकळ्ळी

राज्यातील एकही गाव पाण्यासाठी तळमळणार नाही व प्रत्येक घराला आवश्यक तेवढे पिण्याचे पाणी उपलब्ध होईल यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत असून कुंकळ्ळी, वेळ्ळी, केपे व काणकोण या चार मतदारसंघांतील ग्रामीण भागांना जलपुरवठा करणाऱया प्रकल्पाचे लोकार्पण करताना आपल्याला आनंद होत असल्याचे उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी कुंकळळीतील पायराबांद येथील पाणीपुरवठा प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री दीपक पाऊसकर, कुंकळ्ळीचे आमदार क्लाफासियो डायस, दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष खुशाली वेळीप, गिरदोली जिल्हा पंचायत सदस्या संजना वेळीप, खोल जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, प्रभागाचे नगरसेवक राहुल देसाई, फातर्पा ग्रामपंचायत सदस्या शीतल नाईक, मेदिनी नाईक, बाळळी पंचायत सदस्य राजू गोसावी, मोरपिर्ला पंचायत सदस्य खुशाली वेळीप, सा. बां. खात्याच्या साहाय्यक अभियंत्या हर्षा काकोडकर, नागेश वरक, साहाय्यक अभियंता वसुराज करमरकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

कवळेकर यांनी यावेळी कोविड महामारीकडे लक्ष वेधले. ते म्हणाले की, कोविड महामारीत अनेक आर्थिक व इतर समस्या असताना सरकारने विकासकामांत कोणतीच उणीव ठेवली नाही. कित्येक वर्षांपासून या भागातील लोकांना हव्या त्या प्रमाणात पिण्याचे पाणी उपलब्ध होत नव्हते. कुंकळ्ळी-नव्याबांद येथील पाणीपुरवठा टाक्मयांची क्षमता कमी होत असल्यामुळे एका दिवशी एका पंचायत क्षेत्रात, तर दुसऱया दिवशी दुसऱया पंचायत क्षेत्रात अशी पाणी सोडण्यासाठी कसरत करावी लागत होती. ती कसरत आता नव्याने सुरू करण्यात आलेल्या समांतर जलवाहिनीमुळे थांबणार आहे, असे त्यांनी सांगितले. बार्से, मोरपिर्ला या पंचायतींतील पाण्याची समस्या सोडविण्यासाठी ‘जायका’ योजनेच्या अंतर्गत सुमारे 9 कोटी खर्चून जलवाहिन्या टाकण्याचे व टाक्मया उभारण्याचे काम सुरू झाले असून लवकरच केपे मतदारसंघ पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होणार असल्याचे कवळेकर म्हणाले.

जलशुद्धिकरण क्षमता वाढविण्याचा प्रस्ताव

सार्वजनिक बांधकाममंत्री पाऊसकर यांनी सांगितले की, दक्षिण गोव्यातील पाण्याची टंचाई दूर करण्यासाठी साळावली येथे अतिरिक्त शंभर एमएलडी क्षमतेच्या जलशुद्धिकरण प्रकल्पाचा प्रस्ताव तयार केला असून सरकारकडून मान्यता मिळाल्यावर जानेवारी महिन्यात तो सुरू होईल. या योजनेमुळे साळावली जलशुद्धिकरण प्रकल्पाची क्षमता चारशे एमएलडीवरून पाचशे एमएलडी होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पायराबांद येथील पाणीपुरवठा प्रकल्पाचा फायदा सुमार 35 ते 45 हजार लोकांना होणार असून आंबावली, वेळ्ळी, बेतूल, फातर्पा, बार्से, बाळळी या ग्रामपंचायत क्षेत्रांतील व  कुंकळ्ळी तसेच काणकोणमधील खोल या भागातील लोकांना याचा फायदा होणार आहे. आठ किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीतून कुंकळ्ळी-पायराबांद येथील पंप हाऊसमध्ये पाणी साठवून पुरवठा केला जाणार आहे. या योजनेवर सरकारने साडेआठ कोटी रुपये खर्च केल्याचे पाऊसकर यांनी सांगितले.

दोन वर्षांनी योजना पूर्ण

ही योजना पूर्ण होण्यासाठी दोन वर्षे लागली. आंबावली येथे पाणीपुरवठा योजनेची पायाभरणी करण्यात आली होती याची आठवण आमदार डायस यांनी करून दिली. ही योजना आता कार्यान्वित होत आहे. यामागे उपमुख्यमंत्री कवळेकर व मंत्री पाऊसकर यांचे योगदान मोठे आहे. तसेच बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी नीट लक्ष पुरविले, असे सांगून आता या योजनेचा लोकार्पण कार्यक्रम होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. कुंकळ्ळीत विकासकामांसाठी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे चांगले सहकार्य लाभत आहे. कुंकळ्ळीत लवकरच कोविडसंदर्भात ‘स्टेप-अप’ इस्पितळ सुरू करण्यात येणार असून सरकारचा प्रतिसाद मिळाला आहे. आठवडाभरात ते सुरू होईल, असे डायस यांनी सांगितले. बांधकाम खात्याचे एसई क्लेस्बी डायस यांनी स्वागत केले व कार्यकारी अभियंता विश्वंभर भेंडे यांनी आभार मानले.

Related Stories

विजयश्री’ पुस्तकाचे प्रकाशन

Amit Kulkarni

लोकायुक्तांकडे 75 प्रकरणे प्रलंबित

Amit Kulkarni

श्री दिलिप परूळेकर ह्याच्या निवासस्थानातील नऊ दिवसांच्या गणपतीचे उत्साहात विसर्जन

Omkar B

चार वाघाच्या मृत्यु संदर्भातील पाचही संशयितांना जामीन मंजूर.

Patil_p

अंतिम वर्षाच्या परीक्षा ऑफलाईन नकोच

Amit Kulkarni

नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर यांचा तुयेत सत्कार

Amit Kulkarni