Tarun Bharat

एकही चेंडू न खेळता भारत अंतिम फेरीत

Advertisements

सिडनी / वृत्तसंस्था :

साखळी फेरीत अपराजित राहिलेल्या भारतीय महिला संघाने त्याच बळावर आयसीसी टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत आगेकूच केली. गुरुवारी इंग्लंडविरुद्धची उपांत्य लढत पावसाच्या व्यत्ययामुळे होऊ शकली नाही आणि यामुळे भारताला एकही चेंडू न खेळता देखील अंतिम फेरीत धडक मारता आली. स्पर्धेतील दुसऱया उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेला चीत करत दुसरे स्थान निश्चित केले. भारतीय महिला व ऑस्ट्रेलियन महिला संघात आता येत्या रविवारी (8 मार्च) महिला दिनीच या स्पर्धेची फायनल खेळवली जाणार आहे.

गुरुवारी सकाळी प्रारंभी पावसाच्या व्यत्ययामुळे नाणेफेक लांबणीवर टाकावी लागली आणि त्यानंतर पूर्ण सामनाच एकाही चेंडूचा खेळ न होता रद्द केला गेला. अर्थातच, इंग्लिश संघाची यामुळे सपशेल निराशा झाली. गटात अव्वल असण्याच्या निकषावर भारताचे या स्पर्धेतील अंतिम फेरीतील स्थान निश्चित झाले.

‘इंग्लंडमध्ये नेहमी हवामानावर अधिक चर्चा होते आणि अंतिमतः हवामानच हाताबाहेरचे होते. मागील काही सामन्यात आम्हाला थोडाफार सूर सापडत होता आणि ऐन मोक्याच्या क्षणी खराब हवामानाचा फटका सोसत आम्हाला स्पर्धेबाहेर जावे लागत आहे, त्याचे अधिक दुःख आहे’, असे निराश इंग्लिश कर्णधार हीदर नाईट म्हणाली. मागील आवृत्तीत इंग्लंडचा संघ उपविजेता ठरला होता.

‘आम्हाला पहिल्या सामन्यात पराभव स्वीकारावा लागला आणि त्या खराब सुरुवातीमुळे अंतिमतः फटका सोसावा लागला. प्रारंभी अपेक्षित सुरुवात न करणे ही आमची वाईट सवय झाली आहे’, याचाही तिने उल्लेख केला. या स्पर्धेत भारताने अ गटात साखळी फेरीतील आपले चारही सामने जिंकत 8 गुणांसह अव्वलस्थान संपादन केले तर दुसरीकडे, इंग्लंडला ब गटात 3 विजय व 1 पराभव अशा कामगिरीसह दुसऱया स्थानी समाधान मानावे लागले होते.

‘उपांत्य फेरी काही कारणामुळे होऊ शकली नाही तर अशा परिस्थितीत साखळी फेरीअखेर अव्वलस्थानी राहणे महत्त्वाचे ठरु शकेल, याची आम्हाला पहिल्या दिवसापासून कल्पना होती. आम्ही चारही सामने जिंकू शकलो, याचे श्रेय सांघिक आहे’, असे भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर म्हणाली.

सध्याच्या घडीला आमचे सर्व खेळाडू बहरात आहेत. शेफाली वर्मा व स्मृती मानधना यांच्यामुळे संघ मजबूत आहे. मी व स्मृती पूर्ण बहरात येण्यासाठी शक्य तितका सरावावर भर देत आहोत’, असे कौरने पुढे नमूद केले. यापूर्वी आयसीसी टी-20 महिला विश्वचषक स्पर्धेतील 7 आवृत्तीत भारताला एकदाही अंतिम फेरीत पोहोचता आले नाही. यंदा मात्र संघाने ही मालिका खंडित केली आहे आणि दे दणादण विजय संपादन करत गेल्याने ते जेतेपदाचे प्रबळ दावेदार म्हणूनही ओळखले जात आहेत.

भारतीय महिला संघाने या मोसमात विद्यमान विजेत्या ऑस्ट्रेलियाला नमवत दमदार सुरुवात केली आणि त्यानंतर बांगलादेश, न्यूझीलंड, श्रीलंका यांनाही पराभवाचे धक्के देत ते साखळी फेरीत अपराजित राहिले. पहिल्या उपांत्य लढतीप्रमाणेच दुसरी उपांत्य लढतही पूर्ण होऊ शकली नसती तर दक्षिण आफ्रिकेचा संघ  अंतिम फेरीत पोहोचणे अपेक्षित होते. पण, प्रत्यक्षात त्या लढतीत चांगलाच उलटफेर झाला. 

उपांत्य फेरीसारख्या महत्त्वाच्या लढतीसाठी राखीव दिवस ठेवला जात नाही, ते संताप आणणारे आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साखळी फेरीत पराभव स्वीकारावा लागला होता, त्याची आम्हाला येथे मोठी किंमत मोजावी लागली.

-इंग्लिश महिला संघाची कर्णधार हीदर नाईट

दुर्दैवाने खेळ होऊ शकला नाही. पण, खेळाचे नियम असतात आणि प्रत्येकाला त्याचे पालन करावे लागते. भविष्यात बाद फेरीतील लढतींसाठी राखीव दिवसाचे नियोजन विचारात घ्यायला हवे.

-भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रित कौर

Related Stories

मोठी बातमी ! महाराष्ट्र निर्बंधमुक्त, मास्क पण ऐच्छिक ; राजेश टोपे यांची माहिती

Abhijeet Shinde

ममता बॅनर्जी यांच्या भावाचे कोरोनामुळे निधन

Patil_p

सवदी यांचे वक्तव्य कर्नाटकातील जनतेला खुश करण्यासाठी : उपमुख्यमंत्री अजित पवार

Abhijeet Shinde

खाटांगळेत अशा स्वयंसेविका मारहाण प्रकरणातील तिघांना अटक

Abhijeet Shinde

मिरजेत नवे 14 रुग्ण, राजकीय नेत्यासह दोघांचा मृत्यू

Abhijeet Shinde

आठ दिवसात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवा

Patil_p
error: Content is protected !!