वाचनाच्या छंदामुळे 3 पिढय़ांची मोलकरीण झाली स्टार
जॉइस फर्नांडिस स्वतःच्या कुटुंबाची तिसऱया पिढीतील मोलकरीण होती. ती एका अर्पाटमेंटमध्ये घराची देखभाल आणि साफ-सफाईचे काम करायची. जॉइस कित्येक तास बुक-शेल्फ साफ करत असायची, याचदरम्यान जॉइसला ‘ओल्गा ः रिव्हॉल्युशनरी अँड मार्टियर’ नावाचे पुस्तक दिसले, जे वाचण्यास तिने सुरुवात केली.


घरमालक बाहेर गेल्यावरच जॉइस हे पुस्तक वाचायची, मालकाने पुस्तक वाचताना पाहिल्यास कामावरून काढून टाकू शकतो अशी भीती तिला सतावत होती. पण एकेदिवशी तिच्या मालकाने पुस्तक वाचताना तिला पाहिले. त्याने जॉइसला बोलावून तिचे कौतुक केले तसेच पुस्तकांच्या वाचनासाठी प्रेरित केले. जॉइसने त्यानंतर पुस्तक वाचण्याचा धडाकाच लावला, महाविद्यालयात प्रवेश घेतला आणि 2012 मध्ये पदवीही प्राप्त केली.
शिक्षणानंतर जॉइसने मोलकरीणींच्या जीवनावर पुस्तक लिहिले. हे पुस्तक ब्राझीलमध्ये चर्चेचा विषय ठरले. जॉइसने टीव्हीवर काही कार्यक्रमांचे सूत्रसंचालनही करत मोलकरीणींचे आयुष्य आणि वर्णभेदावर स्वतःची भूमिका मांडली आहे. त्यानंतर कलेच्या माध्यमातून स्वतःचा आवाज उठविला आणि रॅपर झाली. जॉइस आता ब्राझीलची नायिका ठरली आहे. लोक तिला प्रेटा रारा म्हणजेच अद्वितीय कृष्णवर्णीय महिला म्हणून ओळखतात.
उरलेले अन्न मिळायचे
ज्या घरांमध्ये मोलकरीण म्हणून काम केले, तेथे केवळ शिल्लक राहिलेले अन्न दिले जायचे. स्वच्छतागृहाच्या वापरावरही बंदी होती. पाय धुवूनच घरात प्रवेश मिळायचा. नुकसान झाल्यावर यातना दिल्या जायच्या. ही केवळ माझीच नव्हे तर बहुतांश मोलकरीणींची (मेड) व्यथा होत. पण अशा स्थितीत मोठय़ा मनाचा मालक मिळणे माझ्यासाठी सुदैवी ठरल्याचे 35 वर्षीय जॉइस सांगतात.