Tarun Bharat

एक नळ दोन बिल, जनता झाली हवालदिल!

‘उचल पेन फाड पावती’प्रकाराने नळधारकांतून आश्चर्य : हस्तांतर करारावेळी दाखविलेली थकबाकी अद्यापही मागील पानावरून पुढे असाच प्रकार

प्रतिनिधी /बेळगाव

शहरातील काही नागरिकांकडे एक नळ जोडणी असताना दोन नळ जोडणीचे बिल पाणीपुरवठा मंडळाकडून देण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दक्षिण व उत्तर भागातील 193 नळधारकांना दोन-दोन बिले देण्याचे प्रकार सुरू आहेत. पाणीपुरवठा मंडळ आणि महापालिकेच्या हस्तांतर करारावेळी दाखविलेली थकबाकी अद्यापही मागील पानावरून पुढे असाच प्रकार सुरू आहे. आता एल ऍण्ड टी कंपनीकडे हस्तांतरण करतानाही थकबाकीचा बोजा नागरिकांच्या डोक्मयावर राहण्याची शक्मयता आहे.

शहरात पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्यात आले. 2006 मध्ये प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणीपुरवठा योजना आणि हिडकल पाणी योजना राबविण्यात आली. त्याकरिता महापालिकेकडील पाणीपुरवठा नियोजनाचा कारभार कर्नाटक पाणीपुरवठा मंडळाकडे हस्तांतर करण्यात आला. हे हस्तांतर करताना काही नागरिकांकडे नळ बिले थकीत असल्याचे दाखविले होते. एक नळ जोडणी असताना त्यांच्या नावे दोन नळ जोडण्या असल्याचे दाखवून दोन बिले दाखविण्यात आली होती. त्यापैकी एक नळ जोडणीचे बिल थकीत असल्याचे महापालिकेच्या दप्तरी नोंद होते. ही रक्कम नागरिकांकडे थकबाकी असल्याचे हस्तांतरावेळी दाखविण्यात आले होते. तेव्हापासून ही रक्कम नागरिकांच्या नावे थकीत असून वसूल करण्यासाठी पाणीपुरवठा मंडळाकडून नागरिकांना वेळोवेळी बिले देण्यात येत आहेत. पण याबाबत नागरिकांनी तक्रार केली असता ही थकबाकी महानगरपालिकेपासून असल्याचे सांगण्यात येते. 2006 पासून अशा प्रकारे बिले देण्यात येत असल्याने पाणीपुरवठा मंडळाच्या माहितीनुसार जानेवारी 2020 पर्यंत 66 लाख 77 हजार 948 रुपये नागरिकांकडे थकीत असल्याचे दाखविले आहे. त्यामुळे  बिलासाठी नागरिकांकडे तगादा लावण्यात येत आहे.

तक्रार करूनही दोन बिले देण्याचा प्रकार

वास्तविक, शहरातील नागरिकांकडे एकच नळ जोडणी आहे. मात्र, त्यांना दोन बिले देण्यात येत आहेत. त्यापैकी काही नागरिकांनी एक बिल नियमितपणे भरले आहे. दुसरे बिल भरले नसल्याने थकीत असल्याचे पाणीपुरवठा मंडळाकडून सांगण्यात येते. गोंधळी गल्ली येथील विनय चव्हाण यांना अशाचप्रकारे दोन बिले देण्यात आली. विनय यांच्या आजोबाच्या नावे नळ जोडणी असल्याने त्यांनी चौकशी केली. विनय नाथाजी चव्हाण यांनी पाणीपुरवठा मंडळाकडे अर्ज करून एकच नळ जोडणी असताना दोन बिले येत असल्याची तक्रार केली. दोन बिले कशी दिली जातात याची माहिती द्यावी, अशी मागणी करून नियमित भरलेल्या नळ बिलाच्या पावत्या पाणीपुरवठा मंडळाकडे सादर केल्या होत्या. तरीदेखील दोन बिले देण्याचा प्रकार सुरूच आहे. 30 ऑक्टोबर रोजी एकाच नळ जोडणीची दोन बिले देण्यात आली. एका बिलाची रक्कम नियमितपणे भरल्याने थकबाकी नसल्याचे दिसून आले. दुसऱया बिलामध्ये दि. 30 ऑक्टोबर 2020 पर्यंत 27 हजार 936 रुपये थकबाकी असल्याची नोंद होती.

त्यामुळे नार्वेकर गल्ली येथील आरटीआय कार्यकर्ते लखन चव्हाण यांनी माहिती हक्क अधिकाराखाली पाणीपुरवठा मंडळाकडे अर्ज करून एक टॅप आणि दोन बिलाबद्दलची माहिती देण्याची विनंती केली. त्यामुळे शहरातील असंख्य नागरिकांना दोन बिले देण्यात येत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दक्षिण व उत्तर भागात 193 नळधारकांना दोन बिले देण्यात येत आहे. 58 वॉर्डमधील 193 नळधारकांकडे जानेवारी 2020 पर्यंत 66 लाख 77 हजार 948 रुपये थकबाकी असल्याची माहिती पाणीपुरवठा मंडळाने लखन चव्हाण यांना दिली आहे. नियमितपणे बिल भरणा करूनही थकबाकी कशी याची माहिती पाणीपुरवठा मंडळाकडे विचारली असता, महानगरपालिकेने हस्तांतर करतेवेळी दिलेल्या नोंदवहीत पाणी बिले थकबाकी असल्याचे सांगण्यात आले. याचा सविस्तर आढावा घेता काही नागरिकांच्या नावे दोन नळ जोडण्या असल्याचे नोंदवहीत दाखविले आहे. विनय चव्हाण यांच्या आजोबांच्या नावे नोंदवहीत दोन नळ जोडण्या असल्याचे दाखविण्यात आले होते. त्यामुळे नळ जोडणीची माहिती घेण्याची विनंती विनय चव्हाण यांनी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांकडे केली. त्यावेळी नळ जोडणीची प्रत्यक्ष पाहणी करून याची माहिती घेतली असता सदर ठिकाणी एकच नळ जोडणी असल्याचे आढळून आले.

यापूर्वीही याबाबत तक्रार केल्यानंतर पाणीपुरवठा मंडळाने नळ जोडणीची तपासणी केली असता केवळ एकच नळ जोडणी असल्याचे आढळले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाने यादी तयार करून ठेवली आहे. पण सदर बिल वसूल करण्याचा प्रकार सुरूच आहे. नागरिकांना बिले देण्यात आल्यानंतर थकबाकीची रक्कम वाढत असल्याचे पाहून काही नागरिकांनी ही रक्कम भरणा करून कटकटीतून सुटका करून घेतली आहे. थकबाकीचा प्रकार 2006 पासून असून, पाणीपुरवठा मंडळाच्या दप्तरात आता ही थकबाकी जैसे थे आहे. त्यामुळे 24 तास योजनेसाठी एल ऍण्ड टी कंपनीकडे हस्तांतर करताना ही रक्कम थकबाकी असल्याचे पाणीपुरवठा मंडळाकडूनही दाखविण्याची शक्मयता आहे. एल ऍण्ड टीकडे कारभार सोपविल्यानंतर एक नळ जोडणी आणि 2 पाणी बिलांचा मुद्दा ऐरणीवर येण्याची शक्मयता आहे. त्यामुळे या थकबाकीच्या रकमेवर तोडगा काढणे गरजेचे आहे. महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाच्या कारभाराचा फटका नागरिकांना बसत असून आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे.

थकीत रकमेबाबत तोडगा काढणे गरजेचे

महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाच्या कारभारातील थकबाकीची रक्कम मागील पानावरून पुढच्या पानावर राहिली आहे. त्यामुळे एल ऍण्ड टीकडे हस्तांतर करताना थकबाकी राहण्याची शक्मयता असून नागरिकांवर होणारा अन्याय तसेच सोसावा लागणारा भुर्दंड टाळण्यासाठी थकीत रकमेबाबत तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळ, महापालिका आणि एल ऍण्ड टी कंपनीच्या प्रतिनिधींनी एक नळ जोडणी आणि दोन पाणी बिलांबद्दलच्या प्रकारावर चर्चा करून निर्णय घ्यावा, अशी मागणी विनय चव्हाण यांनी केली आहे.

Related Stories

सावधान… डेंग्यूसदृश रुग्णांची संख्या वाढतेय

Amit Kulkarni

बिम्स्वरील हल्ला प्रकरणी

Patil_p

अगसगे-बोडकेनहट्टी मार्गावर खचलेल्या रस्त्याकडे अद्याप दुर्लक्ष

Tousif Mujawar

विद्यार्थ्यांचा धोकादायक बसप्रवास सुरूच

Amit Kulkarni

कुडचीत पोलीस बंदोबस्त कायम

Patil_p

होसूर येथील सरकारी दवाखान्यात कोरोना योद्धय़ांचा सत्कार

Patil_p