Tarun Bharat

एचएस प्रणॉयची बॅडमिंटन संघटनेकडे क्षमायाचना

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

अव्वल बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयने भारतीय बॅडमिंटन संघटनेवर तीव्र टीका केल्याबद्दल मंगळवारी जाहीर माफी मागितली. यापूर्वी अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली नाही म्हणून प्रणॉयने राष्ट्रीय बॅडमिंटन संघनटेवर जोरदार टीकास्त्र सोडले होते.

बॅडमिंटन संघटनेने दुर्लक्ष केल्यानंतर मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी आपल्या अधिकारात एचएस प्रणॉयची पुरस्कारासाठी शिफारस केली. स्वतः राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित असल्याने या अधिकारातून त्याने प्रणॉयचे नाव सूचवले. बॅडमिंटनच्या जागतिक मानांकन यादीत एचएस प्रणॉय 28 व्या स्थानी आहे. राष्ट्रीय संघटनेने दुर्लक्ष केल्यानंतर त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून जोरदार टीका केली होती.

दरम्यान, त्याने आता क्षमायाचना केल्यानंतर भारतीय बॅडमिंटन संघटनेचे अध्यक्ष हिमांता बिस्वा शर्मा यांनी त्याचा स्वीकार केला आणि महासचिव अजय सिंघानिया यांनी प्रणॉयकडून पुन्हा अशी चूक होणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

‘अशी काही आगळीक झाली, हे दुर्दैवी आहे. पण, प्रणॉयने याबाबत आमच्याशी संपर्क साधला आणि आपली चूक कबूल केली. कोणा खेळाडूला संघटनेच्या एखाद्या निर्णयाबाबत साशंकता किंवा हरकत असेल तर त्यांनी सर्वप्रथम थेट संघटनेशी संपर्क साधणे आवश्यक आहे’, अशी सूचना सिंघानिया यांनी केली. दि. 2 जून रोजी भारतीय बॅडमिंटन संघटनेने सात्विकराज रणकिरेड्डी, चिराग शेट्टी व समीर वर्मा यांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. या यादीतून डावलले गेल्याने एचएस प्रणॉय कमालीचा नाराज झाला आणि आपल्या संतापाला त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून वाट करुन दिली होती.

‘पुन्हा जुनीच तऱहा. ज्यांनी राष्ट्रकुल व आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली, त्यांची शिफारस अजिबात नाही आणि जे खेळाडू या महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये आसपासही नव्हते, त्यांची मात्र आवर्जून शिफारस झाली आहे’, असे प्रणॉयने ट्वीट केले होते. नंतर ते ट्वीट त्याने डिलिट केले होते.

प्रणॉय व त्याचा संघसहकारी किदाम्बी श्रीकांत हे फेब्रुवारीत मनिला येथे झालेल्या आशियाई सांघिक चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत खेळले नव्हते, त्याबद्दल राष्ट्रीय संघटना या खेळाडूंवर नाराज असल्याचे मानले जाते. या उभयतांनी मनिलातील स्पर्धेत न खेळता बार्सिलोनातील आणखी एका स्पर्धेत सहभागी होणे पसंत केले होते. भारताला मनिलातील त्या उपांत्य फेरीत पराभव स्वीकारावा लागला. पण, ते कांस्यपदक मिळविण्यात यशस्वी ठरले होते. या सर्व घडामोडीनंतर मागील आठवडय़ात श्रीकांतने आपली चूक कबूल करत त्याबद्दल माफी मागितल्याने राष्ट्रीय बॅडमिंटन संघटनेने त्याची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली आहे.

Related Stories

सॅफ यू-17 चॅम्पियनशिपमध्ये भारताला जेतेपद

Amit Kulkarni

33 संभाव्य हॉकीपटूंची घोषणा

Patil_p

कसोटीत ऑस्ट्रेलिया, टी-20 मध्ये भारत अग्रस्थानी

Patil_p

थॉमस-उबेर चषक बॅडमिंटन स्पर्धेतून थायलंडची माघार

Patil_p

लीग रद्द करण्याची शिफारस, बगान विजेते

Patil_p

ऑस्ट्रेलियाला हरवून इंग्लंडची मालिकेत विजय सलामी

Patil_p