Tarun Bharat

एपीएमसीत कांदा दरात मोठी घसरण

वार्ताहर / कंग्राळी खुर्द

बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लाल कांदा दरात 1500 रुपये तर सफेद कांदा दरात 1000 रुपयांची घसरण झाली. स्थानिक जवारी लाल बटाटा 300 रुपयांनी कमी झाला तर सफेद स्थानिक बटाटा आणि इंदोरच्या बटाटय़ाचे भाव स्थिर होते. आग्रा बटाटा आणि गूळ दरात 100 रुपयांची वाढ
झाली.

शनिवारी बाजारात 70 ट्रक कांदा आवक होती. मागील बाजारापेक्षा 25 ट्रक कांदा आवक जादा होती. महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे परिसरात कांदा काढणी हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे बाजारात कांदा आवक वाढली आहे. याचा परिणाम कांदा दरात घसरण होत असल्याची माहिती व्यापारी विकी (महेश) सचदेव यांनी दिली.

बाजारातील 70 ट्रक कांदा आवकेपैकी 40 ट्रक लाल कांदा हा महाराष्ट्रातील होता तर 25 ट्रक सफेद कांदा गुजरातमधून विक्रीसाठी आला होता. 5 ट्रक कांदा आवक ही कर्नाटकाची होती.

बेळगाव बाजारामध्ये गुजरातमधून नवीन डिसा बटाटा आवकेला सुरुवात झाली आहे. प्रारंभी त्याचा भाव 900 ते 1000 रुपये असा होता. बाजारात परराज्यातील बटाटा आवक 9 ट्रक इतकी होती. यामध्ये इंदोर 6 ट्रक, डिसा 2 ट्रक, आग्रा 1 ट्रक तर धारवाडचा बटाटा 1 ट्रक आवक होती. इंदोरच्या बटाटय़ाचे भाव स्थिर होते. आग्रा बटाटा 100 रुपयांनी महागला, अशी माहिती व्यापारी तुषार टुमरी यांनी
दिली.

परराज्यातील बटाटा आवक मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. याचा परिणाम स्थानिक जवारी बटाटय़ाला मागणी कमी झाली आहे. त्यामुळे जवारी लाल बटाटय़ाचे भाव कमी झाले असल्याची माहिती व्यापारी राहुल होनगेकर यांनी दिली. होळी पौर्णिमेनंतर स्थानिक उन्हाळी बटाटा आवकेला सुरुवात होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बाजारात 400 पोती बटाटा आवक झाली होती.

बाजारात गूळ आवकेत घट होत चालली आहे. गूळ उत्पादक क्षेत्रात गूळ उत्पादन कमी प्रमाणात होत आहे. त्यामुळे गुळाला किंचितशी मागणी वाढली आहे. याचा परिणाम गूळ दरात 100 रुपयांची वाढ झाली असल्याची माहिती व्यापारी तानाजी हिरोजी यांनी दिली. बाजारात आठवडाभरात 1000 रवे गूळ आवक झाली होती. त्याचा भाव चांगल्या प्रतीचे गूळ 3200 ते 3400 रुपये, दुय्यम प्रतीचे गूळ 3000 ते 3100 रुपये झाला.

Related Stories

शहराबाहेरील रस्त्यांवरही भटक्या जनावरांचा अडथळा

Patil_p

खानापूर तालुक्यातील शासकीय इमारतींची निर्मिती हे माझे भाग्य

Amit Kulkarni

अवकाळी पावसाच्या दणक्मयाने शेतकरी हतबल

Omkar B

चन्नम्मा चौकात जलवाहिनीला गळती

Omkar B

येळ्ळूर खटल्याची सुनावणी पुन्हा लांबणीवर

Omkar B

रेणुकादेवी भक्तांसाठी कपिलेश्वर मंदिरात सोय

Amit Kulkarni