Tarun Bharat

एमआयडीसीच्या भूखंडावर व्यावसायिकांचा बाजार!

Advertisements

प्रतिनिधी/ चिपळूण

खेर्डी, गाणेखडपोली औद्योगिक वसाहतीत स्थानिक उद्योजकाला उद्योग सुरू करण्यासाठी जागा मिळत नाही, तर दुसरीकडे उद्योग न उभारताच घेतलेला भूखंड भाडेतत्वावर देण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. यामुळे या वसाहतीमध्ये मार्बल्स, भंगाराची गोदामे उभी राहिली आहेत. शिवाय अनधिकृत बांधकामे करून तेथे अन्य व्यवसाय थाटले गेले आहेत. येत्या आठवडाभरात यावर तत्काळ कार्यवाही न केल्यास शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्याचा इशारा शिवसेनेच्यावतीने तालुकाप्रमुख प्रताप शिंदे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिला.

  ते पुढे म्हणाले की, उद्योग उभे राहून स्थानिकांना रोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने एमआयडीसीची उभारणी करण्यात आली. मात्र सध्या या औद्योगिक वसाहतींचे चित्र पाहिले तर उद्योग कमी आणि इतर व्यावसायिकच अधिक झाले आहेत. मुळातच भूखंड घेतल्यानंतर उद्योग उभारणीसाठी सदर उद्योजकाला काही कालावधी दिला जातो. मात्र या दोन्ही औद्योगिक वसाहतींमध्ये भूखंड घेऊन उद्योजकांनी उद्योग न उभारता ते अन्य व्यवसायासाठी भाडय़ाने दिले गेले आहेत. त्यामुळे आज कुठलाही उद्योग उभा न राहताही भूखंड मालक घरी बसून आरामात भाडय़ाच्या पैशावर जगत आहे. परिणामी स्थानिक तरूणांना एखादा लघुउद्योग करायचा म्हटला तरी दामदुप्पट पैसे मोजून भूखंड घ्यावा लागतो, तर काहीवेळेला भूखंडच उपलब्ध होत नाही.

  सध्या या वसाहतींमध्ये बंद कारखान्यांमध्ये भंगाराची गोदामे जागोजागी उभी राहिली आहेत. यापूर्वीही अनेकांनी तक्रारी केल्या. मात्र कुणीही दखल घेतली नाही. अनधिकृत बांधकामे करून त्यामधून अन्य व्यवसाय सुरू आहेत. मार्बल्सची मोठमोठी गोदामे उभारण्यात आलेली आहेत. त्यामुळे याला आशीर्वाद कुणाचा, असा प्रश्न निर्माण होत आहे. एमआयडीसीने यासंदर्भात सविस्तर माहिती देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा येत्या आठवडाभरात एमआयडीसीवर शिवसेनेच्यावतीने मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिंदे यांनी दिला आहे.

Related Stories

कातळखोद शिल्प प्रत्यक्ष भेटीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे येणार

Patil_p

मंडणगडात अडीच हजार नागरिकांना स्थलांतराचे आदेश

Patil_p

जिह्यातील 77 टक्के गावांत कोरोनाला ‘नो एन्ट्री’

Patil_p

कोरोना टेस्ट सेंटरची जागा काही ठरेना…

Anuja Kudatarkar

रत्नागिरी : चिपळूण राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष श्रीकृष्ण खेडेकर यांचे निधन

Archana Banage

महिला बचतगटांनी विक्री केले 41 लाख 40 हजारांचे ‘मास्क’

Patil_p
error: Content is protected !!