Tarun Bharat

एसटी कर्मचारी बेमुदत उपोषण; एकच मागणी, शासनात विलिनीकरण

प्रतिनिधी / कोल्हापूर

एकच मागणी, एसटीचे राज्य शासनात विलिनीकरण या प्रमुख मागणीवर बेमुदत उपोषणाच्या दुसऱया दिवशीही एसटी कर्मचारी ठाम राहिले. सकाळी नऊ वाजल्यापासून चालक, वाहकांसह अन्य कर्मचारी बेमुदत उपोषणात सहभागी झाल्याने लालपरी बसस्थानकात थांबून राहिली. एसटीच्या फेऱया रद्द झाल्याने अनेक प्रवाशांची गैरसुविधा झाली. तास्नतास प्रवाशी बसस्थानकात बसून होते. एसटीची चाके थांबल्याने खाजगी प्रवासी वाहनांना मागणी वाढली. दरम्यान आमदार चंद्रकांत जाधव यांनी उपोषण स्थळी भेट देवून कर्मचाऱयांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच मागण्या शासनदरबारी मांडण्याचे आश्वासन दिले.

एसटी कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्यावतीने विविध मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर बुधवार 27 रोजीपासून बेमुदत उपोषण सुरु आहे. कोल्हापुरातही मध्यवर्ती बसस्थानक येथील महामंडळाच्या कार्यालयासमोर उपोषण सुरु आहे. उपोषणाच्या दुसऱया दिवशी चालक, वाहक यांच्यासह अन्य कर्मचाऱयांनीही उपोषणाला पाठींबा देत सहभाग नोंदवला. यामुळे एसटी सेवा पूर्णपणे ठप्प राहिली.

दरम्यान आमदार चंद्रकांत जाधव यांनी उपोषण स्थळी भेट देवून कर्मचाऱयांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी महागाई भत्ता 28 टक्के आणि दिवाळी बोनस 12 हजार 500 रुपये देण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. तसेच मागण्यांबाबत पालकमंत्री सतेज पाटील यांच्याशी चर्चा करुन कर्मचाऱयांचे प्रश्न सोडवू असे सांगितले. कर्मचाऱयांच्या प्रश्नाबाबत उद्या बैठकीचेही आयोजन करु, मात्र कर्मचाऱयांनी एसटी वाहतुक बंद न ठेवता ती सुरु करावी, अशी विनंती केली. मात्र कर्मचाऱयांनी शासनाने मागण्या मान्य कराव्यात उपोषण तत्काळ मागे घेवू असे सांगितले. तसेच एकच मागणी शासनात विलिनीकरण अशी घोषणा देत परिसर दणाणून सोडला.

याप्रसंगी बोलताना एस.टी. कामगार संघटनेचे विभागीय अध्यक्ष उत्तम पाटील म्हणाले, दिवाळीमध्ये बोनससाठी प्रतिवर्षी कर्मचाऱयांना शासनाकडे हात पसरावे लागत आहेत. तुटपुंज्या वेतनवाढीमध्ये सध्याच्या महागाईत कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कर्मचाऱयांना शक्य नाही. आर्थिक टंचाईमुळे कर्मचाऱयांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे.

अडीच तीन हजार बोनसमध्ये दिवाळी कशी साजरी करायची हा देखिल प्रश्न आहे. त्यामुळे शासनाने लाखो प्रवाशांना सुरक्षित सेवा देणाऱया एसटी कर्मचाऱयांच्या व्यथा जाणून घेवून मागण्या मान्य करुन कर्मचाऱयांची यंदाची दिवाळी गोड करावी, अशी मागणी केली. यावेळी संघटनेचे सचिव वसंत पाटील, संजीव चिकुर्डेकर, तकदीर इचलकरंजीकर, सुनील फुल्ले, प्रदीप गुरव, प्रताप तराळे, सारीका शिंदे आदींसह अन्य पदाधिकारी व एसटी कर्मचारी उपस्थित होते.

Related Stories

दूधगंगेतुन इचलकरंजीला पाणी देवू देणार नाही

Archana Banage

सरवडे येथे वीज कोसळली; जीवितहानी नाही

Abhijeet Khandekar

कोरोना पोहोचला मध्यवर्ती बसस्थानकात, वाहतूक विभाग लिपिक पॉझिटिव्ह

Archana Banage

कोल्हापूर : मलकापूर शिवारात गव्यांचा कळप दाखल

Archana Banage

करवीर तालुक्यातील पश्चिम भागात ‘भारत बंद’ला उत्स्फूर्त प्रतिसाद

Archana Banage

पैजारवाडी येथे ट्रकची एसटीला धडक; चालकासह सहा जखमी

Kalyani Amanagi