सावंतवाडीतून 25 फेऱया, प्रतिसाद मात्र अल्पच
ग्रामीण भागात सेवेची अद्याप प्रतीक्षाच
प्रतिनिधी / सावंतवाडी:
एसटी महामंडळाने सावंतवाडी आगारातून सावंतवाडी-दोडामार्ग आणि कणकवली अशी बससेवा सुरू केली आहे. दिवसातून 25 फेऱया होत असल्या तरी अजूनही प्रवासांचा प्रतिसाद मिळत नाही. केवळ नोकरदार वर्गासाठी या फेऱया फायदेशीर ठरत आहेत. अंतर्गत बस वाहतूक सुरू झाल्याशिवाय प्रवासी मोठय़ा संख्येने मिळणे कठीण असल्याचे येथील आगारातून सांगण्यात आले. एसटी बस सेवा पूर्ण क्षमतेने कधी सुरू होणार, याबाबत सध्या काहीही सांगणे कठीण आहे. परंतु बससेवा कार्यक्षमतेने सुरू करण्याचे निर्देश शासनाने दिल्यास तशी तयारीही आगाराकडून करण्यात आली आहे. त्यासाठी बसची ट्रायल वेळोवेळी आगारात घेतली जात आहे.
‘कोरोना’मुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एसटी बससेवाही बंद ठेवण्यात आली. बससेवा मोठय़ा कालावधीसाठी बंद राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. एसटी बसचा प्रवासी प्रामुख्याने ग्रामीण भागाशी निगडीत आहे. हा प्रवासी अद्यापही ‘कोरोना’च्या भीतीच्या छायेत आहे. त्यामुळे बससेवा सुरू होऊनही
प्रवाशांचा प्रतिसाद अल्प आहे.
सावंतवाडी आगारातून सावंतवाडी-दोडामार्ग, सावंतवाडी-कणकवली अशी बससेवा सुरू आहे. दररोज 25 फेऱया असतात. परंत प्रवाशांची संख्या कमी आहे. विशेषत: नोकरदार वर्ग असलेले प्रवासी आहेत. एसटी बससेवा ग्रामीण भागात सुरू होत नाही, तोपर्यंत प्रवाशांची संख्या वाढणे कठीण आहे. त्यामुळे शासन
ग्रामीण भागात बससेवा सुरू करण्याचे कधी निर्देश कधी देते, याकडे आगाराचे लक्ष लागले आहे. तसे निर्देश झाल्यास बससेवा सुरू करण्याची तयारी आगाराने ठेवली आहे.