Tarun Bharat

एसीजीएल कामगार पगारवाढ करारांवर 8 रोजी होणार सहय़ा

संघटना, मनसे नेत्यांनी कामगारांना दिली सविस्तर माहिती, कामगारांत समाधान

प्रतिनिधी /वाळपई

गेल्या चार वर्षांपासून रेंगाळत असलेल्या एसीजीएल कामगार पगारवाढीच्या मुद्यावर मंगळवारी रात्री उशिरा कंपनी व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्या मध्ये पगारवाढ व इतर विषयांवर एकमत झाले. यामुळे बऱयाच दिवसांपासून ऐरणीवर आलेला हा विषय संपुष्टात आला आहे. या संबंधी बुधवारी सकाळी कामगार संघटनेचे तसेच मनसे कामगार संघटना पदाधिकाऱयांनी भुईपाल सत्तरी येथील बीबीडी विभागात येऊन सर्व कामगारांना गेल्या तीन चार दिवसांत घडलेल्या सर्व घडामोडीबाबत सविस्तर माहिती देऊन पगारवाढीच्या करारांवर 8 मार्च रोजी सहय़ा होणार आहेत, अशी माहिती काही कामगारांना मिळाली आहे.

  पर्ये मतदारसंघात येणाऱया होंडा औद्योगिक वसाहतीत सुमारे चार दशकांपासून कार्यरत असलेल्या एसीजीएल कंपनीचे या भागाच्या विकासासाठी महत्त्वाचे योगदान आहे. त्यात या भागातील नागरिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. परंतू औद्योगिक क्षेत्रात येत असलेल्या चढ उतार समस्येमुळे सदर कंपनीच्या कामगारांचा पगारवाढ विषय 2018 पासून रेंगाळत होता. त्यामुळे कामगार संघटना आणि कंपनी व्यवस्थापन यांच्या मध्ये तेढ निर्माण झाले होते.  त्यामुळे सदर कंपनीच्या कामगार संघटनेने महाराष्ट्र नवनिर्माण कामगार संघटनेच्या मार्गदर्शनाखाली दि 2 मार्च पासून बेमुदत संपावर जाण्याची नोटीस दिली होती. यामुळे या संपाचा काय परिणाम होणार या संबंधी कामगाराबरोबर नागरिकांमध्ये सुद्धा शंका निर्माण झाली होती.

  या प्रकरणी संपावर जाण्याची मुदत जवळ येताच काही कामगार नेत्यांनी मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांना या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची मागणी केल्याची दखल घेऊन त्यांनी या प्रकरणी राज्य कामगार आयुक्तांना आदेश देऊन कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यामध्ये समझोता घडवून आणण्याचा प्रयत्न केला होता, त्या प्रयत्नांना यश प्राप्त होऊन कंपनीने कामगारांच्या पगारवाढ संदर्भात सकारात्मक प्रतिसाद दिला. त्याला कामगार संघटनेच्या वतीने सहमती दर्शवली असल्याने हा विषय संपुष्टात आला आहे.

  या संबंधी कामगार संघटनेकडून अधिकृत माहिती मिळाली नसली तरी, या संदर्भात खास सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कंपनीच्यावतीने 2018 पासून चार वर्षांसाठी 5500 पगारवाढ व त्याप्रमाणे मागील थकबाकी व इतर सुविधा, त्याच प्रमाणे पुढील पगारवाढ करार दोन वर्षाचा असणार आहे. त्यापुढील करार ठरल्या प्रमाणे तीन वर्षाचा असणार आहे. या करारावर 8 मार्च रोजी दोन्ही बाजूंनी स्वाक्षरी करण्यात येणार असल्याचे काल रात्री उशिरा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, तसेच कंपनीचे सीईओ ओ. व्ही. अजय, सी. एफ. ओ भुतेलो, मनुष्यबळ विभाग व्यवस्थापक प्रकाश नाईक, तसेच दोन्ही कामगार संघटनांचे अध्यक्ष गुणाजी परब, बाबलो सावंत तसेच संघटनेचे इतर पदाधिकारी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रवींद्र भवन साखंळी येथे झालेल्या संयुक्त बैठकीत ठरविले आहे. त्याप्रमाणे दोन्ही बाजूंनी सहमती पत्रांवर स्वाक्षरी करण्यात आली आहे.

Related Stories

आधीच गर्दीचे ग्रहण, त्यात मोपमुळे वाढेल ताण!

Patil_p

कुंडई येथे सर्वेक्षणात भलताच अधिकारी हजर राहिल्याने राडा

Amit Kulkarni

दाबोळी विमानतळावर पंधरा लाखांचे सोने जप्त

Patil_p

पताकांचा कलात्मक अविष्कार

Amit Kulkarni

‘मोप’ मार्गाची आमदार प्रवीण आर्लेकर यांच्याकडून पाहणी

Amit Kulkarni

खांडोळा येथे वीज ट्रान्सफॉर्मरचे उद्घाटन

Patil_p