Tarun Bharat

ऐंशीव्या वर्षी सुरु केला व्यवसाय

टाळेबंदीच्या काळात अनेकांचं रूटीन फिस्कटलं. बाहेर येणं-जाणं, नातेवाईकांना भेटणं, बागेत बसून गप्पा मारणं हे प्रकार थांबले. या सगळ्यामुळे ज्येष्ठ नागरिक अधिक वैतागले. आता वेळ कसा घालवायचा असा प्रश्न त्यांना पडू लागला. मुंबईनिवासी कोकिळा पारेख यांनाही हा प्रश्न पडला होता. मग त्यांनी चहाचा मसाला तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्या घरगुती वापरासाठी चहा मसाला करत होत्या. याच कौशल्याचं रुपांतर त्यांनी व्यवसायात केलं.

टाळेबंदीपूर्वी सगळेजण सर्वसामान्य आयुष्य जगत होते. येत्या काही काळात आपल्या आयुष्यात  इतके बदल होतील, असा विचार कोणी स्वप्नातही केला नसेल. 79 वर्षांच्या कोकीळा पारेखही अगदी सुखनैव आयुष्य जगत होत्या. सकाळी उठून आंघोळ, पूजा आटोपून मंदिरात जायचं, घरातल्या स्वयंपाक्याच्या कामावर लक्ष ठेवायचं. थोडावेळ सुनेशी गप्पा मारायच्या, दुपारी झोपायचं, संध्याकाळी नातेवाईक किंवा शेजार्यापाजार्यांकडे जाऊन यायचं आणि रात्रीच्या स्वयंपाकात मदत करायची, असा त्यांचा दिवस जात होता. पण टाळेबंदी जाहीर झाली आणि मंदिरात जाणं थांबलं. कोणाला भेटताही येईना. कोकीळा पारेख हे अत्यंत हौशी व्यक्तिमत्त्व. त्यांना कार्यरत रहायला आवडतं.  खास मसाला ही कोकिळा पारेख यांची खासियत. हा मसाला घातलेला चहा म्हणजे जणू अमृतच. हा
मसाला घातलेला चहा पिण्यासाठी नातेवाईक आवर्जून त्यांच्याकडे येत असत. हा मसाला दुधातही घालता येतो.   कोकिळाबेन यांना चहाच्या मसाल्याचा हा वारसा पूर्वजांकडून मिळाला. गेली अनेक वर्षं त्या हा मसाला करत आहेत. त्यांच्या हातच्या मसाल्याची ख्याती नातेवाईक आणि आप्तेष्टांमध्ये पसरली, मसाल्याची मागणी वाढली. मग त्या नातलगांसाठी जास्तीचा मसाला करू लागल्या. त्यानंतर त्यांनी  या कौशल्याचं रुपांतर व्यवसायात करायचं ठरवलं.

अवघ्या महिन्याभरातच त्यांचा केटी चहा मसाला लोकप्रिय झाला. कोकिळाबेन यांच्या व्यवसायात त्यांच्या धाकटय़ा मुलाची, तुषारची खूप मदत झाली.  तुषारने उत्तम दर्जाचा कच्चा माल उपलब्ध करून दिला. हा मसाला देशभरात पाठवण्याच्या दृष्टीने लागणारं पॅकिंगचं साहित्यही आणलं. कोकिळाबेन यांनी चहाचा मसाला मोठय़ा प्रमाणावर तयार करण्याचं ठरवल्यावर त्यासाठी लागणारं मोठं उपकरणही आणलं. कोकिळाबेन यांनी मसाला तयार केल्यानंतर घरातले कर्मचारी पॅकिंगचं काम करतात. अर्थात हे काम करताना स्वच्छतेची पूर्ण काळजी घेतली जाते. ग्लोव्हज, मास्क घालून आणि डोकं झाकून मसाला भरला जातो. स्वच्छता आणि दर्जा याबाबत त्या कोणतीही तडजोड करत नाहीत.

वेलची पूड, दालचिनी पूड, आलं, मिरी अशा घटकांपासून हा मसाला तयार केला जातो. हा मसाला चहाची लज्जत तर वाढवतोच शिवाय रोगप्रतिकारक क्षमताही टिकवून ठेवतो. याच कारणामुळे केटी चाय मसाल्याची मागणी वाढली. हा मसाला देशभरात कुठेही पाठवला जातो. कोकिळाबेन यांना आत्तापर्यंत 500 पेक्षा जास्त ऑर्डर्स आल्या आहेत. मुंबई, पुणे, अहमदाबाद, बंगळूरू इथला ग्राहक मागणी नोंदवत आहे. आपल्या अंगी कौशल्य असेल तर त्याचा अर्थार्जनासाठी वापर कसा करायचा, याचं उत्तम उदाहरण म्हणजे कोकिळा पारेख. त्यांच्या या वयातल्या मेहनतीला आणि उत्साहाला सलाम करायलाच हवा.

Related Stories

‘क्लीन प्लॅनेट’ साठी….

Omkar B

मुलांमधले यकृताचे आजार

Omkar B

वाढतोय स्तनांचा कर्करोग

Amit Kulkarni

गणित पैशांचं

Omkar B

महत्वाकांक्षी कविता

Amit Kulkarni

पती संशय घेतो…

tarunbharat