Tarun Bharat

ऑक्टोबर हिटमध्ये ‘ग्रीष्मा’चा तडाखा

दहावी पुरवणी परीक्षेत ग्रीष्मा नायक राज्यात पहिली आली. नियमित परीक्षेवेळी फी भरली नाही या कारणास्तव तिला हॉलतिकीट नाकारले होते. ग्रीष्माने अशा शिक्षण संस्थांच्या नकारात्मक भूमिकेकडे दुर्लक्ष करून हार न मानता कोरोनाच्या अस्थिर शैक्षणिक वातावरणातही जोरदार अभ्यास केला आणि यशाला गवसणी घातली.

दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केवळ दोन दिवस परीक्षा घेण्यात आल्या होत्या. 53 हजार 155 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 29 हजार 522 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 55.54 टक्के निकाल लागला आहे. पास झालेल्यांमध्ये विद्यार्थिनींची संख्याच अधिक आहे. या परीक्षेत सर्व विद्यार्थ्यांसाठी आदर्श ठरावा अशी कामगिरी ग्रीष्मा नायक या विद्यार्थिनीने केली आहे. पुरवणी परीक्षेत ग्रीष्मा राज्यात पहिली आली आहे. वेळेत फी भरता आली नाही म्हणून तिला परीक्षेचे हॉलतिकीट मिळाले नव्हते. त्यामुळे तिने तर आत्महत्येचा विचारही केला होता. तिला मानसिक धक्का बसला होता. या धक्क्मयातून ती सावरली. पुरवणी परीक्षेत ती राज्यात प्रथम आली आहे. परीक्षा प्रक्रिया आणि त्यानंतरचा निकाल याविषयी नकारात्मक विचार करून जीवन संपविण्याचा मार्ग स्वीकारणाऱया अनेक कमकुवत मनाच्या विद्यार्थ्यांसाठी तिने एक आदर्श पायंडा घालून दिला आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. माजी शिक्षणमंत्री सुरेश कुमार यांनी तिच्या पाठीवर शाबासकीची थाप देतानाच संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी तू आदर्श असल्याचे म्हटले आहे.

ग्रीष्मा नायक ही विद्यार्थिनी तुमकूर जिल्हय़ातील कोरटगेरे तालुक्मयातील आहे. जुलैमध्ये दहावीची परीक्षा लिहिण्यासाठी आवश्यक हॉलतिकीट तिला मिळाले नाही. त्यामुळे ती परीक्षेपासून वंचित झाली होती. हे प्रकरण त्यावेळी संपूर्ण राज्यात गाजले होते. तत्कालिन शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी ग्रीष्माच्या घरी भेट देऊन तिला धीर दिला होता. पुरवणी परीक्षेत तुला परीक्षा लिहिण्याची संधी दिली जाईल, असे सांगून सुरेश कुमार यांनी तिचे मनोबल उंचावले होते. परीक्षा लिहिता आली नाही त्याचा जबर धक्का तिला बसला होता. कुटुंबियांनी या धक्क्मयातून तिला सावरले. खासकरून तिची मोठी बहीण अर्चना ही रोज तिचा अभ्यास घ्यायची. या विद्यार्थिनीने 599 गुण मिळविले आहेत. ग्रीष्माचे यश इतर विद्यार्थ्यांना मार्गदर्शक आहे. खरे तर फी भरली नाही म्हणून हॉलतिकीट देणे टाळू नका, अशी सक्त ताकीद राज्य सरकारने दिली होती. तरीही काही शिक्षणसंस्थांनी मुलांच्या भविष्याशी खेळ केला. या सर्वांवर मात करत ग्रीष्माने मिळविलेले यश अशा संस्थांच्या डोळय़ांत अंजन घालण्याबरोबरच नैतिकतेचा तडाखा देणारे आहे.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या जीवनात दहावी-बारावीच्या परीक्षेला विशेष महत्त्व आहे. उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेणे असो किंवा नोकरीसाठी प्रयत्न करताना असो दहावी आणि बारावीत किती गुण मिळाले? हे प्रामुख्याने पाहिले जाते. यामुळे विद्यार्थी खूप गांभीर्याने या परीक्षांसाठी तयारी करतात. एखाद्या क्षुल्लक कारणामुळे जर ते परीक्षेपासून वंचित राहिले तर त्यांना त्याचा धक्का बसणे साहजिक आहे. वर्षभर केलेला अभ्यास, तयारी वाया जाण्याची भीती असते. पुन्हा परीक्षा होईपर्यंत त्यांना प्रतीक्षा करावी लागते. सतत अभ्यासात रहावे लागते. एकदा परीक्षा लिहून झाली की या सर्व कटकटीतून विद्यार्थ्यांची सुटका होते. दिवसरात्र मेहनत घेऊन अभ्यास करूनही परीक्षा लिहिता आली नाही तर त्यामुळे उद्भवणारी परिस्थिती असहय़ असते. कठीण मानसिक ताणतणावातून या विद्यार्थ्याला मार्गक्रमण करावे लागते. विद्यार्थ्यांवर ही वेळ येऊ नये, याची दक्षता घेण्याची जबाबदारी शिक्षण संस्थांवर असते. सार्वजनिक शिक्षण खात्यानेही यासाठी लक्ष द्यायचे असते. ज्यावेळी या संस्था किंवा सरकारी यंत्रणा आपली जबाबदारी निभावण्यात अपयशी ठरतात, अशावेळी असे प्रसंग उद्भवतात.

कोरोना महामारीमुळे प्रत्येकाची आर्थिक गणिते कोलमडली आहेत. आपली मुले चांगल्या शिक्षण संस्थांमध्ये शिकावीत, ही प्रत्येक पालकाची इच्छा असते. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी पालक शिक्षण संस्था मागेल तितके पैसे मोजत असतात. एक काळ असा होता, की सरकारी शाळेत शिक्षण घेणे मानाचे होते. आता ज्यांना खासगी संस्थांची फी परवडत नाही, त्यांचीच मुले सरकारी शाळेत शिकतात. कोरोनोत्तर काळात फी भरता येईना म्हणून अनेक मध्यमवर्गीय पालकांनी आपल्या मुलांचा दाखले काढून त्यांना सरकारी शाळेत भरती केले आहे. शाळा चालणार की नाही? वर्ग भरणार की नाही? भरले तरी किती दिवस भरणार? अभ्यासक्रम पूर्ण होणार की नाही? या कसल्याच गोष्टींची शाश्वती नसताना संस्थाचालक सांगतील तितके पैसे मोजावे लागतात. सरकारी शाळेत मुलांची नावे नोंदविली तर किमान फी च्या कटकटीतून तरी आमची सुटका होते, या भावनेतून पालक सरकारी शाळेकडे वळू लागले आहेत. कोरोनामुळे गरीब, मध्यमवर्गीयांची अवस्था काय झाली आहे? आपल्या मुलांची फी भरणेही पालकांना कठीण जातेय. त्याचा फटका मुलांना बसतो. त्यांना परीक्षेपासून वंचित रहावे लागते, ही गोष्ट सामाजिक परिस्थितीची विदारकता अधोरेखित करणारी आहे.

दसरा सुटी संपल्यानंतर पहिलीपासून वर्ग पूर्ण प्रमाणात भरवण्यात येणार आहेत. सध्या सहावी ते बारावीपर्यंतचे वर्ग भरविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांच्या बाबतीत विचित्र अनुभव शिक्षकांना येतो आहे. एक-दीड वर्षे ऑनलाईन शिक्षण घेतल्यामुळे विद्यार्थी मोबाईलच्या आहारी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्यात एकाग्रतेची कमतरता दिसून येत असून ते भलतेच चंचल बनले आहेत. पूर्ण प्रमाणात शाळा सुरू झाल्यानंतर एका ठिकाणी तासन् तास तग धरून बसणे त्यांना जमेनासे झाले आहे. हे शिक्षकांचे निरीक्षण आहे. लॉकडाऊनमुळे घरात कोंडून राहिल्याने आता त्यांच्यात एकप्रकारचा आळस भरला आहे. त्यांच्यात पुन्हा उत्साह निर्माण करून त्यांना विषय शिकविण्याचे आव्हान शिक्षकांसमोर उभे ठाकले आहे. याबरोबरच घरात कोंडून राहिल्यामुळे शारीरिक व्यायामाचा अभाव निर्माण झाला आहे. अभ्यासात मन रमेना, अशी त्यांची स्थिती आहे. या परिस्थितीतून त्यांना बाहेर काढून पुन्हा सक्रिय करण्याचे आव्हान शिक्षकांना पर्यायाने सरकारला पेलावे लागणार आहे. कोरोनामुळे शिकवणी, अभ्यासक्रम आणि परीक्षेची पद्धत सर्व काही बदलले. आता नियमित शाळा सुरू झाल्यामुळे गृहपाठ करायलाही मुले कंटाळू लागली आहेत. यावषी तर दहावीची परीक्षा केवळ दोनच दिवस झाली. पुढे काय होणार, याची धास्ती विद्यार्थ्यांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या अक्षरांचे वळण चुकत चालले आहे. नेहमीपेक्षा दीड-दोन महिने उशिरा शाळा सुरू झाल्या आहेत. शिक्षकांना अभ्यासक्रम अल्पावधीत पूर्ण करण्याची घाई आहे. विद्यार्थ्यांचे तर अभ्यासात मन रमेना. कोरोनामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या विचित्र अवस्थेतून विद्यार्थ्यांना बाहेर काढून पुन्हा त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयीचे चैतन्य निर्माण करण्याची गरज आहे.

Related Stories

सोनम वांगचूक: वैकल्पिक विद्यापीठाचा कुलगुरु

Patil_p

सदगुरुमहात्म्य

Patil_p

10 डाऊनींग स्ट्रीट पणत्यांनी उजळते तेव्हा…

Patil_p

परतंत्र भारताला पडलेले दिव्य स्वप्न – नेताजी सुभाषबाबू

Patil_p

विक्रम जोशींच्या खुनाची गोष्ट

Patil_p

भक्तांच्या प्रेमापुढे मला काहीच सुचत नाही

Amit Kulkarni